Chirag Paswan and Nitish Kumar
Chirag Paswan and Nitish Kumar  Sarkarnama
विश्लेषण

चिराग पासवानांचा नितीशकुमारांना जाहीर पाठिंबा अन् दिलजमाईची चर्चा

सरकारनामा ब्युरो

पाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे (Lok Janshakti Party) अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्यातील वैर सर्वांनाच माहिती आहे. नितीश यांनी चिराग यांचा पक्ष फोड़ून मोठा धक्का दिला होता. परंतु, आता चिराग हे नितीशकुमारांच्या पाठीशी उभे राहिल्याने राज्यातील राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

नितीशकुमार यांनी दारुबंदीचा मुद्दा उचलून धरला आहे. त्यांच्या सरकारमध्ये सहभागी असलेले माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी हेच आता या विरोधात उघडपणे भूमिका घेऊ लागले आहेत. दारुबंदीमध्ये गरीब लोकांनाच त्रास दिला जातो आणि बेकायदा दारु विक्री करणाऱ्यांना अटकही होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

चिराग हे सातत्याने नितीशकुमार यांना लक्ष्य करीत असतात. आता मात्र ते नितीशकुमार यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. दारुबंदीच्या मुद्द्यावर त्यांनी नितीश यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. अनेक राजकीय पक्ष दारुबंदीचा पुनर्विचार करीत असले तरी आमचा याला पाठिंबा नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

चिराग पासवान यांनी विधानसभा निवडणुकीवेळी राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी (एनडीए) फारकत घेत राष्ट्रीय पातळीवर भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली होती. चिराग पासवान यांच्यामुळे जेडीयूला विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला होता. लोक जनशक्ती पक्षाने राज्यभरात भाजपच्या विरोधात उमेदवार दिले नव्हते. मात्र, जेडीयूच्या विरोधात उमेदवार दिले होते. अनेक भाजप नेत्यांनी पक्ष सोडून लोक जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून जेडीयू उमेदवारांच्या निवडणूक लढवली होती. यामुळे जेडीयूचा अनेक ठिकाणी पराभव झाला होता.

लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे मागील वर्षी निधन झाले. त्यानंतर पक्षाची धुरा त्यांचे पुत्र चिराग पासवान यांच्याकडे आली. रामविलास पासवान यांच्या निधनानंतर वर्षभरातच पक्ष फुटला होता. पाच खासदारांनी चिराग यांच्या विरोधात बंड केले होते. ही फूट पाडण्याचे सूत्रधार दुसरे-तिसरे कुणी नसून, चिराग यांचे काका पशुपतीकुमार पारस होते. पशुपती हे रामविलास यांचे लहान बंधू आहेत. अखेर त्यांना भाजपने केंद्रीय मंत्रिपद दिले होते.

पारस यांच्या विरोधात चिराग पासवान यांनी थेट उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. परंतु, उच्च न्यायालयाने चिराग यांची याचिका फेटाळून लावली. लोकसभा अध्यक्षांनीही पारस यांना पक्षाचे संसदीय नेते म्हणून मान्यता दिली होती. या विरोधात चिराग यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली . या याचिकेत तथ्य दिसत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. यामुळे चिराग यांना मोठा धक्का बसला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT