Sudhkar Shrungare, Shivaji  Kalge
Sudhkar Shrungare, Shivaji Kalge  Sarakarnama
विश्लेषण

Latur Lok Sabha Election Result : डाॅ. काळगेंच्या रुपाने लातूरच्या गढीवर पुन्हा देशमुखांचाच झेंडा

Sachin Waghmare

Latur Lok Sabha Election : लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुधाकर शृंगारे आणि कॉंग्रेसचे डॉ. शिवाजी काळगे यांच्यात चुरशीची लढत झाली. या मतदारसंघात सलग दोनवेळा भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा गड मानला जात हाेता.

यावेळी माजी मंत्री अमित देशमुख यांनी लोकांच्या मूलभूत प्रश्नांना हात घालत ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आणि कोणत्याही परिस्थितीत कॉंग्रेसचा (congress) उमेदवार निवडून आणायचाच, या निर्धाराने संपूर्ण देशमुख कुटुंबीयांसह कॉंग्रेस नेते, पदाधिका-यांनी मित्रपक्षांच्या साथीने जोर लावला. त्यामुळे डॉ. काळगे यांच्या मागे बळ उभारण्यास मदत झाली अन त्याच जोरावर त्यांनी 61 हजार 881 मतांचा लीड मिळवत बाजी मारली.

लातूर लोकसभा निवडणुकीत डॉ. काळगे (Shivaji Kalge) यांनी बाजी मारत 61 हजार 881 मताधिक्यांनी भाजपचे खासदार सुधाकर शृंगारे यांचा पराभव केला. काळंगे याना 6 लाख 9 हजार 21 मते घेतली तर 5 लाख 47 हजार 140 मते मिळाली. भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे दुसऱ्यांदा खासदार होणार का याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र, मागच्या 5 वर्षांत ते फारसे मतदारसंघात फिरकले नाहीत, असा आरोप होत होता.

त्यामुळे त्यांच्यावर नाराजी होती. परंतु पक्षाने पुन्हा त्यांनाच संधी दिल्याने स्थानिक भाजप नेत्यांत नाराजी होती. त्यामुळे भाजप नेत्यांत म्हणावा तसा समन्वय दिसला नाही तर दुसरीकडे कॉंग्रेसने डॉ. काळगे यांच्या रूपाने नवा कोरा, सुशिक्षित, सुपरिचित चेहरा मैदानात उतरविला. त्याचाही सकारात्मक परिणाम झाल्याची चर्चा आहे.

यासोबतच कॉंग्रेस नेत्यांनी सुरुवातीपासून प्रचारात आघाडी घेत लोकांचे मूलभूत प्रश्न ठासून मांडले. त्यातच एक सुशिक्षित, उच्च शिक्षित, सुस्वभावी उमेदवार म्हणून डॉ. काळगे यांची प्रतिमा प्रभावी ठरली. त्यामुळे प्रचारादरम्यान कॉंग्रेसच्या गोटात उत्साह तर भाजप नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कॉंग्रेसने सामाजिक समीकरण लक्षात घेऊन लिंगायत उमेदवार मैदानात उतरविल्याचाही फायदा झाल्याचे बोलले जात आहे. या माध्यमातून माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी बेरजेचे राजकारण केले. कारण नेहमीच भाजपला भक्कम साथ देणा-या लिंगायत समाजाला डॉ. काळगे यांच्यासाठी फेरविचार करावा लागला, यात शंका नाही. त्यातल्या त्यात ग्रामीण भागातील लिंगायत समाजही डॉ. काळगे यांच्या बाजूने उभा राहिला.

या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे संपूर्ण कुटूंब अनेक वर्षानंतर प्रचारासाठी बाहेर पडले होते. अमित देशमुख (Amit deshmukh), धीरज देशमुख, त्यांच्या मातोश्री वैशाली देशमुख, माजी आमदार दिलीप देशमुख ही सर्व मंडळी प्रचारासाठी बाहेर पडली. त्यांनी वाडया वस्त्या पिंजून काढल्या त्या सर्व बाबीचा फायदा डॉ. काळगे यांना झाला.

डॉ. काळगे यांचे गाव शिरुर अनंतपाळ तालुक्यात असल्याने निलंगा विधानसभा मतदारसंघातून त्यांना भक्कम पाठबळ मिळाल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे यावेळी मोदी लाट फारशी जाणवली नाही. उलट मोदी सरकारबद्दल रोषच प्रकट झाला. त्याचाही फायदा कॉंग्रेस पक्षाला झाला.

लातूर लोकसभा मतदारसंघात लातूर शहर, लातूर ग्रामीण, उदगीर-जळकोट, निलंगा, अहमदपूर-चाकूर आणि नांदेड जिल्ह्यातील कंधार-लोहा हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. मागच्या १० वर्षांत म्हणजेच २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला नेहमीच लातूर शहरासह निलंगा, शिरुर अनंतपाळ, देवणी, उदगीर, अहमदपूर आणि लोहा-कंधारमधून भरभरून साथ मिळत होती. त्यामुळेच भाजपला मोठ्या फरकाने विजय संपादित करता आला होता.

या वेळेसच्या निवडणुकीत जातीय समीकरणाचा विचार करून कॉंग्रेसने दिलेली उमेदवारी आणि ग्रामीण भागात केंद्र आणि राज्य सरकाराविषयी असलेला रोष आणि दलित, मुस्लिम समुदायात केंद्र आणि राज्य सरकारबद्दल असलेली नाराजी ही कॉंग्रेस पक्षाच्या पत्त्यावर पडल्याचे चित्र आहे. याचा डॉ. काळगे यांना या सर्व बाबीचा मोठा फायदा झाला आहे. त्या जोरावरच डॉ. काळगे यांनी या निवडणुकीत कोरी पाटी असताना बाजी मारली.

राजकीय प्राबल्याचा विचार केल्यास भाजप (Bjp) महायुतीचे बळ अधिक होते. कारण लातूर शहरात भाजपची शक्ती ब-यापैकी आहे. यासोबतच लातूर ग्रामीणमध्ये आमदार रमेश कराड यांची ताकद आहे. याशिवाय निलंगा, शिरुर अनंतपाळ, देवणीतून नेहमीच भाजपला भक्कम साथ मिळते.

याशिवाय अहमदपूरमध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील आणि उदगीर-जळकोटमध्ये मंत्री संजय बनसोडे यांची ताकद होती. त्यामुळे भाजप यावेळीही सहज बाजी मारेल, असे वाटत होते. परंतु मतदारांमध्ये सरकारबद्दलचा राग बरेच काही सांगून गेला आणि लोकांनी महायुतीविरोधात भरभरून मतदान केले. त्याचा परिणाम निकालातून दिसला त्यामुळेच डॉ. काळगे यांनी मोठी लीड घेत बाजी मारली.

SCROLL FOR NEXT