eknath shinde devendra fadnavis ajit pawar uddhav thackeray sharad pawar nana patole sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election 2024 : राज्यात 22 मतदारसंघात टक्का वाढला, तर 26 जागांवर कमी मतदान; आकडेवारी कोणाच्या पथ्यावर?

Sachin Waghmare

लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात तरी मतदानाची टक्केवारी वाढविण्याची संधी महाराष्ट्राने गमावली. पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 पैकी बहुतांश मतदारसंघ शहरी भागात असल्याने येथील मतदार मतदानासाठी घराबाहेर पडत नसल्याचा पूर्व अनुभव पाहता निवडणूक आयोगाने केलेल्या आवाहनाकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे राज्यात 54.33% टक्के मतदान झाले. राज्यात दिंडोरीत सर्वाधिक 66% तर सर्वात कमी मतदान कल्याणमध्ये 47% झाले.

देशातील आठ राज्यातील 49 मतदारसंघात सरासरी 60 टक्के मतदान झाले. पाच टप्प्यात राज्यात सरासरी 60.78% मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात 63.71% दुसऱ्या टप्प्यात 63.55% मतदान झाले. तर तिसऱ्या टप्प्यात 63.55%, चौथ्या टप्प्यात 59.64%, टक्के मतदान झाले. त्यामुळे हे कमी झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 च्या तुलनेत राज्यातील जवळपास 22 मतदारसंघातील मतदानात वाढ झाली आहे. तर 26 मतदारसंघातील टक्केवारी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत घसरली आहे. त्यामुळे काही ठिकाणी वाढलेला टक्का व काही ठिकाणी कमी झालेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहण्यासाठी आता सर्वांना 4 जूनची वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष आता निवडणूक निकालाकडे लागले आहे.

टक्केवारी वाढलेले मतदारसंघ -

2019 च्या तुलनेत या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढली आहे : चंद्रपूर, वर्धा, अकोला, अमरावती, यवतमाळ-वाशिम, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, लातूर, नंदुरबार, जळगाव, जालना, पुणे, अहमदनगर, बीड, भिवंडी, कल्याण, ठाणे.

कमी टक्केवारी असलेले मतदारसंघ -

2019 सालच्या तुलनेत कमी मतदान झालेले मतदार संघ पुढील प्रमाणे : भंडारा-गोंदिया, गडचिरोली, नागपूर, रामटेक, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, परभणी, बारामती, माढा, सांगली, रायगड, औरंगाबाद, मावळ, शिरूर, शिर्डी, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण-मध्य.

या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांनी जेष्ठ नेते, शरद पवार ( Sharad Pawar ) यांचे नाव न घेता महाराष्ट्रातील 'भटकती आत्मा', असा केलेला उल्लेख, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी 'एनडीए'सोबत येण्याची दिलेली ऑफर, 'असली शिवसेना' व 'नकली शिवसेना' असा केलेला उल्लेख, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेला बिनशर्त पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी केलेले गौप्यस्फोट, अशा विविध कारणांनी गाजली.

ही निवडणूक मोहिते-पाटील घराण्याने भाजपचा हात सोडून शरद पवार यांचा हात धरला. नाशिकच्या महायुतीच्या जागेवर सर्वाधिक घोळ घातला गेला. उमेदवारी न मिळाल्याने मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी शेवटपर्यंत कायम असल्याचे चित्र होते. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीची साथ सोडली. आमदार नीलेश लंकेंनी अजित पवार यांची सोडलेली साथ या कारणामुळे चर्चेत राहिली.

या वेळेसच्या लोकसभा निवडणुक प्रचारात कुठल्याच विकासात्मक मुद्दे पुढे आले नाहीत. तर या निवडणुकीत विकासाचे मुद्दे हरवलेले दिसले. त्यामुळे राजकीय नेते विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याऐवजी आरोप-प्रत्यारोप करीत एकमेकांवर सभेतून चिखलफेक करताना दिसत होते. भाजपकडून 'असली शिवसेना' व 'नकली शिवसेना' म्हणत सेना नेते उद्धव ठाकरेंना डिवचत आहेत. तर दुसरीकडे या आरोपांवर उत्तर देण्यातच शिवसेनेचा बराचसा वेळ जात आहे. त्यामुळे ही निवडणूक पूर्णपणे भरकटलेली दिसत होती.

आतापर्यंत या निवडणुकीत मतदानाचे एक-एक टप्पे करीत पाच टप्पे पूर्ण झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या या प्रश्नांवर सत्ताधारी काहीच बोलत नाहीत. तर विरोधक या प्रश्नावरून सरकारला घेरण्याची संधी असताना हे मुद्दे मांडत नाहीत. राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला राज्यातील जनता कंटाळली आहे. या पाच वर्षांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष झाले तर काँग्रेसमधील बरेच नेते भाजपने फोडले. त्यामुळे या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. त्याचा परिणाम मतदानावर झालेला दिसत आहे.

पाचव्या टप्प्यात देशातील लोकसभेच्या 543 जागांपैकी 429 म्हणजे जवळपास 80 टक्के मतदारसंघातील मतदान आता पार पडले आहे. उर्वरित दोन टप्प्यांमध्ये केवळ 124 मतदारसंघ शिल्लक राहीले आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पहिल्या पाच टप्प्यातील आकडेवारी पाहता कमी मतदान झाले आहे. त्यामुळे हा घटलेला टक्का कोणाच्या मदतीला येणार व कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, अशी सरळ लढत होत आहे.

सोमवारी पाचव्या टप्प्यात राज्यात सरासरी 54.33 टक्के मतदान झाले आहे. गेल्या 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान कमी झाले आहे, तर दुसरीकडे 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत ही टक्केवारी कमी आहे. त्यामुळे हा कमी झालेल्या मतांचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महायुतीचा फायदा होणार की महाविकास आघाडीचा हे समजून येण्यासाठी सर्वांना 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT