विश्लेषण

जयदत्त धस-एेश्वर्या दरेकर अडकणार रेशीमगाठीत; कट्टर राजकीय विरोधक होणार व्याही

सरकारनामा ब्युरो

बीड : राजकारणात पुढे आणलेल्या सुरेश धस यांना साहेबराव दरेकर यांच्यामुळेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले आणि त्यांच्या राजकारणाची भरभराट सुरु झाली. आष्टीतून सलग तीन वेळा आमदार राहिलेले धस नुकतेच तीन जिल्ह्याचे आमदार झाले आहेत. 

सुरेश धस यांना राजकीय धडे देणारे गुरु साहेबराव दरेकर आता सुरेश धस यांच्या घरात आपली नात देत आहेत. त्यामुळे आता धसांच्या पुढच्या पिढीची राजकीय वहिवाट सोयीची होणार आहे. 

आष्टी मतदारसंघातील बडे प्रस्थ असलेले साहेबराव दरेकर १९९५ मध्ये भीमराव धोंडे यांचा पराभव करुन अपक्ष विजयी झाले. त्यावेळच्या युती सरकारला पाठिंबा दिलेल्या तेरा अपक्ष आमदारांमध्ये दरेकर देखील होते. याच काळात धस दरेकरांचे कार्यकर्ते म्हणून राजकारणात जम बसवत होते. धस जामगावचे (ता. आष्टी) सरपंच झाले. धस त्यावेळी दरेकर यांचेच समर्थक होते. 

दरम्यान, १९९७ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि आष्टी पाटोदा मतदार संघात दरेकरांनी आपले समर्थक स्वतंत्र आघाडीच्या माध्यमातून रिंगणात उतरविले. यामध्ये सुरेश धसही होते. दरेकरांच्या आघाडीला चांगले यशही मिळाले. याच काळात बीड जिल्हा परिषदेवर प्रथमच भाजपने सत्ता मिळविली. पण, सत्तेच्या झेंड्याला दरेकरांचा दांडा होता. त्यामुळे त्या बदल्यात दरेकरांच्या गटाला उपाध्यक्षपद मिळाले. सुरेश धस तरुण आणि आक्रमक असल्याने दरेकरांनी या पदावर सुरेश धस यांना बसविले. 

पण, राजकीय गुण अंगी असलेल्या धसांनी उपाध्यक्षपदाच्या संधीचे सोने केले आणि आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली. स्वत: उपाध्यक्ष असलेल्या जिल्हा परिषदेवर मोर्चा काढल्याने १९९८ मध्ये धस जिल्ह्यात चर्चेत आले. 

दरम्यान, युती सरकारला दिलेला पाठींबा आणि जिल्हा परिषदेला केलेली मदत या दोन कारणांनी १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत आष्टी पाटोद्यातून साहेबराव दरेकर यांना भाजपची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, गुरुने शिकविलेला डाव टाकत सुरेश धस यांनी भाजपच्या उमेदवारीची माळ गळ्यात पाडून घेतली. सुरेश धस यांनी आपल्या गुरुवर टाकलेला हा पहिला डाव मानला जातो. यावेळी अपक्ष रिंगणात उतरलेल्या गुरु दरेकरांना त्यांनी आसमान दाखविले. 

पुढे दरेकरांचे पुत्र राजाभाऊ दरेकर यांनाही २००४ मध्ये त्यांनी आसमान दाखविले. अशा प्रकारे गुरु-शिष्य असलेले दरेकर-धस कट्टर राजकीय विरोधक झाले. मात्र, २००९ च्या निवडणुकीत दरेकरांनी पुन्हा धस यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. त्यानंतर पुन्हा दरेकर-धस एकमेकांचे राजकीय विरोधक झाले. 

शिष्य सुरेश धस यांच्या राजकीय डावाने घायाळ झालेले दरेकर भाषणात ‘एक उंट पावसाने भीजत असल्याने आम्ही त्याला राहोटीत घेतले. पण त्याने आमची राहोटीच ओढून नेली आणि आता आम्ही पावसात भिजत आहोत’ असा धसांवर शब्दसुमने उधळत असतात. 

एकूणच साहेबराव दरेकर व सुरेश धस एकेकाळी गुरु-शिष्य तर अनेक वेळा कट्टर राजकीय विरोधक आहेत. आता मात्र या दोन घरांत लवकरच लग्नाचे मंजूळ स्वर गुणगुणणार आहेत.  

साहेबराव दरेकर यांचे पुत्र उद्धव दरेकर आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती असलेल्या स्नुषा शोभा दरेकर यांची कन्या एेश्वर्या आता सुरेश धस यांची सुन होणार आहे. 

सुरेश धस यांचे ज्येष्ठ चिरंजीव जयदत्त आणि एेश्वर्या यांचा उद्या गुरुवारी (ता. 21) साखरपुडा होत आहे. साहेबराव दरेकर यांनी शिष्य सुरेश धसांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद दिले आणि त्या बळावर धसांनी तीन वेळा विधानसभा जिंकली आणि मंत्रिपदही मिळविले. 

आता चौथ्यांदा ते तीन जिल्ह्याचे आमदार झाले आहेत. आता दरेकरांची नात धसांचे पुत्र जयदत्त धस यांच्या गळ्यात लवकरच वरमाळा घालणार असल्याचे जयदत्त यांचीही राजकीय वहिवाट सोपी जाईल, असे मानले जाते. 

मागच्या पाच वर्षांपासून जयदत्त धस यांचा मतदारसंघात संपर्क असतो. सुरेश धस यांच्या राजकीय वाटेवरुन चालताना जयदत्त धस यांनीही समर्थकांचे जाळे विणले आहे. 

भविष्यात वडिलांनी रचलेल्या राजकीय पायावर नवी इमारत चढविताना दरेकरांची त्यांना मदत होणार यात शंका नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT