विश्लेषण

`शरद पवार यांच्याबद्दलची भीती आता संपली आहे....`

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आदर असला तरी राजकारणातील त्यांच्याविषयीची भीती आता संपली आहे, असा दावा करत राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीचे खिंडार, भगदाड अशा शब्दांतही वर्णन करता येत नसल्याचे भाष्य शिवसेनेने केले आहे.

पवार यांनी राष्ट्रवादीतील फुटीबद्दल मावळ्यांकडे लक्ष द्या, पक्ष सोडणाऱ्या कावळ्यांकडे नको, असे विधान केले होते. त्याविषयी `सामना`या मुखपत्रातून शिवसेनेने भाष्य केले आहे. 

राज्यात 2104 मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीच्या कावळ्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा देत सरकार बनवण्याचे आमंत्रण दिले होते. हा चोंबडेपणा करण्याची त्यांना गरज नव्हती. शरद पवारांनी २०१४ साली जे केले, त्याचेच परिणाम त्यांचा पक्ष आता भोगतोय,' अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढविण्यात आला आहे. 

'जे कावळे राष्ट्रवादीतून उडाले त्यांना इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते,' असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 'पवारांच्या पक्षाला लागलेली गळती हे त्यांच्या आजवरच्या धोरणाचे परिणाम आहेत', असा उल्लेख करत शिवसेनेतून असे अनेक कावळे उडाले. मात्र उ़डाले ते कावळे, राहिले ते मावळे या मंत्रावर सेना उभी असल्याचा दावा यात करण्यात आला आहे.

'राष्ट्रवादीच्या कावळ्यांनी तेव्हा फालतू काव काव केली नसती तर पुढच्या पाच वर्षांत महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर वाहताना दिसले असते. 'केला तुका आणि झाला माका' अशी आज राष्ट्रवादीची स्थिती झाली आहे,' हेही त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे. 

'राजकारणात कधीकधी 'पदरी पडले पवित्र झाले' या धोरणानंही वागावं लागतं. मग कावळे काय, राजहंस काय, चालवून घ्यावेच लागतात. महाराष्ट्रात युतीला जिथे गरज आहे, तिथं मावळ्यांचं स्वागत होईलच,' असंही उद्धव यांनी म्हटलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT