k-c-padvi. 
विश्लेषण

कितीही वादळे आलीत तरी काँग्रेस सोडणार नाही : आमदार के. सी. पाडवी 

.भलेही २८८ जागा भाजपने जिंको पण निवडणुका बॅलेटपेपरवर घ्याव्यात.

बळवंत बोरसे

नंदुरबार :कितीही वादळे आली, तरी मी मात्र काँग्रेसची साथ कधीही सोडणार नाही असे सलग पाचवेळा धडगावचे आमदार ऑड. के. सी. पाडवी यांनी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

काँग्रेस पक्षाने अनेक वादळे पाहिली आहेत, राज्यघटनेला मानणारा वर्गाने अनेक वर्षांपासून काँग्रेसला साथ दिली आहे. याचे कारण हा पक्ष सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. सध्याच्या स्थितीत अनेक काँग्रेसजन भाजपमध्ये जाऊ पाहत आहेत, त्यांनीही जाऊ नये असे मी आवाहन करेल.

आगामी निवडणुका या बॅलेटपेपरवरच घ्याव्यात असा प्रस्ताव मी आमच्या संसदीय मंडळासमोर ठेवला आहे असे सांगताना, त्यांनी भाजप सरकार हे आदिवासींची दिशाभूल करीत आहेत, बोगस आदिवासींनी संरक्षण देत असल्याचा आरोपही केला.

जिल्ह्यातील अनेक जण विशेषतः काही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यात श्री. पाडवी यांचेही नावे येत असल्याने याबाबतची संदिग्धता दूर व्हावी यासाठी त्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. भाजप प्रवेशाचा सपशेल इंकार करीत त्यांनी या सर्व चर्चा आणि अफवा आहेत असे सांगितले. मी शेवटपर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणूनच राहणार आहे असे सांगत श्री. पाडवी यांनी काँग्रेसचा वाटचालीबद्दल विवेचन केले.

काँग्रेसने देशात अनेक वादळे पाहिली आहेत. सत्ता असताना पक्षाशी बांधीलकी सांगणारे किती जण सत्ता नसतानाही राहिले यावरून खरी निष्ठा समजते. माझी निष्ठा पक्षाशी आहे. मला २०१४ मध्येही भाजप प्रवेशाची आणि निवडून आणण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते, मात्र तेव्हाही मी नम्रपणे नकार दिला. आजही माझी भूमिका कायम आहे. भाजप हा संविधानाची अवहेलना करणारा पक्ष आहे. काँग्रेस बरोबर दलित, मुस्लिम, ख्रिश्‍ननसह सर्वसामान्य जनता आहे. ही जनता आणि आदिवासी बांधवाबरोबरच मी राहणार आहे. संविधानाला न मानणाऱ्यांबरोबर जनता नसेल तर, मी तरी कसा जाणार असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.


हा निव्वळ योगायोग नव्हे
जिल्ह्यातील अनेक काँग्रेस नेते भाजपच्या वाटेवर असल्याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी त्यांचे काही प्रश्‍न असतीलही पण म्हणून पक्ष सोडून जाऊ नये. जाणाऱ्या सगळ्यांना मी पक्ष न सोडण्याचे आवाहन करत आहे. जनता आपल्याबरोबर आहे, हे लवकरच दिसून येईल. ईव्हीएमबाबत सुरू असलेल्या चर्चेविषयी त्यांना विचारले असता श्री. पाडवी म्हणाले, आगामी सर्व निवडणुका या बॅलेटपेपरवरच घेण्यात याव्यात अशी आमची मागणी आहे.

याचे कारण शेवटी ईव्हीएम हेही एका खासगी कंपनीला दिलेले काम आहे. त्यातही फेरफार होऊ शकणार नाही हे कशावरून ?  भलेही २८८ जागा भाजपने जिंको पण निवडणुका बॅलेटपेपरवर घ्याव्यात. या मागणीच्या पुष्ट्यर्थ  त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी मतमोजणी सुरू असताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला. विजयाची दावा सारेच करतात, पण आकडेवारीनिशी इतका ठामपणे दावा करणे आणि तसेच घडणे हा निव्वळ योगायोग नव्हे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT