Uddhav Thackeray News, CM Eknath Shinde News, Supreme Court News Sarkarnama
विश्लेषण

धनुष्यबाण मिळविण्यासाठी एकनाथ शिंदे यांना गाठायचाय 188 चा आकडा!

Eknath Shinde : शिवसेना संघटनेत दोन तृतीयांशने फूट पाडण्यासाठी कसोशीने प्रयत्न

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेचे (Shiv sena) केवळ आमदार किंवा खासदार हेच फुटलेले नाही तर पक्षातच उभी फूट पडल्याचे दाखविण्याच्या प्रयत्नात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या आहेत. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याकडे घेण्यासाठी शिंदे यांनी जोरदार पावले त्यामुळेच टाकली आहेत. त्यासाठी त्यांना प्रतिनिधी सभेतील किमान 188 सदस्य आपल्यासोबत हवे आहेत. पक्षांतरबंदी कायद्यानुसार केवळ आमदार, खासदार फुटले म्हणजे पक्षात फूट पडली असे होत नाही. त्यासाठी संघटनेतही फूट असणे आवश्यक असते. शिवसेनेच्या महत्वाच्या मानल्या गेलेल्या प्रतिनिधी सभेत 282 सदस्यसंख्या आहे. त्याच्या दोन तृतीयांश म्हणजे 188 सदस्य शिंदे यंना हवे आहेत.

त्यातील पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा येथे शिंदे यांचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. बहुतांश जिल्हा परिषदा आणि महापालिका बरखास्त असल्याने तेथील नगरसेवक किंवा सदस्य फोडूनही त्याची नोंद कायदेशीरदृष्ट्या घेतली जाणार नाही. त्यामुळे आता संघटनेतील फोडाफोडीकडे पुढील काळात लक्ष राहील.

शिवसेनेच्या घटनेत ‘शिवसेनाप्रमुख ते शाखाप्रमुख’ अशी एकूण १३ पदे आहेत. आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि मुंबई विभाग यांची मिळून एक प्रतिनिधी सभा आहे. या प्रतिनिधी सभेमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीतील एकूण १४ सदस्यांपैकी ९ सदस्यांना निवडून देण्याचे अधिकार आहेत. तर, उर्वरित पाच जागा निवडून देण्याचे अधिकार पक्षप्रमुख यांना दिले गेले आहेत. या निवडीचा कालावधी हा ५ वर्षांचा आहे. या पदाच्या प्रत्येक टप्प्यावर पक्षात फूट पडलेली दाखविण्यासाठी विविध मार्ग अवलंबिण्यात येत आहेत.


शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य हे पक्षनेते असतात. सध्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत आणि गजानन कीर्तिकर यांचा समावेश आहे. तर, पक्षप्रमुख म्हणून मिळालेल्या अधिकारानुसार उद्धव ठाकरे यांनी अनंत गीते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ आणि एकनाथ शिंदे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत घेतले आहे.

राष्ट्रीय कार्यकारिणीतील एकूण १४ नेत्यांपैकी सुधीर जोशी यांच्या निधनामुळे एक जागा रिक्त झाली आहे. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना असलेल्या अधिकारात एकनाथ शिंदे यांची शिवसेनेमधून हकालपट्टी केली आहे. आनंदराव अडसूळ व रामदास कदम यांचीही पक्षप्रमुखांनी दोन दिवसांपूर्वी हकालपट्टी केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीत आता उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्य उरले आहेत.


एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतरही मूळ शिवसेना पक्ष म्हणजे आमचा गट असल्याचा दावा करीत आहेत. शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आणि शिवसेना हा पक्ष आपल्या ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे गट पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहे. शिवसेनेच्या २८२ जणांच्या प्रतिनिधी सभेच्या सदस्यांपैकी किमान २५० प्रतिनिधी सदस्यांचा एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा मिळाला तर शिवसेना अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी शिंदे गट निकराने प्रयत्न करीत आहे. त्यामुळे शिवसेनेतील राष्ट्रीय कार्यकारिणीतील प्रमुख नेत्यांनाच आपल्याकडे वळवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT