Mahayuti : Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Sarkarnama
विश्लेषण

Devendra Fadnavis Politics : देवेंद्र फडणवीसांचा 'मोठा गेम'; अजितदादा, एकनाथ शिंदे गाफील!

Mahayuti BJP Incoming NCP Shivsena: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची सुत्र हाती घेतल्यापासून पद्धतशीरपणे मित्रपक्षांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. भाजपमध्ये होणार इन्कमिंग त्याचसाठी होत असल्याचे देखील बोलले जात आहे.

Roshan More

Mahayuti Politics: राज्यात महायुतीचे सरकार आहे. मुख्यमंत्रि‍पदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रिपदी अजित पवार, एकनाथ शिंदे आहेत. विधानसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळेल येवढ्या जागा देखील मिळालेल्या नाहीत.

महायुतीला सत्तेत येऊन नऊ महिन्यांहून अधिक कालावधी लोटलाय. मात्र, या कालवधीचा विचार केला तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा पद्धतशीर गेम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडून केला जात असल्याच्या चर्चा आहेत.

भाजपला विधानसभेत 132 जागा मिळाल्या. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद मिळाले. मात्र, सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू केले.

हे इन्कमिंग फक्त विरोधी पक्षांच्या मतदारसंघातून नव्हते तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचे जिथे विद्यमान आमदार आहेत तेथूनही मोठे नेते भाजपमध्ये घेतले जात आहेत. उदाहरणनच द्यायचे झाले तर, भोर-मुळशी मतदारसंघात अजिदादांच्या राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर विद्यमान आमदार आहेत. तेथे काँग्रेसकडून निवडणूक लढून पराभूत झालेले संग्राम थोपटे यांना भाजपने आपल्या पक्षात घेतले.

पुरंदरमध्ये एकनाथ शिंदे यांचे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्याकडून पराभूत झालेले संजय जगताप यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. भाजपमध्ये प्रवेश दिलेल्यांची यादी भलीमोठी आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील पराभूत झालेल्या मोठ्या नेत्यांना देखील भाजपमध्ये प्रवेश दिलाय जातोय.

शिंदे, अजितदादांच्या आमदारांच्या विरोधात रणनीती

मतदारसंघनिहाय विचार केला तर जेथे अजित पवार आणि एकनाथ शिंदेचे आमदार ताकदवान आहेत त्या मतदारसंघात काँग्रेस, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्यांना आपल्या पक्षात घेत भाजप त्यांना ताकद देत आहे. एका मर्यादेच्या पलिकडे अजितदादा आणि शिंदेंच्या आमदारांची ताकद वाढणार नाही याची काळजी पद्धतशीरपणे घेतली जात आहे.

कैलास गोरंट्याल हे शिंदेचे आमदार अर्जुन खोतकर यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. गोरंट्याल भाजपमध्ये आल्याने खोतकर हे फक्त आपल्याच मतदारसंघात अडकून पडतील याची काळजी घेतली जात आहे. शंभूराज देसाई यांचे कट्टर विरोधक सत्यजितसिंह पाटणकर यांना भाजपमध्ये प्रवेश देत स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत जेथे भाजपचे ताकद नाही त्या मतदारसंघात भाजपला मजबूत केले जात आहे.

निवडणूक महायुतीमध्येच लढणार

आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 28 जुलैला वर्ध्यात विदर्भाची मंथन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की येणारी स्थानिक स्वराज संस्था निवडणूक ही महायुती म्हणूनच लढायची. जिथे काही अडचण असेल तेथे आपण चर्चा करून निर्णय घेऊ.

भाजप हा आता सर्वात शक्तिशाली पक्ष आहे. विरोधकांमध्ये ताकद नसल्याचे दिसून येत आहे. तरीसु्द्धा आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणूक महायुतीमध्ये लढण्याची घोषणा करत भाजपसमोर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आणि अजितदादाच्या राष्ट्रवादीचे आव्हान उभे राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

जर, महायुतीमधील तीन पक्ष स्वतंत्र लढले असते तर त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. कारण भाजपची बूथ यंत्रणा आता सर्वात शक्तिशाली आहे. मात्र, विरोधकांसोबत मित्र पक्षांदेखील वाढण्यास संधी मिळू नये म्हणून ही खेळ असल्याचे बोलले जात आहे.

मिशन 2029 ची भाजपची तयारी

गृहमंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळीच घोषणा केली होती की ही निवडणुकीत महायुतीत तर 2029 ची निवडणूक स्वबळावर. शाहांची ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठीच भाजपच सगळी यंत्रणा आत्तापासूनच कामाला लागल्याचे चित्र आहेत. विरोधी पक्षांकडे निवडणूक लढण्यासाठी सक्षम उमेदवारच राहणार नाही याची पुरेपूर काळजी भाजपकडून घेतली जात असून आपल्याच विरोधात लढलेल्या उमेदवारांना आपल्या पक्षात घेतले जात आहे.

सांगलीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना नुकताच भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. जिथे पक्ष मजबूत आहे तेथे देखील इन्कमिंग सुरूच आहे. भाजप कुठलीच रिस्क घ्यायला तयार नाही. त्यामुळेच अजितदादा आणि एकनाथ शिंदेंची ताकद वाढू न देण्याची रणनीती दिसते.

एका मर्यादेपलिकडे हे पक्ष वाढले नाही तर त्यांचे देखील आव्हान आगामी काळात भाजपला राहणार नाही याची जाणीव भाजपच्या रणनीतीकारांना आहे. म्हणूनच हे पक्ष मजबूत होणार नाहीत याची काळजी घेत असल्याचे प्रथमदर्शनी तरी दिसते.

भाजपचा इतिहास काय सांगतो?

भाजपच्या बाबतीत बोलले जात की भाजप हा मित्र पक्षांना संपवतो किंवा कमजोर करतो. 2020 मध्ये बिहार विधानभा निवडणुकीत नितीश कुमार यांना कमजोर करण्यासाठी भाजपने चिराग पासवान यांना फूस लावला. नितीश यांचे जेथे उमेदवार उभे होते तेथे चिराग यांनी आपले उमेदवार उभे केले. त्याचा फायदा भाजपला झाला.

नितीश कुमार हे पुन्हा मुख्यमंत्री झाले मात्र त्यांचा आमदारांची संख्या घटली. भाजपसोबत असलेल्या अकाली दलाची अवस्था आता काय आहे. 2014 मध्ये शिवसेनेची साथ सोडून भाजपने स्वबळावर लढली. त्यामुळे भाजपचा इतिहास हा मित्र पक्षांना संपवण्याचा असल्याची टीका विरोधकांकडून केली जाते.

महायुतीत सत्तेची सूत्रं हाताळताना देवेंद्र फडणवीस आणि भाजप पद्धतशीर राजकीय डावपेच आखत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विरोधी पक्षांतील तसेच मित्रपक्षांतील नेत्यांना आपल्या गोटात खेचून, स्थानिक पातळीवर आमदार-नेत्यांची ताकद संतुलित ठेवत, 2029 पर्यंतचा दीर्घकालीन ‘स्वबळावर’चा रोडमॅप आखला जातोय.

त्यामुळे पुढील काही वर्षांत महायुतीतील सत्तासंतुलन कायम राहील पण 2029 ची विधानसभा निवडणूक जवळ येताच देवेंद्र फडणवीस हे अजितदादा आणि शिंदेंचा गेम केला तर नवल वाटायला नको.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT