Bharati Pawar, Ajit Pawar Sarkarnama
विश्लेषण

Lok Sabha Election 2024 : अजित पवारांच्या भूमिकेमुळे भारती पवारांचे वाढणार टेन्शन !

Arvind Jadhav

Nashik News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद सर्वात मोठी आहे. भाजपवर नाराज असलेला मतदार आपल्या बाजूने वळवणे हे अजित पवारांसह भाजपच्या फायद्याचे गणित आहे. त्यामुळे अजित पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर हक्क सांगू शकतात, अशी चर्चा आहे. अजित पवारांनी अशी भूमिका घेतल्यास केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांचे राजकीय भवितव्य मात्र टांगणीला लागू शकते.

पक्ष व आमदारांची अपात्रता यावर निर्णय जाहीर होत नव्हता तोपर्यंत नाशिकमधील राष्ट्रवादीचे नेते शांत बसले होते. मात्र, निवडणूक आयोगापाठोपाठ आता विधानसभा अध्यक्षांनी आपला निर्णय दिला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या काही इच्छुक उमेदवारांनी नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी गाठीभेटी घेत उमेदवारीवर हक्क सांगण्यास सुरूवात केली आहे.

मात्र, नाशिकपेक्षा अजित पवारांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघ सोयीचा ठरू शकतो, असा एक मतप्रवाह आता तयार झाला आहे. नाशिकच्या मोबदल्यात दिंडोरी हे राजकीय समीकरण भाजपच्या हिताचे नक्कीच आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षात फुट पडल्यानंतर जिल्ह्यातील सहा आमदारांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यातील चार आमदार हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात येतात. मंत्री छगन भुजबळ, माजी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, नितीन पवार, दिलीप बनकर यांचा यात समावेश आहे. पक्षाची ताकद असल्याने या मतदारसंघावर अजित पवार गटाचा हक्क प्रस्थापित होतो. मागील चार टर्मपासून भाजपचा बालेकिल्ला असलेला दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आता पक्षापासून दूर चालल्याची चिन्हे समोर येत आहे.

कांदा निर्यातबंदी, द्राक्ष निर्यातीला अनुदान नसणे तसेच बांगलादेशाने आयात शुल्क लावणे यामुळे कांद्यासह द्राक्षाचे भाव कोसळले आहेत. शेतमालाची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. विशेष म्हणजे दिंडोरी मतदारसंघ हा शेतकरी बहुल आहे. भाजपसह इतर पक्षांनी केलेल्या सर्व्हेत केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

नाशिकची जागा आपल्याकडे घेऊन भाजप महायुतीसाठी डोकेदुखी ठरू शकणारा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सहज देऊ शकतो, हा राजकीय विश्लेषकांचा दावा याचमुळे योग्य ठरतो. नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे. भाजपच्या तीन आमदारांसह अजित पवार गटाचे दोन आमदार येथे असून, धार्मिक धृवीकरणासाठी नाशिकवर झेंडा फडकविण्यासाठी भाजप केव्हांपासूनच आतूर आहे.

असे ठरू शकते जागा वाटप...

सध्या नाशिकमध्ये शिवसेना, दिंडोरी आणि मालेगाव - धुळे मतदारसंघावर भाजपची सत्ता आहे. पक्षफूट आणि मतदारांचा ओढा लक्षात घेता आता नाशिकसाठी भाजप, दिंडोरीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि मालेगाव - धुळे मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गट अशी विभागणी होऊ शकते.

यात भाजपची एक जागा कमी होणार असली तरी पराभव पदरी पाडून घेण्यापेक्षा सहकारी पक्षाला चाल देण्याचा व्यवहार्य निर्णयाकडे भाजप झुकू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. नाशिकसाठी भाजपकडून निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी मोठी रांग आहे. अजित पवारांना दिंडोरीमधून उमेदवार देणे तितके अवघड ठरणार नाही. तर, मालेगाव - धुळे मतदारसंघासाठी पालकमंत्री दादा भुसे यांचे पुत्र पुढे येऊ शकतात.

भारती पवारांची राजकीय कोंडी...

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नकारात्मक वातावरण भाजपसह केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्यासाठी डोकेदुखी ठरला आहे. कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लागू केली. यामुळे देशभरात कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. एकीकडे दिंडोरी हा एकमेव मतदारसंघ तर दुसरीकडे लोकसभेचे महत्त्वपूर्ण गणित भाजपच्या डोळ्यासमोर आहे. यात भाजपने कांदा उत्पादकांपेक्षा ग्राहकांसमवेत जाण्याचा निर्णय घेतला.

यातून शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर करण्यात भारती पवार यांना म्हणावे तसे यश मिळाले नाही, अशी भावना भाजप परिवारात झाली आहे. त्यामुळे भाजपने दिंडोरीला ‘बाय’ दिल्यास नवल वाटायला नको! भाजपच्या या धोरणाचा सर्वाधिक फटका भारती पवार यांनाच बसणार आहे. त्यातच जागा वाटपात भाजपने माघार घेतल्यास भारती पवार यांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागण्याची शक्यता आहे. अर्थात त्यांनी लढण्याचे ठरवले तर विरोधकांची दारे त्यांना सताड उघडी असतील हे तेवढेच खरे!

अजित पवारांना नाशिक हा पर्याय, पण...

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे, निवृत्ती अरिंगळे अशी काही नावे समोर येत आहे. अजित पवारांनी हिरवा कंदील दर्शवल्यास आपण निवडणूक लढण्यास तयार असल्याचा दावा संबंधित इच्छुकांनी केला आहे. मात्र, अजित पवारांना नाशिकपेक्षा दिंडोरी मतदारसंघ केंव्हाही फायदेशीर आहे.

राष्ट्रवादी पक्ष एकत्र असताना नाशिक लोकसभेसाठी तीन वेळा समीर भुजबळ यांनी निवडणूक लढवली. यातील दोन वेळा त्यांच्या पदरात निराशा पडली. सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे आणि सरोज आहिरे हे अनुक्रमे सिन्नर आणि देवळाली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT