Sangli News : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 27 मार्चला निवडणूक होणार असून याच सांगली जिल्ह्यातील एक जागा आहे. आमदार गोपीचंद पडळकर विधानसभेवर गेल्याने आता त्यांची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे भाजप आता त्यांच्या जागी जिल्ह्यातील निष्ठावंताला संधी देणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दोन दशकांहून अधिक काळ या संधीची वाट पाहणारी भाजपची मंडळींना पक्षश्रेष्ठींकडून ‘बोलावणे येईल का,’ असा विचार करत आहेत.
विधानसभा निवडणुकीत विधान परिषद सदस्य असलेले पाचजण विजयी झाले. त्यात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके व रमेश कराड यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राजेश विटेकर, शिवसेनेचे आमशा पाडवी यांच्या जागा रिक्त झाल्यात. या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक आहे. महाविकास आघाडीच्या एकूण सदस्य संख्येचा आकडा पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दाट आहे. अशावेळी भाजप जिल्ह्यातील निष्ठावंतापैकी कोणाला संधी देणार का? अशी चर्चा रंगली आहे. मात्र भाजपने तीन नावे निश्चित केल्याचे कळत आहे. यात दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांची नावे चर्चेत असून ही नावे दिल्लीला पाठवण्यात आली आहेत.
दरम्यान सन 2020 साली विधान परिषदेची निवडणूक झाली होती. त्यावेळी भाजपच्या केंद्रीय समितीने ज्येष्ठ नेत्यांच्या ऐवजी नव्या चेहऱ्याला पसंती दिली होती. त्यामुळे पडळकर यांना लॉटरी लागली होती. तर त्यांच्यामागे असणाऱ्या धनगर समाजाची वोट बँकेमुळेच त्यांना ही संधी देण्यात आली होती. याआधी त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा लढली होती. त्यानंतर त्यांनी विधानसभा लढवली आणि ते विधानसभेवर गेले यामुळे त्यांची जागा रिक्त झाली आहे.
दरम्यान गेली दोन दशक विधान परिषद सांगली जिल्ह्याकडे राहिली असून ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख विधानपरिषदेचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपने पृथ्वीराज देशमुख यांना पाठवले. ते जेमतेम दीड दोन वर्षच असतील, तोच 2020 साली पडळकर यांना संधी देण्यात आली. यामुळे आता पुन्हा संधी मिळणार का याकडे जिल्ह्यातील निष्ठावंतांचे लक्ष लागले आहे.
गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ भाजपचे काही निष्ठावंत ‘यू आर इन अ क्यू’, असे ऐकत आहेत. ‘मेरा नंबर अब आयेगा’, असा सवाल सतत विचारत आहेत. त्यात संघटन मंत्री आणि पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाच्या बांधणीत महत्वाचे अधिकार असलेले मिरजेचे मकरंद देशपांडे यांचे नाव नेहमी चर्चेत असते. भाजपची ताकद कमी होती तेव्हा पक्षाकडून लढणाऱ्या आणि आता सत्ताकाळात दुर्लक्षित झालेल्या नीता केळकर, शेखर इनामदार यांना कधीतरी पक्षाचे लक्ष आपल्या त्यागाकडे जाईल, असे वाटत आले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत माघारीसाठी पक्षश्रेष्ठींच्या शब्दाचा मान ठेवणारे सम्राट महाडिक, शिवाजी डोंगरे यांनाही योग्य सन्मान देण्याचा पक्षाने शब्द दिला आहे. पण आता संधी कधी मिळणार याची वाट हे नेते पाहत आहेत.
भाजपकडून महत्वाच्या संधी देताना धक्कातंत्र वापरणे नवे नाही, मात्र त्यासाठी काही समीकरणे जुळावी लागतात. गोपीचंद पडळकर यांना संधी देताना त्यांच्या मागे धनगर समाजाची असलेली ताकद मोजली गेली. पडळकरांची आक्रमकता विरोधकांना नामोहरम करायला उपयुक्त ठरत गेली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पाडणारे आणि राजू शेट्टींना धक्का देणारे सदाभाऊ खोत शेतकरी नेते म्हणून भाजपला जवळचे वाटले. पक्ष संघटनेतील वादात संयमाने हाताळणी करण्याची हातोटी असणाऱ्या पृथ्वीराज देशमुख यांनाही पक्षाने संधी दिली. आता अशी समीकरणे जुळणारा नवा चेहरा जिल्ह्यात आहे का? कदाचित ही चाचपणीही भाजप करत असता.
जिल्ह्यातून विधान परिषदेवर प्रत्यक्ष निवडणुकीतून निवडले गेलेले सदाभाऊ खोत हे सत्ताधारी पक्षातील एकमेव आमदार आहेत. राष्ट्रवादीचे इद्रिस नायकवडी राज्यपाल नियुक्त आमदार आहेत. भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तडजोडीत अनेकांना ‘शब्द’ दिला. त्यात जिल्ह्यातील काही मान्यवरांचाही समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.