विश्लेषण

लातूरमध्ये बांधकाम व्यावसायिक व उद्योजकामध्ये रंगणार सामना

हरी तुगावकर

लातूर : लातूर अनुसूचित जाती लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष व कॉंग्रेस या दोन्ही पक्षाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भारतीय जनता पक्षाने मुंबईचे बांधकाम व्यवसायिक सुधाकर शृंगारे यांना तर कॉंग्रेसने पुण्याचे उद्योजक मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी दिली आहे. हे दोन्ही उमेदवार मुळचे लातूर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे या मतदारसंघात बांधकाम व्यवसायिक व उद्योजक अशाच सामना रंगणार आहे. 

भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार डॉ. सुनील गायकवाड यांचा पत्ता कट करून उमेदवारीची माळ श्री. शृंगारे यांच्या गळ्यात टाकली आहे. श्री. शृंगारे हे मुळचे घरणी (ता. चाकूर) येथील आहेत. सामान्य कुटुंबातून ते पुढे आले. बी.एसस्सी.पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबई जवळ केली. बांधकाम व्यवसायात त्यांनी आपली पावले घट्ट रोवली. त्यात यशही मिळवले. आज त्यांची एस.एस. कन्स्ट्रक्‍शन नावाने मोठी फर्म आहे. या क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा मिळवला आहे. 

मुंबई रोटरी क्‍लबचे अध्यक्ष, पॅनीक क्‍लबचे अध्यक्ष, शुभम चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, मुंबई टॅक्‍सी संघटनेचे सदस्य अशी अनेक पदे त्यांनी मुंबईत भुषवली आहेत. त्यांच्या पुढाकारातून मुंबईत मोफत रुग्णवाहिका चालवली जाते. काही वर्षापासून ते भारतीय जनता पक्षाच्या जवळ आले. 2016 च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वडवळ नागनाथ या गटातून ते विजयी झाले. राजकारणातील हा त्यांचा पहिला प्रवेश होता. गेल्या दोन अडीच वर्षात त्यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. यातूनच त्यांनी लोकसभेची तयारी सुरु केली होती. पक्षाने त्यांना आता उमेदवारी देवू केल्याने ते जोमाने कामाला लागले आहेत. 

कॉंग्रेस कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर कॉंग्रेसने मच्छिंद्र गुणवंतराव कामंत यांना उमेदवारी दिली आहे. श्री. कामंत हे मुळचे कासराळ (ता.उदगीर) येथील आहेत. त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून बी.कॉम.ची पदवी घेतली आहे. त्यानंतर पुणे विद्यापीठातून त्यांनी एम. कॉम केले. वाणिज्य क्षेत्राची पदवी घेतल्याने त्यांनी उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले. पुण्यातील हिंजवडी भागात साईधन सरफेस टेक (ऑटो मोबाईल प्रोडक्‍टस पावडर कोटिंग कंपनी), निलसन एनर्जी सोल्युशन प्रा. लि., डी. एम. कामत फूड प्रॉडक्‍टस प्रा. लि. (कामत मसाले ब्रॅण्डने मसाले पावडर उत्पादन कंपनी), पुण्यात त्यांचा हॉटेल व्यवसायही आहे. 

पुणे एज्युकेशन सोसायटीचे ते संस्थापक आहेत. महाराष्ट्र युवक परिषद व युवक क्रांती दलाच्या चळवळीत त्यांनी काम केले आहे. दापोडी (पुणे)येथील ग्राहक सहकारी संस्थेचे ते सचिव आहेत. दि स्टेट गव्हर्नमेंट सर्व्हंन्टस को.ऑप. क्रेडीट सोसायटीचे ते उपाध्यक्ष आहेत. कामगार चळवळीतही त्यांनी काम केले आहे. श्री. कामत यांनी 2009 मध्ये उदगीर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. यात त्यांचा पराभव झाला होता. आता ते लोकसभा निवडणुकीत पुन्हा राजकीय नशीब आजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. या मतदारसंघात बांधकाम व्यावसायिक विरुद्ध उद्योजक असा सामना रंगणार आहे. या दोन्ही राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यापेक्षा " श्रीमंती' पाहून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे लातूरकर आपल्या मताचे दान कोणाच्या पारड्यात टाकतात याकडे आता लक्ष लागले आहे. 
 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT