विश्लेषण

Maharashtra Assembly Election : भाजप चुका सुधारणार की पुन्हा मोदींवरच विसंबून राहणार?

अय्यूब कादरी

लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही ते मुख्यत: उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील घसरलेल्या कामगिरीमुळे. याच्या कारणांचा शोध भाजपकडून घेतला जात आहे, त्यावर चर्चाही झडतच आहेत. प्रदेश पातळीवरच्या नेत्यांनी घोडचुका केल्या आणि त्या दुरुस्त करण्याची वेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आली. पण आता 'मोदी मॅजिक'लाही उतरती कळा लागल्याचे लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांनाच कामाला लागण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, मात्र त्यांनी केलेल्या चुकांचे काय, असा प्रश्नही आडवा येऊ लागला आहे.

2019 च्या निवडणुकीत शिवसेना - भाजप युती होती. भाजपने 23 आणि शिवसेनेने 18 अशा युतीने एकूण 41 जागा जिंकल्या होत्या. 2024 मध्ये भाजपला केवळ 9 तर महायुतीला 17 जागा मिळाल्या होत्या. पाच वर्षांत असे काय घडले असेल की कामगिरी इतकी घसरली? घोडचुका, बदल्याच्या भावनेतून प्रदेश नेतृत्वाने एकापाठोपाठ एक चुकीची पावले उचलली. त्या त्या वेळी केंद्रातील भाजप नेतृत्वाने त्यांना पाठिंबा दिला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात आल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाने अंग काढून घेतले. शिवसेनेत फूट पाडण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची मान्यता घेण्यात आली नव्हती किंवा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला ते मान्य नव्हते, अशी वक्तव्ये भाजपच्या नेत्यांनी केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही फोडला नाही, तर उद्धव ठाकरे यांचे पुत्रप्रेम आणि शरद पवार यांच्या पुत्रीप्रेमामुळे ते पक्ष फुटले, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील प्रचारसभेत म्हणाले होते.

बरे, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी लोकसभा निवडणुकीतील अपयशापासून काही धडा घेतला आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. महायुतीतील शिंदे गटालाही हा प्रश्न आणि त्याचे तेच उत्तर लागू होते. या दोन्ही पक्षांच्या तोंडाचा पट्टा सुरूच आहे. भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांची वक्तव्ये आणि त्यांची मग्रुरी हा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला प्रचारासाठी हा आयताच मुद्दा मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर अवलंबून राहिले. मात्र त्याचा करिष्मा फार चालू शकला नाही. त्याला स्थानिक नेत्यांची 'कामगिरी'ही कारणीभूत ठरली. आता भाजप, शिवसेनेच्या नेत्यांच्या तोंडाचा सुरू असलेला पट्टा 'मोदी मॅजिक'च्या आडवा येणार, हे निश्चित मानले जात आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा भारही मोदी यांनाच वाहावा लागणार, याची चाहूल एव्हाना लागली आहे. मोदी आज विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांच्यापाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा आहे. मोदी यांना पूर्वीसारखेच झंझावाती प्रचारदौरे करावे लागणार, याचे हे संकेत आहेत. लोकसभा निवडणुकीत मोदी यांना महाराष्ट्रात 18 सभा घेतल्या होत्या आणि महायुतीचे केवळ 17 उमेदवार निवडून आले! याचा अर्थ यापूर्वी अनेकदा एकहाती विजय मिळवून दिलेल्या 'मोदी मॅजिक'ला उतरती कळा लागली आहे, असा होतो. याचा दुसरा अर्थ असा आहे, की स्थानिक नेतृत्व सक्षम असणे अत्यंत गरजेचे असते. भाजपकडे तसे नेतृत्व आहे, मात्र गेल्या पाच वर्षांत त्या नेतृत्वाने विश्वास गमावला आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीसमोर अनेक आव्हाने आहेत. महायुतीच्या अंतर्गत सुरू असलेली धुसफूस, वर्चस्वाची लढाई ही सर्वात मोठी आव्हाने म्हणावी लागतील. त्यानंतर वाचाळ नेत्यांचे आव्हान आहे. लोकसभेला निर्माण झालेली मतांची तूट कशी भरून काढणार, हेही आव्हान आहे. दुरावलेल्या अल्पसंख्याक समाजाला जवळ करण्याचेही आव्हान आहेच. लाडकी बहीण या एकट्या योजनेमुळे मतांची तूट भरून येईल, असे सरकारला वाटत आहे. त्यामुळेच या योजनेचा मोठा गवगवा सुरू करण्यात आला आहे. वाचाळ नेत्यांना शांत करण्यात भाजपच्या राज्यातील शीर्ष नेतृत्वाला अपयश आले आहे. त्यामुळे शीर्ष नेतृत्वाच्या संमतीनेच आक्षेपार्ह विधाने केली जात आहेत, असे लोकांना वाटू लागले आहे. हे भाजप आणि महायुतीसाठी घातक ठरणार आहे.

शक्य तेवढ्या चुका मान्य करून, सुधारणा करून स्थानिक नेतृत्वाने कामाला लागणे, हा भाजपकडे उपलब्ध असलेला सर्वात उपयुक्त पर्याय आहे. सर्वच भार मोदींवर टाकून चालणार नाही, हे स्थानिक नेतृत्वाने लक्षात घेतले पाहिजे. मात्र महायुतीत सुरू असलेला अंतर्गत संघर्ष हा या मार्गातील सर्वात मोठा अडसर आहे. बदल्याची भावना आणि सोय होणार, असा दृष्टीकोण समोर ठेवून उचलेली पावले भाजपसाठी अडचणीची ठरत आहेत. असे असले तरी अंग झटकून कामाला लागणे हा एकमेव पर्याय भाजपच्या प्रदेश नेतृत्वासमोर आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT