विश्लेषण

पंचायत राज समितीला लाच देणाऱ्या धुळ्याच्या डेप्युटी सीईओला अटक  

निखिल सूर्यवंशी : सकाळ वृत्त सेवा

धुळे   : दौऱ्यावर असलेल्या पंचायत राज समितीच्या सदस्य आमदाराने शुक्रवारी सायंकाळी साडेपाचला येथील जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास लाच प्रकरणी पकडून दिल्याने खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संबंधित अधिकाऱ्यास ताब्यात घेतले आहे. 

पंचायत राज समिती तीन दिवसांपासून दौऱ्यावर आहे. तिचा शुक्रवारी अंतिम दिन होता. दौऱ्यात 23 पैकी राज्यातील ठिकठिकाणचे 16 सदस्य आमदार सहभागी झाले. समितीप्रमुख आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हा परिषदेत दुपारी कामकाज आटोपल्यानंतर संबंधित सदस्य आमदार शहरातील हॉटेल झंकार पॅलेसमधील मुक्कामाच्या ठिकाणी परतले. अशात सायंकाळी साडेपाचला आमदारास लाच देताना जिल्हा परिषदेचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी ताब्यात, अशी वार्ता पसरली. 

आमदार पाटलांची तक्रार 

समितीस्तरावर आणि अधिकारी स्तरावर मौन बाळगले जात असताना नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांना पकडून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आमदार पाटील यांना दीड लाखाची लाच देण्याचा प्रयत्न माळी यांच्याकडून झाल्याचा आरोप आहे. माळी यांना पकडून ठेवल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक हॉटेल झंकार पॅलेसमध्ये पोहोचले. त्यांनी माळी यांना ताब्यात घेतले.

आठवड्यापूर्वी माळी येथील जिल्हा परिषदेत रुजू झाले होते. त्यांनी शिरपूरला गटविकास अधिकारी, नंदुरबार येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळलेला आहे. आमदार पाटील यांनी तक्रार केल्यावर ही कारवाई झाली. त्यांना "प्रेमाची भेट' देण्याचा प्रकार अधिकारी माळी यांना चांगलाच महागात पडला आहे. आमदार पाटील हे मूळचे कापडणे (ता. धुळे) येथील रहिवाशी आहेत, हे विशेष!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT