मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि गटनेेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जोरदार टोमणे मारले. भाजपमध्ये तुमचा अपमान होत आहे. तुम्ही आमच्याकडे या. तुम्हाला इकडे मुख्यमंत्री बनायला कोणती अडचण नाही, अशी खुली ऑफर त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिली.
जयंत पाटील म्हणाले की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनावर दगड ठेवून आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचे म्हटले होते. त्यामुळे तो दगड मनावरचा काढून टाका आणि इकडे या. इकडे तुम्हाला मुख्यमंत्री बनायला काही अडचण येईल, असं मला वाटत नाही. तसेच मुख्यमंत्री दिल्लीत गेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या छायाचित्रात त्यांना तिसऱ्या क्रमांकाच्या रांगेत उभे राहावे लागले. हा महाराष्ट्राचा अवमान आहे. आम्ही तो सहन करणार नाही. खरे तर त्यादिवशीच मुख्यमंत्र्यांनी तेथून बाहेर पडायला हवे होते, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देत फोटोसाठी म्हणून मला तिसऱ्या रांगेत जावे लागले. पण राष्ट्रपतींसोबत भोजनाचा कार्यक्रम होता तेव्हा मी पहिल्या रांगेत होतो. लांबलचक रांगेचा फोटो निघू शकत नाही, यासाठी तीन रांगा केल्या, असे त्यांनी सांगितले.
जयंत पाटील यांनी शिंदे गटातील इतर नेत्यांची खिल्ली उडवली. शंभूराज देसाई यांना उत्पादनशुल्क सारखे किरकोळ खाते दिले. आमचे शिवेंद्रसिंह भोसले हे साताऱ्याचे पालकमंत्री होण्यासाठी म्हणून भाजपमध्ये गेले. त्यांनाही काही मिळाले नाही. संजय शिरसाट, आशिष जयस्वाल, बच्चू कडू अशी नाराजांची फौज या सरकारमध्ये आहे. त्यामुळे हे सरकार किती काळ टिकेल हे सांगता येत नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, असे अनेकांना वाटत होते. खरे तर ते भविष्यात देशाचे पंतप्रधान होतील, अशी भविष्यवाणी अनेकजण आतापासूनच करत आहेत. मात्र त्यांना सीएम इन वेटिंग राहावे लागले आहे, अशी कोपरखळी जयंत पाटील यांनी मारली.
फडणवीस हे भाजप-शिवसेना युती सरकारचे मुख्यमंत्री असताना तेव्हा शिवसेनेवर अन्याय होत असल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा भर व्यासपीठावर उद्धव ठाकरेंकडे देतानाची क्लिप मी पाहिली. पण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचताना शिवसैनिकांच्या वेदना शिंदे दिसल्या नाहीत का, असा सवाल पाटील यांनी विचारला.
मुख्यमंत्री झाल्यानंतर मला वाटले मुख्यमंत्री हे तातडीने बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीला जातील असे वाटले होते. पण ते विलंबाने गेले. बंडखोर आमदार सुरतेला जाऊन शरण गेले तेव्हा महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली. मुख्यमंत्री महोदय. आपण निर्णय घेताना उपमुख्यमंत्री यांना विश्वासात घ्या. जो एक नंबरवर आहे त्याच्या नजरेवर पोलीस खात काम करत असते, असा सल्लाही जयंतरावांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.