nana patole uddhav thackeray sharad pawar sarkarnama
विश्लेषण

MVA Seat Sharing: मविआत ठाकरे गटच मोठा भाऊ, मात्र दोन ठिकाणी नाराजीचे आव्हान

Lok Sabha Seat Sharing in Maharashtra 2024: महाविकास आघाडीचे जागावाटप जाहीर झाले आहे. यात शिवसेनेच्या वाट्याला सर्वाधिक 21 जागा आल्या आहेत. त्याअर्थाने ठाकरे गट हा महाविकास आघाडीत मोठा भाऊ ठरला आहे.

अय्यूब कादरी

महाविकास आघाडीच्या जागावाटपाला (MVA seat sharing) अखेर अंतिम रूप मिळाले आहे. शिवसेना 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 10 जागा आल्या आहेत. आपल्या वाट्याला 21 जागा घेत ठाकरे गट (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीत मोठा भाऊ ठरला आहे. असे असले तरी सांगली, भिवंडी मतदारसंघात काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची धग कायम आहे. ही नाराजी दूर करण्याचे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे. मोठा भाऊ म्हणून ठाकरे गटासमोरही ते आव्हान आहेच. वेळीच पावले नाही उचलली तर या दोन मतदारसंघांतील नाराजीचा परिणाम अन्य मतदारसंघांवरही होण्याचा धोका आहे. (mva maharashtra candidates list)

सांगली मतदारसंघ काँग्रेसला द्यावा, यासाठी आमदार विश्वजित कदम यांनी जोर लावला होता. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी सांगलीतून लढण्याची तयारी केली आहे. ठाकरे गटाने या मतदारसंघातून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भिवंडी मतदारसंघही काँग्रेसला हवा होता, मात्र तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. मुंबई येथील नरिमन पॉइंट येथे मंगळवारी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. तीत जागावाटप जाहीर करण्यात आले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा (mva maharashtra candidates list) निर्माण झाला होता. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि ऱाष्ट्रवादी काँग्रेसला फुटीची लागण झाली आहे. या दोन्ही पक्षांतून फुटून बाहेर पडलेले गट भाजपसोबत सत्तेत आहेत. काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली नाही, मात्र गळती लागलेलीच आहे. पक्षाने ज्यांना दोनवेळेस मुख्यमंत्री केले असे अशोक चव्हाण यांच्यासारखे नेते भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी कागदावर कमकुवत दिसत आहे.

अशा परिस्थितीत जागावाटपाचा तिढा न सुटल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. आता जागावाटप निश्चित झाले आहे, मात्र स्थानिक नेते ज्या सांगली आणि भिवंडी मतदारसंघासाठी अडून बसले होते ते काँग्रेसला मिळालेले नाहीत. त्यामुळे आता या मतदारसंघांतील काँग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. ते वेगळी भूमिका घेऊन महाविकास आघाडीची अ़चण करतात की पक्षाचा आदेश मान्य करातात, याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

दोन पक्ष फोडून त्यातील महत्त्वाचे नेते भाजपने सोबत घेतले आहेत. काँग्रेसचे काही दिग्गज नेते फोडून भाजपने आपल्या पक्षात घेतले आहेत. त्यामुळे कागदावर महायुतीचे पारडे जड वाटत आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करणे, त्यासाठी राज्यातून जास्तीत जास्त जागा जिंकणे हे भाजपचे उद्दिष्ट आहे. मात्र, भाजपने केलेली पक्षांची फोडाफोडी, नेत्यांची पळवापळवी नागरिकांना आवडलेली नाही, अशी चर्चा सतत एेकायला मिळते. खरे काय हे निकालानंतर समोर येणार आहे.

महागाई, बेरोजगारी आणि दुष्काळी परिस्थितीमुळे लोक हैराण झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पक्षांची फोडाफोडीही लोकांना आवडलेली नाही, हेही अनेक वेळा समोर आले आहे. या बाबी महाविकास आघाडीसाठी पोषक ठरणाऱ्या आहेत. जागावाटप झाले, आता काही जागांवरून निर्माण झालेली नाराजी दूर केली तर महाविकास आघाडीला या वातावरणाचा फायदा उठवता येईल.

महाविकास आघाडीत शिवसेनेच्या (ठाकरे गट) वाट्याला आलेल्या जागाः

1) बुलडाणा, 2) यवतमाळ - वाशीम, 3) मावळ, 4) सांगली, 5) हिंगोली, 6) छत्रपती संभाजीनगर, 7) उस्मानाबाद (धाराशिव), 8) शिर्डी, 9) नाशिक, 10) रायगड, 11) सिंधुदुर्ग - रत्नागिरी, 12) ठाणे, 13) मुंबई ईशान्य, 14) मुंबई दक्षिण, 15) मुंबई उत्तर पश्चिम, 16) परभणी, 17) दक्षिण मध्य मुंबई, 18) कल्याण, 19) हातकणंगले, 20) पालघर, 21) जळगाव.

काँग्रेसच्या वाट्याला आलेले मतदारसंघः

1) नंदूरबार, 2) धुळे, 3) अकोला, 4) अमरावती, 5) नागपूर, 6) भंडारा गोंदिया, 7) गडचिरोली चिमूर, 8) चंद्रपूर, 9) नांदेड, 10) जालना, 11) मुंबई उत्तर मध्य, 12) पुणे, 13) लातूर, 14) सोलापूर, 15) कोल्हापूर, 16) रामटेक, 17) उत्तर मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेले मतदारसंघ

1) बारामती 2) शिरूर, 3) सातारा, 4) दिंडोरी, 5) माढा, 6) रावेर, 7) अहमदनगर, 8) बीड, 9) वर्धा, 10) भिवंडी.

(Edited by: Mangesh Mahale)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT