Nana Patole, Ashok Chavan sarkarnama
विश्लेषण

जयंत पाटील आणि अजितदादांनी काँग्रेसमध्येच भांडणाची वात लावली...

आघाडीचे सरकार असताना निर्णय झाल्यावर नेहमी समाधानी राहायचे असते.

अमोल जायभाये

मुंबई : महापालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेवरुन महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरु असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीला (Ncp) तीन सदस्यांचा प्रभाग मान्य नसला तरी शिवसेनेने (Shiv Sena) हा मुद्दा आपल्या मताप्रमाणे पूर्णत्वास नेला आहे. (differences in shivsena ncp and congress over ward structure)

या निर्णयावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्ती करत प्रदेश कार्यकारिणीत तसा सरकारच्या निर्णयाविरोधात ठरावही केला. मात्र, नानांच्या मनसुब्यांना त्यांच्याच पक्षातून सुरूंग लावण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर दोन वेळा चर्चा झाली. त्या वेळी त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. तीन सदस्यांच्या प्रभागाला काँग्रेसचा विरोध होता तर या मंत्र्यांनी बैठकीत तसा विरोध नोंदविला का, असा प्रश्न उपस्थित झाला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरमध्ये बोलताना उलट काँग्रेसच्या मंत्र्यांनीच चार सदस्यांचा प्रभाग करा, अशी सूचना केल्याचे सांगत गौप्यस्फोट केला होता. जयंत पाटलांच्या या विधानानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मंत्र्यांचे नाव घेऊन जयंत पाटलांच्या म्हणण्याला पुष्टी दिली. अशोक चव्हाण यांनी चार सदस्यांचा प्रभाग करा, अशी सूचना केल्याचे अजितदादांनी उघडपणे सांगितले. अजितदादांनी अशोक चव्हाणांचे नाव सांगून नानांच्या प्रस्तावाला काँग्रेसमधूनच कोण सुरूंग लावत होते, हे उघड केल्याचे बोलले जात आहे.

नाना आणि काँग्रेसमधील इतर नेत्यांचे फारसे पटत नाही, उघड सत्य आहे. पण मंत्रीमंडळाच्या बैठकीतही नानांचा आग्रह असलेल्या विषयांना त्यांचेच मंत्री कसे फाटे फोडतात, हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उघड केले आहे. अशोक चव्हाण यांना नांदेडची सत्ता महत्वाची आहे. त्यामुळे त्यांनी तेथील स्थानिक समीकरणे लक्षात घेऊन चार सदस्यांचा प्रभागाची सूचना केली असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे नानांना प्रमुख शहरांत काँग्रेसची ताकद वाढवायची आहे. तेथे स्वबळावर ताकद राखून असलेल्या नेत्यांचा मोठ्या प्रभागात निभाव लागत नाही. उलट एक किंवा दोन सदस्यीय प्रभागात हे नेते जिंकून येणे सोपे होते. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचा छोट्या प्रभागासाठी आग्रह होता. मात्र शिवसेनेने दोन्ही काँग्रेसच्या मताला फारशी किंमत न देता तीन सदस्यांच्या प्रभागाचा विषय हा राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवून दिला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या निमित्ताने काँग्रेसच्या नेत्यांत भांडणे लावून दिल्याचा मोका साधला.

अजित पवार यांनी या निमित्ताने काँग्रेस नेत्यांना चिमटेही काढले. ते म्हणाले, आघाडीचे सरकार असताना निर्णय झाल्यावर नेहमी समाधानी राहायचे असते. त्यात पुन्हा वेगळे वक्तव्य करुन कारण नसताना गैरसमज पसरावयाचे नसतात. निर्णय होत नाही तोपर्यंत सर्वजण आपली भूमिका प्रकर्षाने मांडत असतात. मात्र, निर्णय घेतला की त्या निर्णयाचे समर्थन आम्ही करत असतो. त्यामुळे हा त्रिसदस्यीय प्रभाग रचना निर्णय आता महाविकास आघाडी सरकारचा झाला आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी राज्यात होईल. मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला. कोणाचाच विरोध नव्हता मात्र, वेगवेगळी मत होती. काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले चारचा प्रभाग करा. सगळ्यांचे ऐकून घेऊन मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी काय करायचे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, मंत्रिमंडळामध्ये काँग्रेसचे इतर मान्यवर होते. त्यामुळे या निर्णयाने आकाश कोसळले, असे मानायचे कारण नाही``

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT