Haryana Assembly election Sarkarnama
विश्लेषण

Haryana Assembly : 'ऑनर किलिंग'साठी कुप्रसिद्ध हरियाणात आमदार म्हणून किती महिलांना संधी?

अय्यूब कादरी

Haryana Election 2024 : 'ऑनर किलिंग'साठी कुप्रसिद्ध असलेल्या हरियाणात (Haryana) निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. हरियाणातही निवडणुकीत महिलांचा सहभाग कमीच राहिलेला आहे. 2000 मधील निवडणुकीत केवळ चार महिला विजयी झाल्या होत्या. 2014 मध्ये सर्वाधिक 13 महिला विधानसभेत पोहोचल्या होत्या.

2019 मध्ये ही संख्या नऊवर आली, यात काँग्रेसकडून (Congress) पाच महिला विजयी झाल्या होत्या. गेल्या पाच निवडणुकांमध्ये हरियाणात किती महिलांना विधानसभेवर संधी मिळाली, हे जाणून घेणे रंजक ठरणार आहे. या निवडणुकीत ऑलिम्पिक गाजवलेल्या कुस्ती खेळाडू विनेश फोगाट काँग्रेसकडून मैदानात उतरल्या आहेत.

कुस्ती महासंघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, भाजपचे (BJP) माजी खासदार ब्रजभूषण शरण सिंह यांनी महिला खेळाडूंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आऱोप झाला होता. ब्रजभूषण यांच्यावर कारवाई करावी, यासाठी आंदोलन करणाऱ्या महिला खेळाडूंना पोलिसांना अपमानास्पद वागणूक दिली होती, त्यांच्याशी धक्काबुक्की केली होती.

त्या आंदोलनात विनेश फोगाट (Vinesh Phogat) याही होत्या. पोलिस त्यांच्याशी धक्काबुक्की करत असल्याची छायाचित्रे व्हायरल झाली होती. आता विनेश फोगाट या उमेदवार असल्यामुळे या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. हरियाणात अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 12 सप्टेंबर होती. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 16 सप्टेंबर आहे. मतदान 5 ऑक्टोबरला तर मतोमजणी 8 ऑक्टोबरला होणार आहे.

2000 मध्ये केवळ चार महिला जिंकल्या होत्या

हरियाणा (Haryana) विधानसभेची नववी निवडणूक 2000 मध्ये झाली होती. त्या निवडणुकीत एकूण 965 उमेदवार रिंगणात होते. त्यात महिलांची संख्या फक्त 49 होती, म्हणजे रिंगणात उतरलेल्या एकूण उमेदवारांच्या 5.08 टक्के! विजयी झाल्या केवळ चार उमेदवार! 90 मध्ये चार महिला, याचा अर्थ असा की हरियाणाच्या नवव्या विधानसभेत महिलांचे प्रतिनिधित्व केवळ 4.44 टक्के होते.

2005 मध्ये संख्या जवळपास तिप्पट झाली

2005 मध्ये 10 व्या विधानसभेत महिला उमेदवार आणि आमदारांच्या संख्येतही वाढीची नोंद झाली. 2005 मध्ये 983 उमेदवार रिंगणात उतरले होते, त्यात महिलांची संख्या 60 होती. रिंगणात उतरलेल्या एकूण उमेदवारांचा विचार केल्यास ही महिलांची टक्केवारी 6.10 होती. या निवडणुकीत विजयी महिलांची संख्या वाढली. विजयी झालेल्या महिलांची टक्केवारी 12.22२ इतकी होती. त्या निवडणुकीत 11 महिलांनी विधानसभेत प्रवेश केला होता.

2009 मध्ये पुन्हा संख्या घटली

हरियाणात विधानसभेच्या 11 व्या निवडणुकीत रिंगणात उतरणाऱ्या आणि विजयी होणाऱ्या महिलांची संख्या कमी झाली. या निवडणुकीत एकूण 1222 उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यात महिलांची संख्या फक्त 69 होती, म्हणजे 5.65 टक्के. या निवडणुकीत दहा महिला विजयी झाल्या. 90 पैकी 10 महिला म्हणजे विधानसभेतील महिलांची संख्या 10 टक्क्यांपेक्षा अधिक होती.

2014 मध्ये महिला आमदारांची संख्या वाढली

हरियाणाच्या 12 व्या विधानसभेची निवडणूक 2014 मध्ये झाली. निवडणूक लढवणाऱ्या आणि विजयी होणाऱ्या महिलांचीही संख्या बऱ्यापैकी वाढली होती. एकूण उमेदवारांची संख्या 1351 होती. यात 116 महिलांचा समावेश होता. महिलांची टक्केवारी 8.59 होती. या निवडणुकीत विजयी महिलांची टक्केवारी 14.44 इतकी होती. एकूण 13 महिला विधानसभेत पोहोचल्या होत्या.

2019 मध्ये काय झाले?

2019 च्या निवडणुकीत मैदानात उतरलेल्या एकूण उमेदवारांची संख्या होती 1169 आणि त्यात 108 महिला होत्या. महिलांचा सहभाग 9.24 टक्के राहिला. यातील नऊ महिला विजयी होऊन विधानसभेत पोहचल्या. विधानसभेतील महिला आमदारांची टक्केवारी 10 होती. भाजपला सर्वाधिक 40 जागा मिळाल्या होत्या. यात तीन महिला विजयी झाल्या होत्या.

2019 च्या निवडणुकीत 31 जागा जिंकून काँग्रेस विरोधी पक्ष बनला होता. काँग्रेसच्या 31 आमदारांत पाच महिलांचा समावेश होता. काँग्रेसच्या महिला आंदारांची संख्या 16.13 टक्के तर भाजपच्या महिला आमदारांची संख्या 7.5 टक्के होती. या निवडणुकीत जेजेपीला 10 जागा मिळाल्या होत्या. त्यात माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या मातुःश्री नैना चौटाला या एकमेव महिला आमदार होत्या. सात अपक्ष आणि हरियाणा लोकहित पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला होता. यामध्ये एकाही महिलेचा समावेश नव्हता.

या निवडणुकीत कोणत्या पक्षाकडून किती महिलांना उमेदवारी?

हरियाणा विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने 12 महिलांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसपाठोपाठ भाजपने 10 महिलांना उमेदवारी दिली आहे. आम आदमी पक्षानेही 10 महिला उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. अनेक मतदारसंघांत महिला अपक्ष म्हणून लढत असून, त्यात प्रसिद्ध उद्योगपती सावित्री जिंदाल यांचाही समावेश आहे. त्या हिसार विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT