Yogesh Tilekar -Devendra Fadnavis- Muralidhar Mohol Sarkarnama
विश्लेषण

Devendra Fadnavis : फडणवीसांकडून काही दिवसांतच दोन 'अण्णां'चं प्रमोशन; पुण्यात शिवसेना - राष्ट्रवादीला 'टशन'?

BJP announced Legislative Council candidates : विधानपरिषदेसाठी योगेश टिळेकर यांच्या डोक्यावर आपला हात कायम ठेवत त्यांच्या नावाला पसंती देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

Chaitanya Machale

Pune News : विधानपरिषदेच्या जागांसाठी पाच उमेदवारांची नावे भारतीय जनता पक्षाने जाहीर केली आहे. यामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार योगेश (अण्णा) टिळेकर यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. टिळेकर यांना विधानपरिषद देऊन भाजपने ओबीसी समाजाला खूष करण्यासाठी संधी दिली आहे.

कोथरुडमधून नगरसेवक म्हणून प्रतिनिधित्व करणारे मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांच्याकडे महापौर, राज्य सरचिटणीस, पश्चिम महाराष्ट्राची संपूर्ण जबाबदारी सोपविली. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर खासदार झालेल्या मोहोळांची थेट केंद्रीय राज्यमंत्रिपदावर वर्णी लागली. फडणवीसांनी अवघ्या काही दिवसांच्या अंतराने पुण्यातील दोन 'अण्णां'चं प्रमोशन केले आहे. त्यांनी या दोन अण्णांचं प्रमोशन करुन एकप्रकारे पुण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीलाच टशन दिल्याचे बोलले जात आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांचे खंदे समर्थक अशी ओळख माजी आमदार योगेश टिळेकर यांची आहे. दहा वर्षांपूर्वी 2014 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत टिळेकर यांच्यातील गुण ओळखून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघातून संधी दिली. या मतदारसंघातून ते विजयी झाले होते. या मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार महादेव बाबर यांचा त्यांनी पराभव केला होता.

ही निवडणूक भाजपने स्वबळावर लढवली होती. मोदी लाटेमध्ये शहरातील आठही मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात आलेल्या या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करणारे योगेश टिळेकर यांच्यासह कोथरुडमधून मेधा कुलकर्णी यांना संधी देण्यात आली होती. हे दोघे या निवडणुकीत विजयी झाले होते.

हडपसरचे आमदार म्हणून काम करताना टिळेकर यांनी कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मोठा पाठपुरावा केला. या रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी ते सुरुवातीपासूनच प्रयत्नशील होते. आमदार झाल्यानंतरही फडणवीस यांच्या मर्जीतील असल्याने त्यांची नियुक्ती भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी करण्यात आली होती. आमदार म्हणून काम करताना येवलेवाडीचा विकास आराखडा तयार करताना माजी आमदार टिळेकर यांनी मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करत आरक्षण टाकण्यासाठी (डीपी) तसेच काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. डीपीमध्ये आरक्षण टाकण्यासाठी बिल्डरांकडून मोठ्या रकमा तसेच गाड्या देखील घेतल्याचे प्रकरण समोर आले होते.

कोंढवा परिसरात ऑप्टिक फायबरचे काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याला वारंवार फोन करून 50 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आमदार टिळेकर यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांच्यावर कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांच्याकडेच गृहखाते होते. टिळेकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर संबधित पोलिस अधिकाऱ्याची बदली देखील गृह विभागाने केल्याने याची उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.

या प्रकरणानंतरही टिळेकर हे फडणवीस यांच्या 'गुडबुक' मध्येच राहिले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे पुनवर्सन करण्यासाठी त्यांना भाजपच्या ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. मध्यप्रदेशच्या निवडणुकीत त्यांना निरीक्षक म्हणून देखील फडणवीस यांनी जबाबदारी दिली होती.

आता विधानपरिषदेसाठी टिळेकर यांच्या डोक्यावर आपला हात कायम ठेवत त्यांच्या नावाला पसंती देण्याचे काम उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून करण्यात आल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. पक्षाकडून विधानपरिषदेसाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असतानाच फडणवीस यांनी हडपसरचे माजी आमदार टिळेकर यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोथरुडमधून महापालिकेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी आपली विशेष कृपादृष्टी सुरुवातीपासूनच ठेवली आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ यांना पहिली संधी देण्यात आली. मोहोळ यांना पालिकेचे बजेट दोनवेळा सादर करण्याची संधी मिळाली. त्यानंतर आलेल्या 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कोथरुड मतदारसंघातून मोहोळ यांचे नाव देखील चर्चेत होते.

मात्र त्यावेळी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच पक्षाने कोथरुडमधून निवडणूक लढवण्यास सांगितले. त्यामुळे मोहोळ यांना संधी मिळाली नाही. याची परतफेड करण्यासाठी कसबा विधासभा मतदारसंघातून मुक्ता टिळक आमदार झाल्यानंतर रिक्त झालेल्या महापौरपदासाठी फडणवीसांनी स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेल्या मोहोळ यांच्या नावाला महापौरपदासाठी पसंती दिली. अडीच वर्षे मोहोळ यांच्याकडेच महापौरपदाची जबाबदारी कायम होती.

महापालिकेतील महापौरपदाची मुदत संपुष्टात आल्यानंतर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये मोहोळ यांना घेण्यात आले. त्यांच्याकडे प्रदेश सरचिटणीस हे पद देण्यात आले. इतकेच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी देखील त्यांवर टाकण्यात आली. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीसाठी मोहोळ यांच्या नावाचीच चर्चा सुरू होती. मात्र ही निवडणूक झालीच नाही.

त्यामुळे त्यांच्याकडे लोकसभा निवडणुकीचे समन्वयकपदाची जबाबदारी देण्यात आली. लोकसभेसाठी पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे मोहोळ यांनी जाहीर केले होते. लोकसभेसाठी भाजपने अखेरच्या क्षणी मोहोळ यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले. खासदार म्हणून विजयी झालेल्या मुरलीधर मोहोळ यांना फडणवीस यांच्या वरदहस्तामुळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचा प्रमुख चेहरा आहे. ते महायुती सरकारचे मास्टर माईंड आहे. पण या फडणवीसांनी कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर पुण्यावर जरा जास्तच लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पुण्यातील भाजपचं वर्चस्व कायम राखण्याच्या उद्देशाने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने फडणवीसांनी पुण्यात दोन 'अण्णां'चे प्रमोशन केल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT