भाजप लोकसभेच्या ३० जागा लढवणार, हा युतीधर्म की ‘बनवाबनवी’?  Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Lok Sabha Election 2024: भाजप लोकसभेच्या ३० जागा लढवणार, हा युतीधर्म की ‘बनवाबनवी’?

Lok Sabha Election 2024: महायुतीतमित्रपक्षांना मोजक्याच जागा देऊन अधिक जागांवर लढण्याचा भाजपचा इरादा होता, दिल्लीत झालेल्या बैठकीत भाजपने थोडे नमते घेतल्याची माहिती समोर येत आहे.

अय्यूब कादरी

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Lok Sabha Election 2024) महायुतीमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. असे असतानाही महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नाममात्र जागा देऊन आपल्या वाट्याला जास्त जागा घेण्याचा भाजपचा (BJP) प्रयत्न होता. मात्र आता भाजपने मित्रपक्षांसमोर नमते घेतल्याची विश्वसनीय माहिती आहे. भाजप 30 जागा लढवणार असून उर्वरित जागा मित्रपक्षांना देणार आहे, असा निर्णय दिल्लीत शनिवारी रात्री उशीरापर्यंत झालेल्या चर्चेत घेण्यात आला आहे, असे सांगितले जात आहे. यापूर्वी भाजपचे नेते 34 जागा लढवण्यावर ठाम होते.

महायुतीच्या जागावाटपाचा घोळ अद्याप मिटलेला नाही. काही जागांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अडून बसले आहेत. त्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. भाजपमध्येही इच्छुकांची संख्या मोठी आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांचे इच्छुक दिल्लीकडे डोळे लावून बसले आहेत. असे असताना आता भाजपने थोडेसे नते घेऊन 30 जागा लढवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. आधीच्या निर्णयानुसार 34 जागा लढवल्या तर आधिक जागांवर विजय मिळेल, असा भाजप नेत्यांचा होरा होता. त्यामुळे 30 जागांवर लढण्याचा भाजपचा निर्णय युतीधर्म पाळण्यासाठी आहे की या मागे आणखी काही कारण आहे, अशीही शंका उपस्थित होऊ लागली आहे. गेल्या निवडणुकीत भाजप आणि अविभाजित शिवसेनेचे युती होती. त्यावेळी भाजपने 25 जागा लढवल्या होत्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसच्या नेतृत्वाखाली देशभरात भाजपचे विरोध एकजूट होत आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप नुकताच मुंबई येथे झाला. समारोपाच्या या सभेत विरोधकांची एकजूट दिसून आली. त्यामुळे भाजपच्या गोटात नक्कीच चिंता पसरलेली असणार, मात्र त्याची जाणीव होऊ दिली जात नाही, ही भाजपची खुबी आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपला जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे भाजपने अन्य पक्षांतील नेत्यांचे भरसमाट इन्कमिंग करून ठेवले आहे. हीच बाब आता भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. मित्रपक्षांना नाराज करणे परवडणार नाही आणि स्वतःही माघार घेणे परवडणार नाही, अशा कात्रीत भाजप अडकला आहे.

निवडणूक जाहीर व्हायच्या आधीपासूनच भाजपकडून मतदारसंघात सर्वेक्षण करण्यात आले. पक्षाच्या एकंदर स्थितीबाबत आणि उमेदवारांबाबतही सर्वेक्षण करण्यात आले आहे. काही ठिकाणचे निष्कर्ष भाजपची चिंता वाढवणारे आहेत, असे सांगितले जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासाठी निर्माण झालेली सहानुभूती अद्यापही कायम आहे. त्यामुळे महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोजक्याच जागा देऊन स्वतः जास्त जागा लढवण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला होता. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अडून बसल्याने भाजपनेते हतबल झाले आहेत. आता मनसेलाही महायुतीत सहभागी करून घेण्याचा निर्णय जवळपास झाला आहे. त्यामुळे मनसेलाही लोकसभेच्या काही जागा द्याव्या लागणार आहेत. उस्मानाबादसह (धाराशिव) अनेक मतदारसंघांत महायुतीचे जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही. दुसरीकडे काही मतदारसंघांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत कमी-अधिक प्रमाणात अशी स्थिती आहे.

ग्रामीण भागाला दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत. दिवसभरातून अनेकवेळा वीज गायब होत आहे. कांदा निर्यातबंदीची नाराजी आधीपासूनच आहे. सोयाबीनचे भाव पडले आहेत. अशातच निवडणूक रोख्यांचा (इलेक्टोरल बाँड) मुद्दा गाजू लागला आहे. याच्या जोडीला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत नागरिकांत असलेली सहानुभूती भाजपसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यामुळे विरोधक पुन्हा नव्या दमाने एकवटत आहेत. लोकही आता विचार करू लागले आहेत. मतदानापर्यंत अशीच परिस्थिती कायम राहिली तर काय होणार, याचीही चिंता भाजपला नक्कीच असणार. अपेक्षित यश नाही मिळाले तर दिल्लीश्वरांना काय उत्तर देणार, अपयशाला कोणाला जबाबदार ठरवणार, असा विचार करून तर भाजप नमते घेत नसेल ना, अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT