B.S Yediyurappa and D.K.Shivakumar 
विश्लेषण

कर्नाटकात राजकीय बॉम्ब : भाजपच्या येडियुरप्पांसह काँग्रेसचे शिवकुमारही अडचणीत

कर्नाटकात भाजप नेते माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार अडचणीत आले आहेत.

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) भाजप नेते माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार अडचणीत आले आहेत. या दोघांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाली आहे. त्यांनी सिंचन प्रकल्पांची कंत्राटे देताना कमिशन घेतल्याचा गंभीर आरोप एका उद्योगपतीने केला आहे. यामुळे कर्नाटकातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

उद्योगपती आलम पाशा यांनी लाललुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी एसीबीच्या महासंचालकांना भेटून ही तक्रार केली आहे. यात तक्रारीत येडियुरप्पा आणि शिवकुमार यांच्यासह 13 जणांची नावे आहेत. पाशा हे माहिती अधिकार कार्यकर्तेही आहेत. येडियुरप्पा आणि शिवकुमार यांनी सिंचन प्रकल्पांची कंत्राटे वाटताना पैसे घेतले, असा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेस नेते व्ही.एस.उग्रप्पा आणि काँग्रेसचे माध्यम सल्लागार एम.ए.सलीम यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी या भ्रष्टाचाराची माहिती सर्वांसमोर आली होती.

या व्हिडीओत शिवकुमार व त्यांचे सहकारी लाच घेत असल्याचा थेट आरोप करण्यात आला होता. सलीम अहमद यांनी म्हटले होते की, आधी 6 ते 8 टक्के लाच घेतली जात होती. आता ही 10 ते 12 टक्क्यांवर गेली आहे. डीके (डी.के.शिवकुमार) अशीच तडजोड करतात. मुलगुंड (डीके यांचे सहकारी) यांनी यातून 50 ते 100 कोटी रुपये कमावले आहेत. मुलगुंड यांनी एवढे कमावले असतील तर डीके यांना किती मिळाले असतील, असा विचार करा.

डी. के. शिवकुमार हे पहिल्यांदाच वादात अडकले नाहीत.काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका कार्यकर्त्याला थोबाडीत मारले होते. याबाबतचा व्हिडीओही समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा कार्यकर्ता शिवकुमार यांच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करत होता. तसेच शिवकुमार यांच्याविषयी पक्षातील अन्य काही नेत्यांच्याही तक्रारी आहेत.

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT