Operation Lotus Sarkarnama
विश्लेषण

Karnataka Politics : पाच राज्यांत मतदान जवळ आले आणि कर्नाटकात पुन्हा सुरू झाला 'MIND GAME...'

Operation Lotus : कर्नाटकमध्ये 'ऑपरेशन लोटस'ची चर्चा सुरू करण्यात आली आहे.

अय्यूब कादरी

Karnataka Political News : पाच राज्यांत विधानसभेची निवडणूक होत आहे. प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्याप्रमाणेच माइंड गेमही सुरू झाले आहे. एकदा ऑपरेशन लोटस यशस्वी झालेल्या कर्नाटक राज्याची या माइंड गेमसाठी निवड करण्यात आली आहे.

भाजपचे अमूक आमदार काँग्रेसमध्ये येणार, काँग्रेसचे अमूक आमदार भाजपमध्ये येणार असे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. यात कितपत तथ्य आहे, यापेक्षा पाच राज्यांतील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा माइंड गेम सुरू करण्यात आला आहे, हे मात्र निश्चित.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कर्नाटक सरकार कधीही कोसळू शकते - भाजपचा दावा

कर्नाटकचे मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम. बी. पाटील यांनी रविवारी खळबळजनक दावा केला आहे. भाजपचे २० आणि जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) किमना १० आमदार काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, असे त्यांनी सांगितले, तर दुसरीकडे काँग्रेसचे ५० आमदार आमच्या संपर्कात आहेत, कर्नाटक सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा भाजपचे आमदार मुरुगेश निराणी यांनी केला आहे. हे ५० आमदार भाजप पक्षश्रेष्ठींच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे मुख्यमंत्री होणार असतील, तर जनता दलाचे सर्व आमदार त्यांना पाठिंबा देतील, असे म्हणत जनता दलाचे नेते, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेसमधील नेतृत्वबदलाच्या चर्चेत आग ओतले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार या दोघांनीही खरपूस समाचार घेतला आहे.

कर्नाटकची निवड जाणीवपूर्वक -

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम येथे या महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. विविध सर्वेक्षणांनुसार यातील बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेसची स्थिती बळकट असल्याचे दाखवण्यात आले आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये माइंड गेम खेळला जात आहे. यासाठी कर्नाटकची निवड जाणीवपूर्वक करण्यात आलेली असावी, कारण तेथे ऑपरेशन लोटस एकदा यशस्वी झालेले आहे.

काँग्रेसचे सरकार पाडून भाजपचे येड्डीयुरप्पा मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर अलीकडेच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. सरकार स्थापन झाल्यापासून ते पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्याची चर्चा जाणीवपूर्वक सुरू करण्यात आली. सरकार कितीही मजबूत असले, स्पष्ट बहुमत असले तरी ते आम्ही पाडू शकतो, असा संदेश भाजपला द्यायचा असतो. कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पाडून त्यांनी तो संदेश दिला आहे.

कुमारस्वामींनीही खडा टाकून पाहिला -

काँग्रेसचे आमदार निवडून आले तरी ते फुटतात, भाजपसोबत येऊन सत्तेत सामील होतात, असा नॅरेटिव्ह भाजपने सेट केला आहे. निवडणूक होऊ घातलेल्या पाच राज्यांतील मतदारांनी हा संदेश देण्यासाठी कर्नाटकमध्ये पुन्हा ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू करण्यात आली आहे.

कर्नाटकात जनता दलाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय अलीकडेच जाहीर केला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीही एक खडा टाकून पाहिला. स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यात वाद निर्माण झाला होता.

काँग्रेस सत्तेत आली तरी त्यांचे नेते पदासाठी... -

पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्यानंतर डी. के. शिवकुमार यांनी दावा सोडला. लोकसभा निवडणुकीपर्यंत सिद्धरामय्या मुख्यमंत्री राहतील, त्यानंतर ते लोकसभा लढवून केंद्रात जातील आणि डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होतील, असा समझोता झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता.

ती बाब हेरूनच कुमारस्वामी यांनी, डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार असतील तर जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) सर्व आमदार त्यांना पाठिंबा देतील असे वक्तव्य केले. काँग्रेस सत्तेत आली तरी त्यांचे नेते पदासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, असा संदेश याद्वारे दिला गेला आहे.

वायएसआर तेलंगणा काँग्रसने तेलंगणात विधानसभा निवडणुकीतून माघार घेत काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. तसा निर्णय त्या पक्षाच्या संस्थापक, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्या भगिनी वाय. एस शर्मिला यांनी नुकताच जाहीर केला आहे. त्यामुळे सत्ताधारी बीएआरस पक्षाची वाट बिकट झाली असून, काँग्रेसचा उत्साह वाढला आहे.

पाच राज्यांत काँग्रेस सुस्थितीत असल्याचे विविध सर्वेक्षणांतून समोर आले आहे. त्यामुळेही काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. त्याला चाप लावण्यासाठीच कर्नाटकमध्ये हा 'माइंड गेम' खेळला जात आहे.

(Edited by -Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT