Mahavikas Aghadi Vs Mahayuti  Sarkarnama
विश्लेषण

Mahavikas Aghadi Vs Mahayuti : पुन्हा तेच, अजितदादा भाजपला नकोच? महायुती अन् मविआतही ओढाताण...

Rajanand More

Mumbai : लोकसभा निवडणुकीत भाजपला बसलेल्या दणक्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सर्वच संबंधित संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे बोट दाखवलं. त्यांना सोबत घेतल्याचा फटका निवडणुकीत बसल्याच्या दाव्यावर अजूनही काही जण ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबतही भाजप नेत्यांच्या मनात हवा तेवढा आत्मविश्वास नाही.

महाविकास आघाडीमधील चित्र फारसे वेगळे नाही. तिन्ही पक्षांमधील नेत्यांच्या दावे-प्रतिदावे अन् नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसमधील काही आमदारांनी केलेला दगाफटका अन् शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव घडबडून जागे करणारा आहे. पुढील काही दिवसांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती अन् आघाडीमध्ये तयार झालेला अविश्वासाचा डोंगर फोडण्याऐवजी काही नेते संशयाचे आणखी डोंगर उभे करत आहेत.

अजितदादांबाबत भाजपच्या मनात अजूनही संभ्रम असल्याचे सातत्याने पुढे येत आहे. आरएसएसशी संबंधित एका मराठी साप्ताहिकाने नुकतेच तसे संकेत दिले. बाहेरून आलेल्यांसाठी पक्षातील कट्टर कार्यकर्ते मागे पडल्याचा नॅरेटिव्ह तयार झाला आहे. अनेक नेते, पदाधिकारीही याला दुजोरा देतात. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते  क्लाईड क्रास्टो यांनी हवा दिली. भाजपला निवडणूक जिंकायची आहे. पण लोकसभेत आमच्या पक्षाच्या बाजूने मतदान झाल्याने ते सावध झाले आहेत.

क्रास्टो यांचे हे विधान महत्वाचे आहे. भाजपला विधानसभा जिंकायची असेल तर कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये निर्माण झालेला संभ्रम किंवा नाराजी दूर करावी लागणार आहे. ती नाराजी दूर कशी होणार, हा प्रश्नच आहे. एकनाथ शिंदे यांच्या सेनेलाही लोकसभेत अपेक्षित यश मिळाले नाही. सेनेची मते भाजपला मिळाली नाहीत, असाही दावा केला जात आहे. मात्र, हिंदुत्वाच्या मुद्यावर सेनेबाबत भाजपमध्ये फारशी नाराजी नाही.

असे असले तरी युतीतील तिन्ही पक्षांतील नेते मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा असेल असा दावा करत आहेत. युती शिंदेच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे नेते सांगतात. पण भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री मानतात. अनेकदा तसे उघडपणे बोलतात त्यामुळे जागावाटपात मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. भाजपने 150 हून अधिक जागा लढण्याची तयारी केली आहे. त्याला शिंदे आणि दादा कितपत दाद देणार, हेही पाहावे लागेल. कमी जागा येऊनही बिहारमध्ये नितीशकुमार यांना भाजपने दिलेल्या मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्यूला महाराष्ट्रात कितपत चालेल, हा प्रश्नच आहे.  

महाविकास आघाडीमधील चित्र फारसे वेगळे नाही. लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही अधिक जागा मिळवण्यासाठी उध्दव ठाकरे यांची सेना तयारीला लागली आहे. ठाकरे मुंबईत किमान 25 जागा लढणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही अधिकाधिक जागांची चाचपणी सुरू आहे. तर लोकसभेत आश्चर्यकारक कामगिरी केलेली काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी हे पक्षही आग्रही आहेत.

आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरूनही रस्सीखेच सुरू आहे. आघाडीचा चेहरा कोण असेल, या प्रश्नावर खासदार संजय राऊत बेधडकपणे ठाकरेंचा नाव घेतात. तर काँग्रेसमधील काही पदाधिकारी नाना पटोलेंना समर्थन देतात. राष्ट्रवादीतही काही नेते जयंत पाटील तर काही नेते सुप्रिया सुळेंना पुढे करतात. त्यामुळे आघाडीतही सर्वकाही आलबेल नाही.

निवडणुकीला आता काही दिवसच उरले आहेत. भाजपचे नेते अजितदादा आपल्यासोबतच राहणार असल्याचे सांगत आहेत. पण प्रत्यक्ष कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये असलेली नाराजी ते कसे दूर करणार यावर सगळं गणित अवलंबून असणार आहे. तर दुसरीकडे लोकसभेत मिळवलेला विजय विधानसभेतही मिळवण्यासाठी आघाडीलाही एकमेकांवर विश्वास ठेवऊनच पुढची वाटचाल करावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT