Gadchiroli : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिमागास, नक्षलग्रस्त, गरीब जिल्ह्यांच्या यादीतील गडचिरोलीचं पालकमंत्रीपद आवर्जुन स्वतःकडे ठेवले. पण याच गडचिरोली जिल्ह्यातील धान घोटाळा मागील काही दिवसांपासून प्रचंड गाजत आहे. महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या धानातून धन निर्मितीची किमया आत्मसात केली आहे.
रक्ताचे पाणी करून शेतात ढोर मेहनत घेत शेतकरी धान्य पिकवतो. पण, हा जगाचा पोशिंदा अर्धपोटीच राहतो. याच धान्याचा काळाबाजार, भ्रष्टाचार करून हे अधिकारी, कर्मचारी तृप्तीचा ढेकर देत आहेत. कोटीच्या कोटी उड्डाणे घेत असल्याचे चित्र गडचिरोली जिल्ह्यात बघायला मिळत आहे. 'प्रयत्ने धानाचे कण रगडीता, पैसाच पैसा गळे’ असा त्यासाठीचा त्यांचा मंत्र आहे.
कुरखेडा तालुक्यातील एकट्या देऊळगाव धान खरेदी केंद्रात 2023-24 व 2024-25 या अवघ्या 2 वर्षांत तब्बल 3 कोटी 96 लाख 65 हजार 965 रुपयांचा अपहार झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच गडचिरोली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या संस्थेचे प्रभारी विपणन निरीक्षक तथा ग्रेडर चंद्रकांत ज्ञानेश्वर कासारकर व विपणन निरीक्षक तथा ग्रेडर हितेश पेंदाम या दोघांना अटक केली. मात्र या प्रकरणातील इतर आरोपी फरार आहेत.
राज्य शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतकऱ्यांनी पिकविलेले धान विविध खरेदी केंद्रांवर खरेदी केले जाते. खरेदी केलेल्या धानाची प्रादेशिक कार्यालय समिती स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने नेमलेल्या मिलर्सकडून बँक गॅरंटीच्या प्रमाणात धानाचे वितरण केले जाते. जावक धानाचे वितरण आदेश मिलर्स आणि खरेदी केंद्रावरील केंद्रप्रमुख यांच्या स्वाक्षरीने वजन पावत्यांसह उप-प्रादेशिक कार्यालयास सादर केले जातात.
मिलर्सने उचल केलेल्या धानाची भरडई करून तयार होणारा तांदुळ जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या अधिन असलेल्या गोदामांत जमा करण्यात येतो. जमा केलेल्या तांदळाच्या स्वीकृत पावत्या मिलर्सद्वारा प्रादेशिक कार्यालयात सादर करण्यात येतात. परंतु, या प्रक्रियेदरम्यान देऊळगाव येथील धान खरेदी केंद्रात धानाचा अपहार झाल्याचे दिसून आले होते.
देऊळगाव येथील धान खरेदी केंद्रात खरेदी योजना हंगाम 2023-24 मध्ये एकूण 19860.40 क्विंटल धानाची खरेदी झाली होती. त्यापैकी प्रत्यक्ष 15196.32 क्विंटल धान भरडईकरिता गेला. उर्वरीत 3944.08 क्विंटल धानाची तफावत दिसून आली. तसेच एकदा वापरलेल्या जुन्या बारदान्याच्या संख्येत देखील तफावत दिसून आल्याने एकूण 1 कोटी 53 लाख 93 हजार 980 रुपयांच्या रकमेचा अपहार आढळून आला.
सन 2024-25 मध्येही 6140.00 क्विंटल धानाची तफावत तसेच एकदा वापरलेल्या जुन्या बारदान्यांच्या संख्येत तफावत दिसून आली. त्यामुळे 2 कोटी 42 लाख 72 हजार 885 रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याचे आढळून आले. म्हणजे ही दोन्ही वर्षे मिळून या एकाच केंद्रात एकूण 3 कोटी 96 लाख 65 हजार 965 एवढ्या प्रचंड रकमेचा अपहार झाला आहे.
देऊळगावच्या धान खरेदी केंद्रातील हा घोटाळा म्हणजे फक्त हिमनगाचे वरचे दिसणारे टोक आहे. हे प्रकार जिल्ह्यातील अनेक धान खरेदी केंद्रांवर मागील काही वर्षांपासून सर्रास सुरू आहेत. सापडला तो चोर आणि वाचला तो साव, या न्यायाने यातून जे सहीसलामत बाहेर आहे, ते चांगलेच गब्बर झाले आहेत. या महामंडळाची निर्मिती शेतकर्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, श्रमाचा योग्य मोबदला मिळून तो सुखी संपन्न व्हावा यासाठी झाली की, इथल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मधल्या मध्ये मलिदा लाटून कोट्यवधींची माया जमवण्यास मदत करायला झाला हेच कळायला मार्ग नाही.
महाराष्ट्र सहकारी आदिवासी विकास महामंडळातील भ्रष्टाचाराची नवनवी प्रकरणे बाहेर येत आहेत. पण या महामंडळाशी जुळून असलेले राईस मिलर्सही काही कमी नाहीत. अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आपले उखळ कसे पांढरे करून घ्यायचे याची कला त्यांनी चांगलीच अवगत केली आहे.
या महामंडळाचा भरडईसाठी येणारा उच्च दर्जाचा धान दाबून ठेवायचा आणि आपल्याकडचा निकृष्ट धान महामंडळाला द्यायचा. मग तो चांगला धान भरडई करून बाजारात चढ्या दराने विकायचा, हा अनेकांचा गोरखधंदा आहे. शिवाय काही राईस मिलर्सच्या गिरण्या रात्रंदिवस सुरू असताना त्यांचे वीजबिल नगण्य कसे येते, या चमत्काराचा खुलासा होण्याचीही गरज आहे. त्यामुळे आता राईस मिलर्सही सरकारच्या रडावर यायला हवेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.