Narendra Modi’s Response to Flood Crisis : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने धुमाकुळ घातला आहे. राज्यात अनेक भागात अतिवृष्टीने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अजूनही अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लाखो एकर जमिनीवरील पीक नष्ट झाले आहे. मदतीची याचना करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला असला तरी तो तोकडा आहे. केंद्र सरकारकडूनही अद्याप मदत मिळालेली नाही.
पंजाब आणि हिमाचल प्रदेशातील जलप्रलयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 सप्टेंबरला या राज्यांचा दौरा केला होता. हवाई पाहणीसोबत त्यांनी प्रत्यक्ष नागरिक तसेच मुख्यमंत्री, इतर मंत्री, वरिष्ठ अधिकारी, एनडीआरएफ, एसडीआरएफ आदी यंत्रणांशी संवाद साधला होता. तसेच त्याचवेळी दोन्ही राज्यांसाठी आर्थिक मदतीची घोषणाही केली होती.
पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशसाठी 1500 कोटींची तर पंजाबसाठी 1600 कोटींची तातडीची मदत जाहीर केली होती. काही दिवसांनी पंजाबला केंद्र सरकारने आणखी 240 कोटी रुपये देऊ केले होते. त्याचप्रमाणे मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदतही जाहीर करण्यात आली होती. महाराष्ट्रासाठी मात्र अद्याप केंद्राकडून एक रुपयाही मदत देण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. मदत देण्याची विनंती केंद्र सरकारला केली. खरंतर ऑगस्ट 2019 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, गृह मंत्रालय गंभीर आपत्तीनंतर लगेचच नुकसानीचे जागेवर मूल्यांकन करण्यासाठी आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथके स्थापन करते, त्यासाठी निवेदनाची वाट पाहत नाही. आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथकाद्वारे नुकसानीचे मूल्यांकन झाल्यावर, केंद्र सरकार राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून, स्थापित प्रक्रियेनुसार राज्याला अतिरिक्त आर्थिक मदत प्रदान करते.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गृह मंत्रालयाने हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरसाठी अतिवृष्टी, पूर, ढगफुटी आणि भूस्खलन यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आंतर-मंत्रालयीन केंद्रीय पथके स्थापन केली होती. महाराष्ट्रासाठी अद्याप अशी पथके तयार स्थापन करण्यात आलेली नाहीत. राज्यात मागील काही दिवसांपासून नव्हे तर पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक भागांत अतिवृष्टी झाली आहे. ऑगस्ट महिन्यात 15 ते 19 तारखांदरम्यान झालेल्या पावसात 21 जणांचा मृत्यू झाला होता.
पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातही मागील चार महिन्यांत पावसाने अनेक भागात धुमाकूळ घातला आहे. पण तेव्हापासून आतापर्यंत एकदाही अमित शहांच्या मंत्रालयाकडून आंतर-मंत्रालयीन पथके स्थापन करण्यात आलेली नाहीत किंवा त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केल्याचे ऐकिवात नाही. नुकसानग्रस्त भागातील शेतकरी, नागरिकांना तातडीची मदत मिळणे आवश्यक आहे. पण सध्यातरी यंत्रणा आणि निधीही अपुरा पडत असल्याचे चित्र आहे. नियम, निकष बाजूला ठेवून सरकार शेतकऱ्यांना मदत करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार सांगत आहेत. पण ही मदत तोकडी पडत असल्याची जाणीव त्यांनाही आहे. त्यामुळे फडणवीस यांनी तातडीने दिल्ली दौरा करत केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागातील शेतकऱ्यांची स्थिती भीषण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई पाहणी केली नाही तरी किमान तातडीची मदत जाहीर करावी, अशी अपेक्षा राज्य सरकारसह महाराष्ट्रातील पुरग्रस्त शेतकऱ्यांची आहे. वाहून गेलेली शेतजमीन, पीकांचे झालेले नुकसान, वाहून गेलेले संसारांची पाहणी करण्यासाठी तातडीने पथके पाठवून शक्य तेवढ्या लवकर मदत मिळावी, यासाठी महाराष्ट्र मोदी सरकारकडे डोळे लावून बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.