G 23 congress leader kapil sibal says party is getting weak
G 23 congress leader kapil sibal says party is getting weak 
विश्लेषण

काँग्रेस दिवसेंदिवस दुबळी होतेय; कपिल सिब्बल यांचा पक्षाला घरचा आहेर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करावा, यासाठी पक्षाच्या  23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाचे कान टोचले होते. आता पाच राज्यांत विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. या पार्श्वभूमीवर या 23 नेत्यांच्या गटाने पुन्हा एकदा पक्षाला आठवण करुन दिली आहे. यातील ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्ष दुबळा होत चालल्याचा घरचा आहेर दिला आहे. 

काँग्रेसच्या नेतृत्वात बदल करण्यासोबत पक्ष संघटनेची फेररचना करावी, अशी मागणी करणारे पत्र 23 ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिले होते. यावरुन मोठा गदारोळ उडाला होता. या नेत्यांनी उघडपणे बंडाची भाषा केल्याची टीका पक्षातूनच त्यांच्यावर करण्यात आली होती. यावर पक्षाच्या हाय कमांडची बैठक होऊन पक्ष संघटनेत तातडीने फेरबदल करण्याचा निर्णय झाला होता. 

काँग्रेसमधील नाराजी व्यक्त करणाऱ्या नेत्यांमध्ये कपिल सिब्बल यांच्यासह 23 नेत्यांचा समावेश होता. या 'जी-23' नेत्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये आज झालेल्या शांती संमेलनात सहभाग घेतला. त्यावेळी सिब्बल यांनी पक्षाला परिस्थितीची जाणीव करुन दिली आहे. या वेळी माजी खासदार गुलाम नबी आझाद, माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा, राज्यसभा खासदार विवेक तंखा, लोकसभा खासदार मनीष तिवारी आणि हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हूडा आदी उपस्थित होते. 

या वेळी बोलताना सिब्बल म्हणाले की, सत्य सांगायचे झाल्यास काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस कमकुवत होत चालला आहे. यासाठी आम्ही येथे एकत्र जमलो आहोत. याआधीही आम्ही एकत्र आलो होतो आणि पक्षाला भक्कम केले होते. आमचा आवाज हा पक्षाच्या भल्यासाठी आहे. पक्ष पुन्हा भक्कम व्हावा, अशीच सगळ्यांची इच्छा आहे. नवीन पिढी पक्षाशी जोडली जायला हवी.आम्ही काँग्रेसचे चांगले दिवस पाहिले आहेत. आमचे जसजसे वय होत आहे तसा पक्ष दुबळा झालेला आम्हाला पाहायचा नाही. 

'जी-23'मधील आणखी एका नेता म्हणाला की,  मागील वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांचे उल्लंघन सध्या काँग्रेसमध्ये सुरू आहे. पक्षात अजून कोणत्याही सुधारणा अथवा बदल झालेले दिसत नाही.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT