maharashtra minister aslam shaikh said mumbai police has done proper investigation
maharashtra minister aslam shaikh said mumbai police has done proper investigation 
विश्लेषण

काम नसल्यामुळे घरी बसलेले लोक सुशांत प्रकरणात बोलत आहेत : अस्लम शेख

वृत्तसंस्था

दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी)  चौकशी सुरू केली असून, केंद्रीय अन्वेषण विभागानेही (सीबीआय) गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी रोज नवनवीन आरोप करणाऱ्यांचा आता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी समाचार घेतला आहे. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी त्याचे पिता के.के.सिंह पाटण्यातील राजीवनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. यानंतर तपासावरून महाराष्ट्र आणि बिहार सरकार एकमेकांविरोधात उभे राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दोन राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना यात ईडीनेही उडी घेतली. सुशांतचा मृत्यू आणि आर्थिक अनियमतितेप्रकरणी ईडीने रिया हिच्यासह सहा जणांवर करचुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे पिता इंद्रजित, आई संध्या, भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी दररोज कोणीतरी नवीन आरोप करीत आहे. याचा पालकमंत्री अस्लम शेख यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, या प्रकरणात काही जण प्रसिद्धी मिळवण्यासाठी उडी मारत आहेत. सध्या काही जण चित्रीकरणासाठी जात नसल्याने घरी बसले आहेत. त्यामुळे ते विनाकारण वाद ओढवून घेत आहेत. 

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला आहे. केंद्र सरकारला तरीही वाटत असेल पुढील चौकशी व्हावी तर त्यांनी सीबीआयकडे तपास सोपवावा, असे शेख यांनी स्पष्ट केले.

सुशांत हा 14 जूनला मुंबईतील घरी मृतावस्थेत सापडला होता. याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचे मित्र, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांच्यासह इतर काही जणांचा समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT