Sonia Gandhi - Prakash Ambedkar
Sonia Gandhi - Prakash Ambedkar 
विश्लेषण

प्रकाश आंबेडकरांवर अवलंबून न राहता कामाला लागा : काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी खडसावले

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने सोबत यावे, यासाठी कॉंग्रेसच्या प्रदेशपातळीवरील नेत्यांनी प्रकाश आंबडेकरांच्या चालविलेल्या मिन्नतवाऱ्यांमुळे संतप्त झालेल्या पक्षश्रेष्ठींनी, "आंबेडकरांवर अवलंबून न राहता कामाला लागा,'' अशा शब्दांत खडसावल्याचे समजते. 

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा सपाटून पराभव झाल्यानंतर प्रदेशपातळीवरील काही नेत्यांनी तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधींसमोर झालेल्या आढावा बैठकीत या पराभवाला प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी जबाबदार असल्याचे म्हटले होते. वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या मतांची टक्केवारी पाहता लोकसभेच्या सुमारे डझनभर जागा कॉंग्रेसला केवळ 'वंचित'च्या उमेदवारांमुळेच गमवाव्या लागल्याचे रडगाणेही या नेत्यांनी गायले होते. 

त्यावर, "वंचित'वर खापर फोडण्याऐवजी कॉंग्रेसला जनतेने का स्वीकारले नाही? याचा विचार करा, असे राहुल गांधींनी फटकारले होते. तसेच अशा संभाव्य आघाडीची शक्‍यताही फेटाळून लावली होती. राज्याचे प्रभारी सरचिटणीस मल्लिकार्जुन खर्गे यांनीही आंबेडकरांशी चर्चेला साफ नकार दिला होता. दुसरीकडे, सोनिया गांधींनी कॉंग्रेसमधीलच दलित आणि अल्पसंख्याक नेत्यांना पुढे आणण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. 

'वंचित आघाडी'चे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या जागावाटपाच्या अवाजवी मागण्या आणि कॉंग्रेसला तुच्छ लेखण्याच्या प्रकारामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते, नेत्यांमध्ये नाराजी आहे. आंबेडकरांनी आघाडीसाठी निम्म्या म्हणजे 144 जागांची मागणी करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसशी मैत्री तोडण्याची पूर्वअटही घातली होती. अर्थातच, कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतची आघाडी संपुष्टात आणण्याची कोणतीही पूर्वअट धुडकावून लावली. त्यानंतरही प्रदेशस्तरावरील नेत्यांनी 'वंचित'शी हातमिळवणीचा चालविलेला प्रयत्न आणि प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेसला दिलेली हेटाळणीची वागणूक याबाबत सर्वसामान्य कार्यकर्ते आणि नेत्यांकडून तक्रारी आल्यानंतर केंद्रीय नेत्यांनी राज्यातील नेत्यांना या बोटचेपेपणाबद्दल कानपिचक्‍या दिल्याचे समजते. 

दरम्यान, काही प्रदेश नेत्यांनी पक्षश्रेष्ठींच्या कानावर राज्यातील परिस्थिती घालताना अल्पसंख्याक समाजाला किमान वीस जागा मिळाव्यात; तर दलित, मागासवर्गीयांना त्यांच्या राखीव जागा वगळून आणखी अतिरिक्त जागा द्याव्यात, अशी सूचना केली आहे. या व्यूहरचनेतून प्रकाश आंबेडकरांचा प्रभाव कमी करता येईल, असा प्रस्ताव पुढे आल्याचे कॉंग्रेस सूत्रांनी सांगितले. 

सव्वाशेचा फॉर्म्युला निश्‍चित?
विधानसभेच्या 288 जागांपैकी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रत्येकी 125 जागा लढण्यास मान्यता दिल्याचे आणि उर्वरित 38 जागा मित्रपक्षांना देण्याचा 'फॉर्म्युला' निश्‍चित झाल्याचे समजते. अर्थात, दोन्ही कॉंग्रेसकडून अद्याप या माहितीला दुजोरा मिळालेला नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT