विश्लेषण

शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुहास दाशरथे मनसेच्या वाटेवर

जगदीश पानसरे

औरंगाबाद : शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा लोकसभा संघटक सुहास दाशरथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहेत. नुकतीच त्यांनी कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेऊन तशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे. सुहास दाशरथे गेली 39 वर्ष शिवसेनेत कार्यरत असून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख आहे. दाशरथेंचा मनसे प्रवेश हा खैरे यांच्यासाठी मोठा धक्का असेल. 

शिवसेनेने कॉग्रेस-राष्ट्रवादी सोबत जात राज्याची सत्ता हस्तगत केल्यापासून काही जुन्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. औरंगाबाद शिवसेनेतून त्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली असून जुने कार्यकर्ते आणि सहसंपर्क प्रमुख असलेले सुहास दाशरथे लवकरच मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत. या संदर्भात दाशरथे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले गेली 39 वर्ष मी शिवसेनेत काम करत आहे, पण पक्षाकडून माझ्यावर सातत्याने अन्यायच होत गेला. 

शिवाय हिंदुत्ववादी भूमिकेशी तडजोड करून शिवसेनेने राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाऊन सत्ता स्थापन केली हे देखील न पटण्यासारखे आहे. अशावेळी हिंदुत्वाची कास धरणाऱ्या मनसे आणि या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांची खंबीरपणे साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. कृष्णकुंज येथील भेटीत राज ठाकरे यांचे अभिनंदन केले, परंतु लगेच मनसेत प्रवेश करणार नाही. तर औरंगाबादेत भव्य कार्यक्रम घेऊन मनसेत प्रवेश करण्याचा विचार असल्याचे दाशरथे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT