election commission transfers additional director general of bengal
election commission transfers additional director general of bengal  
विश्लेषण

आचारसंहिता लागू होताच बंगालमध्ये ममतांना बसला मोठा धक्का

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाकडून पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांत विधानसभेच्या निवडणुका 27 मार्च  ते 29 एप्रिल या कालावधीत होणार आहेत. या तारखांची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली असून, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठा धक्का बसला आहे. राज्यातील निवडणुकीसाठी नोडल अधिकारी असलेल्या ममतांच्या मर्जीतील बड्या पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेस सत्तेत असून ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री आहेत. 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत तृणमूलला 294 पैकी 211 जागा मिळाल्या होत्या. तर डावे पक्ष व काँग्रेसचे 76 उमेदवार निवडून आले होते. भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र, या वेळी भाजपने सत्तापालट करण्यासाठी जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने 42 पैकी 28 जागा जिंकल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. सध्या तृणमूल विरुध्द भाजप असेच चित्र दिसत आहे. डावे पक्ष व काँग्रेसची आघाडी या निवडणुकीतही कायम राहणार आहे. 

आचारसंहिता लागू होताच बंगालचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) जावेद शमीम यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी महासंचालक (अग्निशमन) जगमोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडे (कायदा व सुव्यवस्था) राज्याचा नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी असते. याचबरोबर निवडणूक आयोगाशी निवडणुकीशी निगडित समन्वय ठेवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असते. आता शमीम यांची बदली करण्यात आल्याने ममतांना मोठा धक्का बसला आहे. 

याचबरोबर निवडणूक आयोगाने बंगालमधील निवडणुकीसाठी विशेष निरीक्षक म्हणून विवेक दुबे आणि मृणाल कांती दास यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ते राज्यात पोचण्याआधीच शमीम यांची बदली झाली आहे. तीन आठवड्यांपूर्वी शमीम यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. राज्यात तैनात असलेल्या केंद्रीय दलांशी समन्वय साधण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. आता त्यांना पोलीस महासंचालक (अग्निशमन) या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

बंगाल विधानसभा निवडणूक कार्यक्रम : 
मतदान : पहिला टप्पा 27 मार्च, दुसरा टप्पा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पा 17 एप्रिल, सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिल, आठवा टप्पा  29 एप्रिल 

मतमोजणी : 2 मे 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT