Shivaji nilgekar, Vilasrao deshmukh, Shivaraj patil-chakurkar  Sarkarnama
विश्लेषण

Latur Lok Sabha Constituency Analysis : विलासराव, निलंगेकर, चाकूरकरांना पराभवाची धूळ चारणाऱ्या लातूरकरांचा नवा खासदार कोण?

Sudhakar Shrungare Vs Shivaji Kalge News : स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या या लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळेच दुसऱ्यांदा भाजपचे सुधाकर शृंगारे की काँग्रेसचे शिवाजीराव काळगे यांच्यापैकी लातूरकरांचा नवा खासदार कोण? असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Sachin Waghmare

Latur Politics News : लातूरच्या मतदारांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शिवाजीराव निलंगेकर, आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकरांना निवडणुकीत पराभवाची धूळ चारली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या या लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळेच दुसऱ्यांदा भाजपचे सुधाकर शृंगारे की काँग्रेसचे शिवाजीराव काळगे यांच्यापैकी लातूरकरांचा नवा खासदार कोण? असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

राजकीय दृष्ट्या सुजलाम सुफलाम असलेल्या लातूर जिल्ह्याने दुष्काळाची दाहकता अनुभवली आहे. विलासराव देशमुख जवळपास दोन टर्म म्हणजे 8 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यापूर्वी त्यांनी सातत्याने राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपद भूषवले होते.

शिवराज पाटील चाकूरकर (Shivaraj Patil Chakurkar ) हे केंद्रात सातत्यानं महत्वाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री, लोकसभेचे सभापतिपद, राज्यपाल अशी विविध पदे भूषवली. शिवाजीराव पाटील-निलंगेकर हे काही काळ मुख्यमंत्री होते तर बरेच दिवस राज्य मंत्रिमंडळात मंत्री होते. या सर्व दिग्गजांनी सातत्याने प्रतिनिधित्व करुनही लातूरला २०१४ साली रेल्वेने पाणी देण्याची वेळ आली होती. 

सलग सात लोकसभा निवडणुकीत चाकूरकर झाले होते विजयी

1982 साली तेंव्हाच्या उस्मानाबाद जिल्ह्यातून लातूरची निर्मिती झाली. गेल्या चार दशकात संपूर्ण देशात लातूरने स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. लातूर लोकसभा निवडणुकीचा इतिहास पहिला तर या ठिकाणी 1984 पासून सलग सात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून शिवराज पाटील चाकूरकर यांनी विजय मिळवत वर्चस्व प्राप्त केले होते. त्यामुळे या मतदारसंघाची ओळख काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला अशीच राहिली. यापूर्वीच्या निवडणुकांत शिवराज पाटील चाकूरकर यांनी जनता दलाचे (कै.) बापूसाहेब काळदाते, राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील आदी दिग्गजांच्या या मतदारसंघात पराभव केला होता.

2004 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र, भाजप नेत्यांचे प्रयत्न आणि मतदारांच्या सहानुभूतीमुळे लातूर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार रूपाताई दिलीपराव पाटील-निलंगेकर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता.

2008 साली झालेल्या फेररचनेत लातूर लोकसभा मतदारसंघ राखीव झाला. या मतदारसंघात लातूर शहर, लातूर ग्रामीण, अहमदपूर, उदगीर आणि निलंगा हे लातूर जिल्ह्यातील पाच आणि लोहा या नांदेड जिल्ह्यातल्या एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

काॅंग्रेसने 2009 च्या निवडणुकीत भाकरी बदलली आणि माजी मंत्री जयवंत आवळे यांना उमेदवारी दिली. तर तिकडे भाजपनेही रुपाताई निलंगेकर यांच्याऐवजी सुनील गायकवाड यांना मैदानात उतरवले. 2009 च्या निवडणुकीत उमेदवार बदलण्याचा निर्णय काॅंग्रेसच्या पथ्यावर पडला, काँग्रेसचे उमेदवार जयंतराव आवळे (Jaynatrao Awale) विजयी झाले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार सुनील गायकवाड यांचा निसटत्या मताने पराभव केला होता. थोडक्यात का होईना पण 7 हजार 900 मतांनी आवळे यांनी विजय मिळवत लातूरची जागा परत मिळवली.

कमबॅकची ही संधी काॅंग्रेसला 2014 मध्ये कायम राखता आली नाही. आवळे यांच्या पाच वर्षाच्या कामगिरीवर लातूरकर नाराज होते. भाजपने पुन्हा सुनील गायकवाड यांना संधी दिली. तर काॅंग्रेसने उमेदवार बदलाची पंरपरा कायम राखत दत्तात्रय बनसोडे यांना रिंगणात उतरवले. काॅंग्रेसचा प्रयोग येथेही फसला आणि भाजपचे गायकवाड तब्बल अडीच लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले.

2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुधाकर श्रृंगारे यांनी काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांचा 2 लाख 89 हजार 111 मतांनी पराभव केला होता. त्यामुळे आता दुसऱ्यांदा सुधाकर श्रृंगारे बाजी मारणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

देशमुख घराण्याची प्रतिष्ठापणाला

यावेळेसच्या निवडणुकीत लातूर लोकसभा मतदारसंघात पाणी प्रश्न, बेरोजगारी, रेल्वे कोच कारखाना, शेतमालाला भाव, सिंचन व्यवस्था, रस्ते हे मुद्दे महत्त्वाचे होते. काँग्रेसने लिंगायत समाजाचा विचार करत शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. संपूर्ण देशमुख कुटुंब काळगे यांच्या प्रचारासाठी उतरले होतं. त्यामुळे काळगे यांचा विजय हा देशमुख घराण्यासाठी प्रतिष्ठेचा आहे.

लातूर लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या प्रचारसभा झाल्या. पण, या दोन्ही नेत्यांनी स्थानिक मुद्यांवर फोकस न करता एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. हा मुद्दा देखील मतदारांमध्ये चर्चेचा ठरला. यापूर्वी दिग्गज नेत्यांना पराभवाचं आस्मान दाखवणारे लातूरकर मतदार या निवडणुकीत काय निर्णय घेतात हे चार जूनला स्पष्ट होईल. 

SCROLL FOR NEXT