Deve Gowda Family

 

Sarkarnama

विश्लेषण

घराणेशाहीत गांधींनंतर देवेगौडांचा झेंडा; घरातच दोन खासदार अन् चार आमदार!

माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडांच्या कुटुंबाने राजकारणात इतिहास घडवला आहे.

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : कर्नाटकात स्थानिक स्वराज्यसंस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council Election) माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा (H.D.Deve Gowda) यांचे नातू सूरज रेवण्णा (Suraj Revanna) हे विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाने देवेगौडा परिवाराने नवा राजकीय इतिहास रचला आहे. घराणेशाहीत नेहरू-गांधी कुटुंबानंतर आता देवेगौडा कुटुंबाचा नंबर लागला आहे.

देवेगौडा कुटुंबातील तीन पिढ्या धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (JDS) माध्यमातून राजकारणात उतरून निवडून आल्या आहेत. सूरज हे सक्रिय राजकारणात आलेले कुटुंबातील आठवे सदस्य ठरले आहेत. एकाच कुटुंबातील एवढे सदस्य सक्रिय राजकारणात असल्याचे नेहरु-गांधी परिवारानंतरचे दुसरे उदाहरण आहे. यामुळे देवेगौडा कुटुंबाने एका नवा राजकीय इतिहास घडवला आहे. माजी पंतप्रधान देवेगौडा हे राज्यसभेचे विद्यमान सदस्य आहेत. त्यांचे नातू प्रज्वल रेवण्णा हे लोकसभेचे खासदार आहेत. देवेगौडांचे पुत्र एच.डी.कुमारस्वामी हे आमदार आहेत. ते दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. कुमारस्वामींच्या पत्नी अनिता याही आमदार आहेत. याचबरोबर देवेगौडांचे दुसरे पुत्र एच.डी.रेवण्णा हेसुद्धा आमदार आहेत. रेवण्णा हे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत.

कुमारस्वामींचे पुत्र निखिल यांनी मंड्यामधून मागील लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. ते सध्या जेडीएसच्या युवक विभागाची धुरा सांभाळत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत देवेगौडांचे नातू प्रज्वल हे मागील लोकसभा निवडणुकीत हसनमधून विजयी झाले होते. आता सूरज यांच्या रुपाने त्यांच्या कुटुंबातील आठवा सदस्य सक्रिय राजकारणात आला आहे.

देवेगौडांचा बालेकिल्ला असलेल्या हसनमधून सूरज रेवण्णा हे विजयी झाले. जेडीएसने मागील वेळी 4 जागा मिळवल्या होत्या. या निवडणुकीत जेडीएसने 6 उमेदवार रिंगणात उतरवले होते. यात केवळ हसनची एकच जागा पक्षाला मिळाली आहे. सूरज यांच्यामुळे पक्षाची आणि त्यांचे काका माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांची मोठी नामुष्की टळली आहे. सूरज यांना 2 हजार 281 मते मिळाली. त्याचवेळी काँग्रेसचे उमेदवार एम. शंकर यांना 748 आणि भाजपचे एच.एम.विश्वनाथ यांना 421 मते मिळाली तर 103 मते अवैध ठरली. मागील वेळी जेडीएसने तुमकूर, कोलार, मंड्या आणि म्हैसूरमधून विजय मिळवला होता.

कर्नाटकात स्थानिक स्वराजसंस्था मतदारसंघाच्या निवडणुका 10 डिसेंबरला झाल्या. या निवडणुका 25 जागांसाठी झाल्या. काँग्रेसचे विद्यमान 14 आमदार, भाजपचे 7 तर जेडीएसचे 4 आमदार यांचा कार्यकाळ पुढील वर्षी 5 जानेवारीला संपत असल्याने या निवडणुका झाल्या. यात भाजपला 12, काँग्रेसला 11, जेडीएसला 1 आणि इतरांना 1 अशा जागा मिळाल्या. या निवडणुकीनंतर विधान परिषदेत बहुमत मिळेल, असा भाजपला कयास होता. परंतु, केवळ एका जागेमुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठला आला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT