Mumbai News : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून तीन पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे दिसत नाही. 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 21 डिसेंबरला खातेवाटप केले. त्यानंतर या-ना त्या कारणावरून महायुतीमधील तीन पक्षात कुरबुरी पाहण्यास मिळत आहेत. राज्यातील सत्ताधारी मंडळी कामाला लागले नाहीत तर दुसरीकडे विरोधकांना सूर सापडत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार सत्तेत येऊन एक महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी उलटला आहे. तरी अद्याप हे सरकार कामाला लागल्याचे चित्र काही केल्या दिसत नाही. विशेषतः सरकार सत्तेत आल्यानंतर घडलेल्या दोन घटनांमुळे राज्य सरकार काहीसे बॅकफूटवर असल्याचे चित्र दिसत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे वातावरण काहीसे तापलेले आहे. या प्रकारणातील आरोपीला अटक केली आहे. दुसरीकडे परभणीतील दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाला होता. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांने राज्य सरकारला या दोन्ही प्रकरणावरून घेरले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकटेच एकहाती सगळ्या भूमिका पार पडत आहेत. दावोसमध्ये जाऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या हिताच्या काही योजना आणल्या आहेत. दावोसमधून आणण्यात आलेल्या कामामुळे येत्या काळात महाराष्ट्राला समतोल विकास साधण्याच्या दृष्टीने हातभारच लागणार आहे. त्यामुळे या सरकारच्या कारभारामध्ये अर्थात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांचाच प्रभाव असणे गृहीत धरले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शंभर दिवसांमध्ये प्राधान्याने करण्यात येणाऱ्या कामांची यादी दिली आहे. त्यानुसार प्रत्येक विभागाला काम करायचे आहे. त्याचा आढावा घेण्याच्या दृष्टीने कोणी आतापर्यंत कष्ट घेतलेले दिसत नाही. पालकमंत्र्याच्या यादीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या आल्या आहेत. शिंदे यांनी आपली नाराज दाखवण्यासाठी मुंबईमधून सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे या गावात जाऊन मुक्काम ठोकणे पसंत केले आहे.
त्यानंतर दोन जिल्ह्याचे जाहीर करण्यात आलेले पालकमंत्री रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रजासत्ताक दिनानिमित्त या दोन जिल्ह्यातील झेंडावंदनाची संधी कोणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या कार्यक्रमातच व्यस्त आहेत. पुणे सोडून ते बाहेर पडलेले नाहीत. दुसरीकडे महत्वाची खाते नवीन मंत्र्यांकडे सोपविण्यात आली आहेत. त्यांना राज्यभर फिरून आपली खाते नीट समजून घेऊन काम करण्याची गरज आहे. त्यामुळेच सरकार म्हणजे फक्त फडणवीस असे चित्र निर्माण होत आहे. तशास्वरूपाचे चित्र निर्माण होणे राज्याच्या प्रतिमेच्या दृष्टीने फारशी चांगली गोष्ट नाही.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अनपेक्षितपणे धक्का बसला. या धक्क्यातून सावरत आता ठाकरे गटाने आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला मुंबई महापलिकेचा गड कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आतापासूनच कंबर कसली आहे. त्याचसंबंधी ठाकरे गटाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी येत्या काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. गुरुवारी मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी ‘एकला चलो रे‘चे संकेत दिले आहेत.
राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे, असे चित्र दिसत नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी संपुष्टात येण्याची शक्यता आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असल्याची चर्चा आहे. या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार का कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा सोडला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिकेमध्ये ठाकरे यांच्या पक्षाने 25 वर्षे सत्ता टिकवली आहे. याठिकाणी येत्या काळात भाजपविरुद्ध त्यांची लढत होणार आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत ताकद दाखवून देण्याचे काम शिवसेनेला स्वबळावर करावे लागणार असल्याने ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मुंबई महापालिका निवडणूक अस्तित्वाची लढाई राहणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी येत्या काळात टिकली नाही तर ठाकरेंची शिवसेना स्वबळावर किती ताकद लावणार यावरच यश अपयश अवलंबून असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.