Political News : लोकसभा निवडणुकीत जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीतही अंतर्गत धुसफूस सुरू आहे. महायुतीत सहभागी झालेल्या शिवसेना शिंदे गटाची जागा पदरात पाडून घेण्यासाठी दमछाक सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. शिंदे गटाच्या काही विद्यमान खासदारांनाही तिकीट मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत. अर्थात शिंदे गटाला भाजपसमोर नमते घ्यावे लागत असल्याचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये गेला आहे. तिकडे, महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाने मात्र उमेदवारांची यादी जाहीर करून आपले स्थान भक्कम असल्याचे दाखवून दिले आहे.
ठाकरे गटाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करताना महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीला काँग्रेसला विश्वासात घेतले नसल्याची टीका झाली. त्यामुळे महाविकास आघाडीत धुसफूसही झाली. विरोधकांनी निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. ज्यांनी म्हणजे संजय राऊत यांनी शिवसेना-भाजप युती तोडली तेच आता महाविकास आघाडी तोडतील, अशी टीका विरोधकांनी केली. मात्र, महाविकास आघाडी किंवा संजय राऊत यांनी या टीकेला कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही.
महायुतीत शिंदे गटाची सध्या जी अवस्था झाली आहे, तशी ठाकरे गटाची महाविकास आघाडीत झालेली नाही, जणू असाच संदेश संजय राऊत यांना द्यायचा होता. ते काम त्यांनी व्यवस्थितपणे केले आहे. (Lok Sabha Election 2024 News)
नाशिकच्या जागेवरून महायुतीत सध्या प्रचंड वाद सुरू आहे. शिंदे गटाचे हेमंत गोडसे नाशिकचे विद्यमान खासदार आहेत. 2024 च्या निवडणुकीत गोडसे यांचा पत्ता कट करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे शिंदे गटात चिंता निर्माण झाली आहे. सर्वेक्षण नकारात्मक आहे, असे कारण पुढे करून भाजपकडून शिंदे गट आणि अजितदादा गटाची कोंडी केली जात असल्याचे समोर येत आहे. जागा शिंदे गट आणि अजितदादा गटाला जागा सुटली तरी तेथे आपलाच उमेदवार द्यायचा, असाही प्रकार भाजपकडून सुरू आहे. याची प्रचिती उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघात सुरू असलेल्या घडामोडींवरून येत आहे.
सेवानिवृत्त आएएएस अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी उस्मानाबाद मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. आता ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याची चर्चा सुरू आहे, त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. जागा राष्ट्रवादीला सुटली तरी या पक्षाकडूनही परदेशी हेच उमेदवार असतील, असे सांगितले जाऊ लागले आहे.
भाजपला लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे प्रसंगी ते मित्रपक्षांना डावलण्यास, त्यांना नाराज करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. विधानसभा निवडणुकीत तुमचा मान राखला जाईल, असे सांगत मित्रपक्षांची समजूत काढली जाऊ शकते. जागावाटपाचा तिढा सोडवा, उमेदवारी आम्हाला द्या, असे म्हणत शिंदे गटातील काही नेत्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठावा लागत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजप जास्त जागा लढवण्यावर ठाम असून, मित्रपक्षांच्या मागण्यांना फारसे महत्त्व दिले जात नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता आहे. ठाकरे गटाने मात्र अशा अस्वस्थतेला थारा दिलेला नाही. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून उमेदवारीसाठी अंबादास दानवे अखेरपर्यंत अडून बसले होते, मात्र उमेदवारी चंद्रकांत खैरे यांना देण्यात आली. आता शिर्डी मतदारसंघातही धुसफूस सुरू आहे, त्याला उद्धव ठाकरे कसे सामोरे जातात, हे पाहावे लागेल.
एकेक जागा मिळवण्यासाठी शिंदे गटाला कसरत करावी लागत असताना ठाकरे गटाने सांगली मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे. सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी जोर लावला होता. तरीही ठाकरे गटाकडून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, यासाठी काँग्रसेचे नेते, माजी मंत्री विश्वजित कदम (Vishvjeet Kadam) यांनी दिल्लीत जाऊन राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली. त्यामुळे आता पुढे काय होणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
एकंदर, तिकडे महायुतीत शिंदे गटाचा जीव टांगणीला लागलेला असताना इकडे महाविकास आघाडीस ठाकरे गट मात्र सुरक्षित, मान राखून असल्याचा संदेश लोकांमध्ये जावा, यासाठीच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 17 उमेदवारांची यादी जाहीर केली.
R