विश्लेषण

एक हजार ग्रामपंचायतींसाठी  26 सप्टेंबर रोजी मतदान

सरकारनामा ब्युरो

 मुंबई : राज्यातील 26 जिल्ह्यांमधील एक हजार 41 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 69 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागासांठी 26 सप्टेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली. 


सहारिया यांनी सांगितले, की ऑक्‍टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हे मतदान होत आहे. यात सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 5 ते 11 सप्टेंबर या कालावधीत स्वीकारली जाणार असून, त्यांची छाननी 12 सप्टेंबरला होईल.

नामनिर्देशनपत्रे 15 सप्टेंबरपर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी चिन्हवाटप होईल. मतदान 26 सप्टेंबरला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 27 सप्टेंबरला असेल. 

सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या : 
ठाणे- 6, रायगड- 121, रत्नागिरी- 19, सिंधुदुर्ग- 4, नाशिक- 24, धुळे- 83, जळगाव- 6, अहमदनगर- 70, नंदुरबार- 66, पुणे- 59, सोलापूर- 61, सातारा- 49, सांगली- 3, कोल्हापूर- 18, बीड- 2, नांदेड- 13, उस्मानाबाद- 4, लातूर- 3, अकोला- 3, यवतमाळ- 3, बुलडाणा- 3, नागपूर- 381, वर्धा- 15, चंद्रपूर- 15, भंडारा- 5 आणि गडचिरोली- 5. एकूण- 1041. 

पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा : ठाणे- 4, रायगड- 3, सिंधुदुर्ग- 1, नाशिक- 8, धुळे- 2, जळगाव- 1, पुणे- 6, सातारा- 3, सांगली- 10, उस्मानाबाद- 1, जालना- 2, यवतमाळ- 3, वाशीम- 6, बुलडाणा- 2, नागपूर- 1, चंद्रपूर- 2 आणि गडचिरोली- 14. एकूण- 69. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT