contest election with your agenda says chandrashekar azad to rss
contest election with your agenda says chandrashekar azad to rss  
विश्लेषण

आरएसएसने आपला अजेंडा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात यावे - आझाद

सरकारनामा ब्युरो

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस)  भाजपाला चालवित आहे. अशा प्रकारे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवणे सोडा. लोकशाहीवर विश्‍वास असेल तर आपला अजेंडा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात या, असे थेट आव्हान भीम आर्मीचे संस्थापक ऍड. चंद्रशेखर आझाद (रावण) यांनी आज सरसंघचालक मोहन भागवत यांना दिले.

मोहन भागवत यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक तिरंगा यात्रा काढतात. पण त्यांच्या मुख्य कार्यालयावर तिरंगा का नाही लावत, असा प्रश्‍न करीत आधी कार्यालयावर तिरंगा लावा, अन मग आमच्यासमोर या. तेव्हा तुमच्याशी चर्चा करु, असे बोल ऍड. चंद्रशेखर आझाद (रावण) यांनी भागवत यांना संघाचे कार्यालय असलेल्या रेशीमबाग मैदानावर मेळाव्यात सुनावले.

भीम आर्मीतर्फे वूई द सिटीजन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने शनिवारी रेशीमबाग मैदानावर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यातून रावण यांनी हुंकार भरला. तिरंगा ध्वज घेऊनच रावण यांचे व्यासपीठावर आगमन झाले. 

आज रेशीमबागेत तिरंगा ध्वज फडकवला आहे. तिरंगा फडकणार नाही, असा एकही भाग देशात शिल्लक ठेवणार नाही अशी गर्जना त्यांनी केली. देश कुणाच्या बापाचा नाही. या देशात संविधानाचाच विचार चालेल. रोटी, कपडा, मकान, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, रोजगार देण्याची जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. पण, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांकांना दुय्यम दर्जाचे नागरिकत्व देण्याचा आरएसएसचा अजेंडा आहे. अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. सरकार मात्र सभा घेऊ देत नाही. आंदोलकांवर केसेस दाखल केल्या जात आहेत. दंडे, बंदुका उगारल्या जात आहेत. आम्हीही डोक्‍याला "कफन' बांधून आलो असल्याचा इशारा देत मनुवादी विचार दूर लोटण्यासाठी आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली.

देशात मनुस्मृती आणि संविधान या दोन विचारांमध्ये भांडण सुरू असून त्यात संविधानाचा विचारच भारी ठरेल. या देशात संविधानाचेच राज्य चालेल. भारतवासीयांनी आंदोलनाचे हत्यार उपसताच इंग्रजांनाही पळावे लागले. आजही जनता आंदोलनसाठी रस्त्यावर आली आहे. यामुळे आत्ताच्या सत्ताधाऱ्यांचे राज्यही फार काळ टिकणार नाही. देशातील सर्व महापुरूषांनी बंधूभावाची शिकवण दिली. त्यांचे चित्र नाही तर चरित्र विचारात घ्या. त्यांचाच वारसा पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे. भारतात असलेली मानवताच आपला धर्म असल्याचे ते म्हणाले. 

मेळाव्याला व्यासपीठावर समीर अहमद सिद्धीकी, प्रफुल्ल शेंडे, मल्कीतसिंग बल, नेहा शिंदे, नागेश चौधरी, प्रमोद मून, मुकेश खडतकर, शाकीर, आमीर खान, अशोक कांबळे, मनिष साठे, इमरान नुराणी यांच्यासह भीम आर्मी आणि "वुई द सीटीझन ऑफ इंडीया'चे पदाधिकारी होते.

सरकार बदलेल, त्यांच्याही गुन्ह्यांचा हिशेब घेऊ
सरकार हुकूमशाहासारखे वागत आहे. आंदोलकांवर बंदुका, दंडे उगारल्या जात आहे. पण, लवकरच सरकार बदलेल, बहुजनांचे सरकार येईल. त्यावेळी प्रत्येक गुन्ह्यांचा हिशेब घेतला जाईल. कुणीही वाचणार नाही, असा इशारा देत उद्या होणाऱ्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आझाद यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT