INDIA Alliance : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला घाम फोडल्यानंतर 'इंडिया' आघाडीने देशाच्या राजकारणात एक मजबूत पर्याय निर्माण केला. मात्र, विधानसभा निवडणुकीत ही आघाडी टिकली नाही. २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अद्याप तीन वर्षांचा काळ शिल्लक आहे. राजकारणात तीन वर्षे हा खूप मोठा कालावधी मानला जातो. या दीर्घ काळात आघाडीसमोर केवळ भाजपचेच नाही, तर स्वतःचे अस्तित्व आणि एकता टिकवून ठेवण्याची मोठी आव्हाने इंडिया आघाडीसमोर आहे. आज दिल्लीत बैठक पार पडल्यानंतर इंडिया आघाडीसमोर आव्हाने कोणती हे पाहूया
सध्या कोणतीही मोठी केंद्रीय निवडणूक डोळ्यासमोर नसल्यामुळे सर्वच पक्षांना एकत्र बांधून ठेवणारा अजेंडा कमकुवत होऊ शकतो.
'इंडिया' आघाडीकडे नेत्यांची मोठी फौज आहे, पण हेच त्यांच्या समोरील आव्हान देखील आहे. भाजपसमोरील 'मोदींनंतर कोण?' या प्रश्नाइतकाच 'इंडिया आघाडीचा चेहरा कोण?' हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. राहुल गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार, किंवा अन्य प्रादेशिक नेते यांच्यात समन्वय साधून एका नावावर शिक्कामोर्तब करणे अत्यंत कठीण आहे. निवडणुकीच्या आधी चेहरा जाहीर करायचा की निवडणुकीनंतर, या धोरणात्मक निर्णयावर आघाडीत एकवाक्यता नाही.
नुकत्याच घडलेल्या घडामोडींनुसार, आम आदमी पक्ष (AAP) आणि द्रमुक (DMK) हे महत्त्वाचे घटक पक्ष आघाडीपासून काहीसे दूर गेल्याचे चित्र आहे. 'आप' आणि 'डीएमके' हे अनुक्रमे दिल्ली-पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांमधील मोठे शक्तीस्थान आहेत. त्यांची नाराजी आघाडीला परवडणारी नाही. त्यामुळे काँग्रेसला मोठ्या भावाची भूमिका बजावत त्यांची समजूत काढावी लागेल. तसेच टीव्हीकेचा अजून इंडिया आघाडीत समावेश नाही. त्याविषयी देखील विचार करावा लागेल.
थलपती विजय यांचा 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) हा पक्ष तामिळनाडूत वेगाने पुढे येत आहे. जर 'डीएमके'ने वेगळी चूल मांडली, तर 'टीव्हीके'सारख्या तरुण आणि लोकप्रिय नेत्याच्या पक्षाला सोबत घेणे हा 'इंडिया' आघाडीसाठी चांगला प्लॅन-बी ठरू शकतो. मात्र, विजय यांच्या पक्षाचे अद्याप संसदेत प्रतिनिधित्व नसल्याने त्यांना सोबत घेताना आघाडीला आपल्याच नियमांमध्ये लवचिकता आणावी लागेल.
केवळ 'भाजप विरोध' या एका मुद्द्यावर तीन वर्षे आघाडी टिकू शकत नाही. जनतेला आकर्षित करेल असा ठोस आर्थिक आणि सामाजिक अजेंडा अद्याप आघाडीला तयार करता आलेला नाही. आघाडीतील पक्षांमध्ये नियमित संवादाचा अभाव आहे. अनेकदा महत्त्वाच्या बैठकांना मोठे नेते गैरहजर राहतात (जसे की ठाकरे ऑनलाईन होते आणि डीएमके गैरहजर). हा विसंवाद माध्यमांमध्ये चुकीचा संदेश जातोय.
'इंडिया' आघाडीसमोरील आव्हाने केवळ राजकीय नसून ती अस्तित्वाची आहेत. पुढील तीन वर्षे त्यांना अंतर्गत मतभेद विसरून संघटनात्मक बांधणी करावी लागेल. जर त्यांनी 'आप' आणि 'डीएमके'ला सोबत ठेवण्यात यश मिळवले आणि 'टीव्हीके'सारख्या नव्या पर्यायांचा हुशारीने वापर केला, तरच २०२९ मध्ये ते भाजपला तगडे आव्हान देऊ शकतील. अन्यथा, अंतर्गत कलहामुळे ही आघाडी केवळ कागदावरच मर्यादित राहण्याचा धोका नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.