विश्लेषण

आता विरोध असला तरी उमेदवार निश्‍चितीनंतर मतभेद नसतील - धनंजय मुंडे

सरकारनामा ब्युरो

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला आलेल्या काही मतदारसंघात स्थानिक उमेदवाराला विरोध आहे. पण तो टोकाचा नाही. घराघरात भांड्याचा आवाज येतोच त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वेगळा नाही. उमेवार निश्‍चित होईपर्यंत ही मतभिन्नता राहते. एकदा उमेदवार निश्‍चित झाला की मतभेद राहात नाही. त्यामुळे सातारा, कोल्हापूर व माढ्यात मतभेद राहणार नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते व विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी दिले. 

कागल (जि. कोल्हापूर) येथे कार्यक्रमासाठी जाताना श्री. मुंडे आज येथील शासकीय विश्रामगृहात थोडावेळ थांबले होते. यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. भोजन केल्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. ते म्हणाले, सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांची घोषणा योग्य वेळेलाच होईल. राष्ट्रवादीची यादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच जाहीर करतील. ज्या ठिकाणी आम्ही लढणार आहोत तेथील स्थानिक नेत्यांशी श्री. पवार यांनी स्वत: चर्चा केली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी अडचणी आहेत तेथे स्थानिक आमदार व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार आहे. काही ठिकाणी विरोध आहे, पण तो टोकाचा नाही. घराघरात भांड्याचा आवाज येतोच. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस हा वेगळा पक्ष आहे, असे नाही. कुठल्याही राजकीय पक्षामध्ये उमेदवार निश्‍चित होईपर्यंत मतभिन्नता असते. एकदा उमेदवार निश्‍चित झाला की पक्षातील सर्वजण ताकतीने तो उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात. मग तो सातारा असो, माढा असो किंवा कोल्हापूर असो. उमेदवार निश्‍चित झाल्यावर कोणाच्याही मनात काही शंका राहणार नाही, असे ही त्यांनी स्पष्ट केले. 

विश्रामगृहातून कोल्हापूरकडे निघताना त्यांनी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्याशी चर्चा केली. यावेळी प्रदेश सचिव मोहन भोसले, स्वप्निल डोंबे, रविंद्र महाडिक, विवेक निकम, बाळासाहेब महामुलकर, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT