Kalyan-Dombivli News : राजकारणात कोणी कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो, ही जुनी म्हण कल्याण-डोंबिवलीत दर काही दिवसांनी खरी ठरताना दिसते. दीर्घकाळ ज्या नात्यांमध्ये तणाव आणि कट्टरता होती त्याच नात्यांत आज सौहार्दाचे सूर उमटताना दिसत आहेत. तर काही जुन्या मैत्रीला तडे जाऊन तेथे नवीन मित्र बनताना दिसत आहेत.
डोंबिवली पश्चिमचे ज्येष्ठ नेते पुंडलिक म्हात्रे आणि कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड हे एकेकाळी राजकीय वैराची ज्वाला पेटवणारी दोन टोकं होती. कुटुंबांच्या पिढ्यापिढ्यांच्या संघर्षाची धगधग दोन्ही घराण्यांच्या राजकारणात झिरपलेली होती. पण काळ बदलला, राजकीय गणित बदलली आणि त्यासोबत बदलला पुढील पिढीचा दृष्टिकोनही.
नुकतेच शिवसेना सोडून दीपेश म्हात्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर ते भाजपच्या विविध कार्यक्रमांत सातत्याने उपस्थित राहू लागले आहेत. कल्याण पूर्वेतील एका पक्ष सोहळ्या प्रसंगी दीपेश म्हात्रे आणि गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड एकत्र दिसल्याचे दृश्य राजकीय वर्तुळात खळबळ माजवणारे ठरले. कट्टर शत्रू असलेल्या दोन घराण्यांची पुढची पिढी एकत्र येत आहे, याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
डोंबिवलीतही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि दीपेश म्हात्रे यांचे नाते अनेक वर्षे राजकीय तणावाचे होते. विकासकामांपासून पक्षांतर्गत राजकारणापर्यंत दोघेही अनेकदा परस्परविरोधी उभे असल्याचे चित्र मतदारसंघात दिसत असे. परंतु शिवसेनेतून अपेक्षित राजकीय प्रगती न होताच आणि सत्तेच्या केंद्रापासून दूर जाताना आपली क्षमता मर्यादित होत असल्याची जाणीव झाल्याने म्हात्रे अखेर भाजपकडे झुकले. महापौर आणि आमदारकीपर्यंत स्पष्ट आश्वासनांचे दरवाजे त्यांच्या स्वागतासाठी उघडे करण्यात आले. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला मजबूत करण्यासाठी चव्हाण–म्हात्रे यांचे समीकरण बसविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेतल्याचे सांगण्यात येते.
कट्टर विरोधक एकत्र येत असताना मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेतही मैत्रीची अनोख पर्व पाहण्यास मिळाले. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील आणि शिवसेनेचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यातील दुरावा तर अगदी सर्वपरिचित. विविध कार्यक्रमांत ते एकमेकांवर जाहीर टीका करताना दिसतात. पण लोकसभा निवडणुकीत मनसेने उमेदवार न देता महायुतीला पाठिंबा दिला आणि पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचा मान राखत राजू पाटील यांनीच शिंदे यांच्या प्रचारात आगेकूच केली. श्रीकांत शिदेंनी विजय देखील मिळवला. एकेकाळचे टोकाचे विरोधक असलेले हे दोघे तेव्हा प्रथम एकत्र दिसले. मात्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा समीकरणं कोलमडली.
काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात राजू पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे आणि महेश गायकवाड एकत्र हितगुज करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे शिंदे–मनसे समीकरण पुन्हा जुळतेय का? पाटील पुन्हा शिंदेंशी जुळवून घेणार का? महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांत समन्वयाची नवी वाट निघतेय का? की ही फक्त राजकीय शिष्टाचार म्हणून एका कार्यक्रमात एकत्र आले? याची चर्चा सुरू झाली आहे.
डोंबिवली–कल्याणचा राजकीय पट वरकरणी शांत दिसला तरी त्याखाली सतत नवीन हालचाली सुरू आहेत. जे काल विरोधात होते ते आज एकत्र येत आहेत, आणि जे काल एकत्र होते ते आज दुरावले आहेत. त्यामुळे कोणी कायमचा मित्र आणि शत्रू नसतो नेहमीच नव्या समीकरणांना संधी असते हेच सिद्ध होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.