विश्लेषण

नागपूर मेडिकलमध्ये रुग्णाच्या अन्नात शेण, मुख्यमंत्र्यांची दोषींच्या निलंबनाची घोषणा

अतुल मेहेरे

नागपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) किचनमधून वॉर्डात रुग्णांना दिलेल्या जेवणातून शेणसदृश गोळा निघाला. यामुळे एकच खळबळ उडाली. हा किळसवाणा प्रकार येथील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये घडला. दुर्गंधीयुक्त गोळा तपासणीसाठी आहारतज्ज्ञाकडे देण्यात आला असल्याची माहिती आहे. आज सद्यस्थितीत या प्रकरणाची चौकशी "सुपर स्पेशालीटी'मध्ये सुरु आहे. दरम्यान याप्रकरणी चौकशी करुन दोषींना निलंबित करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

प्रशासनाकडून तातडीने या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. परंतु ही वस्तू शेण की माती याबाबतचे सारे आरोप प्रशासनाने नाकारले असून सुपारी असल्याचे सांगण्यात येत आहे. उमेश पवार असे रुग्णाचे नाव आहे. त्याच्यावर अस्थिव्यंगोपचार विभागाच्या वॉर्ड क्रमांक 2 मधील खाट क्रमांक 20 वर मागील दहा दिवसांपासून उपचार सुरू आहेत. मंगळवारी सांयकाळी रुग्णांना जेवण देणारी गाडी वॉर्डासमोर आली. कर्मचाऱ्यांनी आवाज दिला. पोळी, पालकाची दाळभाजी, भात या पदार्थांचा समावेश होता. जेवण करताना रुग्णालाएका सुपारीच्या आकाराचा नरम गोळा तोंडात गेला. काहीतरी चुकीची वस्तू असल्याचे दिसून आले. यामुळे ही नरम वस्तू सुपारी आहे की शेण आहे की मातीचा गोळा, यावर चर्चा करतानाच या वस्तूची दुर्गंधी येत असल्याने रुग्णाचे नातेवाईक संतप्त झाले. त्वरित वॉर्डातील इन्चार्ज सिस्टरकडे तक्रार केली. परिचारिकेने ही माहिती वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाला दिली.

अधिकाऱ्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बुधवारी एक अंतर्गत समितीच्या सहकार्यातून चौकशी सुरू केली आहे. 2010 पर्यंत मेडिकलमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत असताना दर दिवसाला
किचनमधून आलेले "ताट' तपासण्यात येत असे. जेवण तयार होत असताना आकस्मिक भेट हे अधिकारी देत असत. परंतु अलीकडे किचनमधील हे सारे व्यवहार ठप्प पडल्याची माहिती आहे.

विशेष असे की अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या अस्थिरोग विभागाच्या वॉर्डातील हे प्रकरण असल्याने गांभीर्य वाढले आहे. किचनची संपूर्ण जबाबदारी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाची आहे. किचनचा व्यवहार
सांभाळण्यासाठी खास वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती कावळे यांची नेमणूक केली. मात्र सध्या वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाचा सारा कारभार आलबेल आहे. वैद्यकीय अधिकारी वातानुकूलित वातावरणाचा आनंद घेत 75 हजार रुपये महिन्याचे वेतन घेत दिवसभर कार्यालयात कागदी घोडे नाचवण्यापलीकडे काही करीत नाहीत. महिनाभरापूर्वी किचन उशिरा उघडण्याचा मुद्दा चांगलाज गाजला होता. पण त्यानंतरही संबंधितांना साधा जाबही विचारला गेला नाही. त्यामुळेच असे प्रकार वारंवार घडत असल्याची चर्चा येथे आहे.

मेडिकलच्या किचनमध्ये दररोज दीड हजार रुग्णांचे जेवण तयार होते. स्वच्छतेसह सुरक्षेची काळजी घेतली जाते. रुग्णाच्या जेवणात शेण किंवा मातीसदृश गोळा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र तक्रार आल्यामुळे
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत चौकशी समिती गठित करण्यात आली. अहवालानंतर वास्तव पुढे येईल, असे मेडिकलच्या अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT