आष्टी ः मतदार संघातील कुठल्याही संकटात आणि प्रश्नासाठी धाऊन जाणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांनी बिबट्याच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू झालेल्या पंचायत समिती महिला सदस्याच्या कुटुंबाला वैयक्तिकरित्या पाच लाख रुपयांची मदत करुन पुन्हा एकदा आपल्या संवेदनशिलतेचे दर्शन घडवले. दशक्रिया विधीवेळी दिलेला शब्द पाळत धस यांनी आज धनादेश देऊन गर्जे कुटुंबियांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता केली.
तालुक्यातील सुरुडी येथील रहिवासी व मोराळा पंचायत समिती गणाच्या सदस्या आशा नागनाथ गर्जे यांचे पती नागनाथ गहिनीनाथ गर्जे (वय ३९) यांचा बिबट्याच्या हल्ल्यात २४ नोव्हेंबर रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. नागनाथ गर्जे हे दुपारी सुरुडी येथील त्यांच्या मालकीच्या शेतातील तुरीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. अंधार पडण्याची वेळ होऊनही ते घरी परत न आल्याने गावातील काही लोक त्यांना शेतात पाहण्यासाठी गेल्यानंतर त्यांचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. बिबट्याने आष्टी तालुक्यात घेतलेला हा पहिला बळी ठरला.
दरम्यान, नागनाथ गर्जे हे मनमिळाऊ स्वभावाचे युवा नेते होते. त्यांच्या दुर्दैवी निधनाने तालुक्यात हळहळ व्यक्त झाली. दशक्रिया विधीच्या वेळी आमदार धस यांनी गर्जे कुटुंबाला वैयक्तिकरित्या मदत करणार असल्याचा शब्द दिला होता. त्यानुसार आज सकाळी आष्टी येथील निवासस्थानी धस यांनी (कै.) गर्जे यांच्या पत्नी, पंचायत समिती सदस्या आशा गर्जे, वडील गहिनीनाथ गर्जे यांच्याकडे पाच लाख रुपयांची मदत धनादेशाद्वारे सुपूर्द केली.
नरभक्षक बिबट्याने आष्टी तालुक्यात तीन बळी घेतले. या काळात सुरेश धस यांनी संवेदनशीलता दाखवत लोकांना धीर दिला. तातडीने रात्रीच्या वेळी दाखल झालेल्या वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची जेवणाची व्यवस्था केली. स्वतः शोध मोहिमेत सहभाग घेऊन रात्र जागविली. याशिवाय ग्रामस्थ व प्रशासनात दुवा बनून जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहचविल्या. त्यांच्या प्रयत्नानेच या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळाली होती.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.