Dharashiv News : धाराशिव लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाल्यापासून राज्यभरात चर्चेचा विषय ठरला होता. त्याचं कारण म्हणजे वर्षानुवर्षे हा मतदारसंघ महायुतीत शिवसेनेकडे होता. त्यामुळे ही जागा कोणाकडे जाणार ? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड आग्रही असलेल्यांपैकी हा एक मतदारसंघ होता. अखेर हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला.
शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thakeray) एकनिष्ठ राहिलेल्या ओमराजे निंबाळकरांविरोधात कोण निवडणूक लढणार, यावरून मोठा खल झाल्यानंतर अखेर महायुतीला अर्चना पाटलांच्या (Archana Patil) रूपाने ओमराजेंविरोधातला उमेदवार हाती लागला आहे. वीस वर्षांत यापूर्वी पाच निवडणुकांत पाटील-राजेनिंबाळकर कुटुंबात भाऊबंदकीतील संघर्ष कायम पाहावयास मिळतो. आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या दोन कुटुंबातील पाचव्यांदा पारंपरिक लढत पाहायला मिळणार आहे. (Lok Sabha Election 2024 News)
पद्मसिंह पाटील आणि दिवंगत नेते पवन राजेनिंबाळकर या दोन चुलत बंधूंतील वैर सर्वश्रुत होते. दोन्ही भावांतील संबंध 2002 पर्यंत खूप चांगले होते. पद्मसिंह पाटील राज्याचे राजकारण पाहत होते, तर जिल्ह्याच्या राजकारणावर पवनराजे निंबाळकर यांचा पगडा होता. जिल्हा बँक व तेरणा कारखाना हे सर्व पवनराजे पाहत होते. त्यानंतर तेरणा साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर पद्मसिंह आणि पवनराजे या दोघांमध्ये प्रचंड वैर निर्माण झाले. त्यामुळे दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या होत्या. त्यांच्यातील राजकीय लढाईतील वितुष्टाने टोक गाठले होते.
पवनराजे आणि पद्मसिंह यांच्यातल्या राजकीय कुरघोडीमुळेच 2004 मध्ये झालेल्या उस्मानाबाद मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत पद्मसिंह आणि पवनराजे हे दोघेजण एकमेकांविरोधात प्रथमच उभे राहिले. या लढाईत कोण जिंकतं हे पाहण्याची उत्सुकता सर्वांना होती. अर्थातच ही निवडणूक रंगतदार झाली. याआधी सलग सहा वेळा उस्मानाबाद मतदारसंघावर वर्चस्व राखून असलेल्या पद्मसिंह पाटलांनीच या वेळी विजय मिळवला. पण त्यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास पाहिला तर हा विजय त्यांच्या राजकीय इतिहासाला साजेसा नव्हता. या निवडणुकीत मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या लढतीत अवघ्या 464 मताने पवन राजेंना पराभव पाहावा लागला होता.
2004 च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील यांनी विजय मिळवला. या वेळीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार राज्यात आले. या वेळी पद्मसिंह पाटलांना मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यानंतर पवनराजे यांनी पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचं वेगळं राजकारण सुरू होतं. मात्र, 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पवनराजे मोटारीतून जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा)
या घटनेनंतर पाटील-राजेनिंबाळकर कुटुंबातील वैर वाढतच गेले. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पाटील-निंबाळकर कुटुंबातील दुसरी पिढी एकमेकांसमोर ठाण मांडून उभी टाकली. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात त्यांचे चुलत भाऊ तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील मैदानात उतरले. या निवडणुकीत राणाजगजितसिंह यांचा ओमराजेंनी सुमारे 17000 हजार मतांनी पराभव केला होता.
त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत हे दोन भाऊ पुन्हा एकदा आमने-सामने उभे टाकले. या निवडणुकीत 2009 साली झालेल्या पराभवाचा वचपा काढताना ओमराजेंचा पराभव करीत राणाजगजितसिंह पाटील यांनी 10 हजार 806 मताने विजय मिळवला होता.
उस्मानाबाद विधानसभा सोडून 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय ओमराजेंनी घेतला. त्यानंतर हा भावा-भावातील लढतीचा सिलसिला थांबेल असे वाटत असतानाच पुन्हा राणाजगजितसिंह यांनी लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निवडणुकीत ओमराजेंनी पुन्हा बाजी मारत राणाजगजितसिंह यांनी जवळपास सव्वा लाख मताच्या फरकाने अस्मान दाखवले. त्यावेळी राजेनिंबाळकर यांना पाच लाख 91 हजार 605 तर राणाजगजितसिंह पाटील यांना चार लाख 64 हजार 747 मते मिळाली होती. पाटील यांचा एक लाख 26 हजार 858 मतांनी पराभव झाला होता.
या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राणाजगजितसिंह यांनी उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघही सोडला. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. तुळजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत त्यांनी विजय मिळवला. त्यामुळे भविष्यात दोन भाऊ मतदारसंघ बदलल्याने आमने-सामने येणार नाहीत असे वाटत होते. २०२२ मध्ये झालेल्या शिवसेना पक्षातील फाटाफुटीनंतर कोठेही न जाता ओमराजे शिवसेना ठाकरे गटासोबतच एकनिष्ठ राहिले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजेंच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी महायुतीमधील तीन पक्ष एकत्र आले आहेत.
धाराशिवची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्यानंतर या वेळी चर्चेत असलेल्या आमदार सतीश चव्हाण, सुरेश बिराजदार, प्रवीणसिंह परदेशी, आमदार विक्रम काळे यांच्या नावावर चर्चा झाली. मात्र, त्यांनी लढण्यास नकार दर्शविल्याने सर्वनुमते राणाजगजितसिंह यांना निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी आग्रह करण्यात आला. मात्र, त्यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास नकार दर्शविला.
राणाजगजितसिंह (Rana Jagjitsinh Patil) यांच्या पत्नी अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेत निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात दोन भावातील लढत टळली असली तर यंदा प्रथमच दीर-भावजयीमध्ये लढत होत आहे. आपल्या पतीच्या पराभवाचा बदला घेण्याचा अर्चना पाटील पुरेपूर प्रयत्न करतील, असे वाटत असले तरी शिवसेनेतील फाटाफुटीमुळे ठाकरे गटासोबतची सहानुभूती ओमराजेंच्या (Omraje Nimbalkar) बाजूने असल्याने त्यांचा मुकाबला कसा करणार? याकडे लक्ष लागले आहे.
R