abhimanya kale
abhimanya kale 
विश्लेषण

रेमडिसिव्हर इफेक्ट : FDA आयुक्त अभिमन्यू काळेंना हटवले; सर्व मंत्र्यांचे चेहरे उजळले!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यातील रेमडिसिव्हर इंजेक्शनच्या टंचाईचे खापर अखेर अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यावर फोडण्यात आले असून त्यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. या इंजेक्शनच्या टंचाईमुळे राज्य हैराण झाले आहे. त्यात काळे यांनी योग्य भूमिका न वठविल्याने राजकीय वादही पेटल्याचे मत झाले. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काळे यांच्या बदलीची मागणी केली होती. त्यानुसार काळेंऐवजी तेथे परिमलसिंग यांची नियुक्ती झाली आहे. ``हा काळे कसा दिसतो हे मी पाहिले नाही. मात्र त्यांच्या बदलीमुळे सर्व मंत्र्यांचे चेहरे खूष झाले आहेत``, अशा शब्दांत आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.

या इंजेक्शनच्या टंचाईमुळे राज्य सरकारविरोधात नाराजीचे वातावरण तयार झाले होते. इतर राज्ये त्याचा योग्य पुरवठा करत असताना महाराष्ट्रातच इतकी हतबलता का, असा प्रश्न विचारला जात होती. मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीतही त्याचे पडसाद उमटले. या इंजेक्शनची निर्यातबंदी होऊनही ती उपलब्ध का होत नाहीत, याचे उत्तर मिळत नव्हते. तसेच दुसरीकडे भाजप हे इंजेक्शन आणून देत असल्याचा दावा करत होते. आॅक्सिजन आणि रेमडिसिव्हरच्या टंचाईमुळे जनता हैराण झाली होती आणि सत्ताधाऱ्यांना रोज त्याबद्दल शेलक्या शब्दांत प्रतिक्रिया ऐकाव्या लागत होत्या. 

या साऱ्या प्रकरणावर आव्हाड यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली.  महाराष्ट्र अडचणीत असताना स्वतः च्या परीने काळे यांनी मदत केली नाही. संभ्रमाचे वातावरण तयार केले. अन्न व औषध प्रशासन मंत्री शिंगणे यांनाही मी कारवाई करायला सांगितले होते आणि त्यांनी होकार दर्शवला. `गर्व्हर्मेंट इन अॅक्शन` असे आमचे धोरण आहे. लोकांना जेवण पोचव, लाकडे पोचव, हे काम आम्ही करतो. मुख्यमंत्री झोपत नाहीत. या परिस्थितीत काम न करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांना बाजूला काढणे योग्य आहे.  ही धमकी नाही पण इतर अधिकाऱ्यांना जे काय समजायचे ते समजावे. महाराष्ट्र अडचणीत असताना असे अधिकारी फोन बंद करून बसतात. हा अधिकारी मुजोर होता. (हा शब्द मी मागे घेणार नाही, असेही आव्हाडांनी स्पष्ट केले.) ऑक्सिजन मिळत नाही, फोन केला तर काळेंचा फोन बंद, असा अनुभव आव्हाड यांनी सांगितला. माझ्यातला कार्यकर्ता अजून मेला नाही. तो जिवंत आहे. नोकरशहा आणि सत्ताधारी एकत्र चालायला हवे. हे मी अनुभवाने सांगतो.  जो माणूस 24 तास जागा राहील आणि रेमडेसिव्हील आणून देऊ शकतो असा अधिकारी या जागेवर बसवायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले. हा काळे हा कसा दिसतो. हे मी कधीच पाहिलं नाही. पण त्याच्यावर कारवाई झाली, याचा आनंद सर्व मंत्र्यांच्या चेहऱ्याववर जाणवतो, अशा शब्दांत आव्हाड यांनी आनंद व्यक्त केला.

अभिमन्य काळे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील आहेत. ते एफडीए आयुक्त होण्यापूर्वी पर्यटन खात्यात होते. भंडारा-गोंदिया येथील 2018 च्या लोकसभा पोटनिवडणुकीत काळे हे निवडणूक निर्णय अधिकारी झाले. तेथे झालेल्या तक्रारींमुळे त्यांच्यावर तेव्हा कारवाई करण्यात आली होती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT