मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा सामना सुरू झाला आहे. राणेंच्या विरुद्ध अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून, त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जनआशीर्वाद यात्रा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राणेंना अटक झाल्यास या यात्रेची जबाबदारी प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण आणि आशिष शेलार या तीन नेत्यांवर असेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुंबईत नारायण राणेंच्या जुहू येथील घरासमोर आंदोलन करणारे युवासेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेंकांना भिडल्याने पोलिसांनी सैाम्य लाठीमार केला. आता परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यात आली आहे. ही दगडफेक भाजपने केली असल्याचा आरोप युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली. यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला आहे.
या सर्व वादावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. राणेंच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भातील वक्तव्याचे भाजप समर्थन करत नाही, पण पक्ष आम्ही म्हणून राणेंच्या पाठिशी आहोत, अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली. ते म्हणाले की, नारायण राणेंना पोलिसांना अटक केली तरी भाजपची जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही. राणेंच्या अनुपस्थितीत प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण आणि आशिष शेलार हे जन आशीर्वाद यात्रेचे नेतृत्त्व करतील आणि ती पूर्ण करतील.
मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात राणेंनी केलेल्या एका वाक्यामुळे वाद निर्माण झाला आहे. बोलण्याच्या ओघात हे झाले असावे. मुख्यमंत्री स्वातंत्र्यदिन विसरतात तेव्हा कुणाच्याही मनात राग निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्रिपदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. राणेंच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी भाजप नाही पण पक्ष पूर्ण ताकदीनं राणेंसोबत आहे. कारवाई ज्या पद्धतीनं होतेय ते चुकीचे आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
शिवसैनिक दगडफेक करत आहेत आणि ते म्हणत आहेत की आम्ही उद्धवजींच्या आदेशाने करत आहोत. भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला तर खबरदार. आम्ही हिंसा करणार नाही, पण आमच्या कार्यालयावर हल्ला झाल्यास सहन करणार नाही. आमच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास आम्ही संबंधित पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करु. राणेंना अटक केली तरी जन आशीर्वाद यात्रा सुरूच राहील. प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण हे यात्रेचे नेतृत्व करतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.