Naresh Patel and Hardik Patel  Sarkarnama
विश्लेषण

काँग्रेसच्या गळाला दुसरा पाटीदार नेता; हार्दिक यांच्या 'एक्झिट'मागे नरेश पटेलांची 'एंट्री'?

पाटीदार नेत्याच्या एंट्रीच्या शक्यतेनं हार्दिक पटेल होते नाराज

सरकारनामा ब्युरो

गांधीनगर : गुजरात (Gujarat) काँग्रेसचे (Congress) कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पक्षाला रामराम केला आहे. आता हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्यामागील कारणाची चर्चा सुरू झाली आहे. हार्दिक हे पक्ष सोडण्यास राज्यातील बडा पाटीदार नेता कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे. या नेत्याचं नाव नरेश पटेल (Naresh Patel), असं आहे. विशेष म्हणजे ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं मानलं जात आहे. (Hardik Patel Latest News in Marathi)

दोनच दिवसांपूर्वी हार्दिक यांनी नरेश पटेल यांची भेट घेतली होती. काँग्रेसमध्ये राहावे की बाहेर पडावे, याबाबत हार्दिक यांनी ही भेट घेतल्याचं समोर आलं होतं. यानंतर लगेचच हार्दिक यांनी पक्ष सोडला आहे. नरेश पटेल हा राज्यातील मोठे पाटीदार नेते आहेत. कोडलधाम मंदिर ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा खूप दिवसांपासून सुरू आहे. नरेश पटेल हे काँग्रेसमध्ये आल्यास पाटीदार नेता म्हणून हार्दिक यांचं पक्षातील वजन कमी होण्याची शक्यता होती. नरेश पटेल यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला खुद्द प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकूर यांनीही दुजोरा दिला होता. नरेश पटेल यांचे पक्षात कधीही स्वागत असेल, अशी भूमिका ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. त्याआधीच हार्दिक यांनी पक्षातून बाहेर पडणं पसंत केलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हार्दिक पटेल यांनी आज ट्विट करीत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी म्हटलं आहे की, आज मी मोठ्या धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातची जनता स्वागत करेल. मला विश्वास आहे की माझ्या या पावलानंतर भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन.

गुजरातमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नुकतेच राज्यात दाखल झाले होते. हार्दिक पटेल हे पाटीदार समाजाचे ताकदवान नेते आहेत. ते नाराज असल्याने पक्षातील मतभेद उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर खुद्द राहुल गांधी यांच्यासोबत हार्दिक पटेल मंचावर दिसले होते. त्यामुळे त्यांची नाराजी दूर झाल्याची चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात राहुल गांधींनी हार्दिक यांना भेट देणे टाळले होते. तसेच, त्यांच्याशी चर्चाही केली नव्हती. त्यामुळे हार्दिक यांची नाराजी कायम होती.

काही दिवसांपूर्वी पटेल यांनी पक्षात दुर्लक्षित केले जात असल्याचा आरोप केला होता. नव्या नवऱ्याची नसबंदी केल्यासारखी माझी पक्षात अवस्था झाली आहे, असे वक्तव्य त्यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कार्यकारी अध्यक्षांनीच केलेल्या या आरोपांमुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली होती. मात्र, काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर पटेल यांनी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT