Ministers Manikrao And Kokate Pankaja Munde sarkarnama
विश्लेषण

Agriculture Minister Kokate : धन्य ते कृषिमंत्री! म्हणे इतक्या सकाळी पहिल्यांदा उठलो...; तिकडे शेतकरी मात्र रात्री, पहाटे पिकांना पाणी देतात !

Farmers Work In Early Morning In the Farm : आपण आयुष्यात पहिल्यांदा इतक्या लवकर उठलो, मी सकाळी लवकर उठून चांगल्या कामाला लागल्याचे आठवत नाही. हे बोल आहेत राज्याचे कृषी आणि पर्यावरण मंत्र्यांचे. कडाक्याच्या थंडीत शेतातील पिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा कृषिमंत्री महोदयांना कळणार आहेत का?

अय्यूब कादरी

Pune News : ज्येष्ठ नेते शरद पवार सकाळी सहा वाजता अॅफिसरेडी असतात. मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुख सकाळी साडेसातच्या दरम्यान कामाला लागायचे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही सकाळी 7 वाजता तयार असतात. अन्य अनेक नेतेही सकाळी लवकर उठून कामाला लागतात. तिकडे, आमचा शेतकरी पहाटे, मध्यरात्री कडाक्याच्या थंडीत कामाला लागतो, कारण वीजपुरवठा सलग दिवसा सुरू राहत नाही.

हे सांगण्याचे आता प्रयोजन काय, असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडणार आहे. बारामती येथे गुरुवारी कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्यामुळे आपल्या काही मंत्र्यांना सकाळी लवकर उठावे लागले. सकाळी लवकर उठल्याचे कौतुक मग त्यांनी स्वतः त्यांच्या तोंडून केले. राज्यात काय सुरू आहे आणि मंत्री सत्ता कशी 'एन्जॉय' करत आहेत, हे सांगणारे ते दृश्य होते. माणिकराव कोकाटे म्हणाले, एवढ्या सकाळी उठण्याची माझी ही आयुष्यातील पहिलीच वेळ आहे! माणिकराव कोकाटे हे आपले कृषिमंत्री आहेत, याला शेतकऱ्यांचे सुदैव म्हणावे की दुर्दैव?

पंकजा मुंडेही यांनीही अशीच भावना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांना सकाळी 7.45 वाजता बोलावले होते म्हणे. त्यानंतर खासदार सुनेत्राताई पवार यांनी त्यांना सकाळी 7.25 वाजता बोलावले, असे त्यांनीच सांगितले. पंकजा मुंडे या पर्यावरण मंत्री आहेत. त्या पुढे म्हणतात, ''माझी सकाळ इतकी चांगली कधी गेली नव्हती. सकाळी लवकर उठून चांगल्या कामाला लागल्याचे मला आठवत नाही. दोन, तीनवेळा चहा पिण्यातच माझी सकाळ जाते. मला दर महिन्याला बारामतीला बोलवा, म्हणजे माझ्यात 'प्रोफेशनॅलिझम' येईल!''

आहे की नाही गंम्मत? शहरी भागातील लोकांना याचे कदाचित कौतुक वाटू शकते, मात्र ग्रामीण भागातील जे लोक, शेतकरी जगण्यासाठी दररोज संघर्ष करतात, त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी मंत्र्यांची ही वक्तव्ये आहेत. ग्रामीण भागात शेतीला पाणी देताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. शेतीपंपांसाठी वेळा बदलून आळीपाळीने वीजपुरवठा केला जातो. सकाळी 7 ते 3, दुपारी 3 ते रात्री 11 आणि रात्री 11 ते सकाळी 7 अशा आठवड्याला वीजपुरवठ्याच्या वेळा बदलत असतात. शेतकऱ्यांचे काय हाल होत असतील, याचा अंदाज कृषिमंत्री, पर्यावरणमंत्र्यांना असेल का?

बारामतीत मंत्री आज भलत्याच आनंदी मूडमध्ये दिसत होते. इतक्या सकाळी उठण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे, असे म्हणून कृषिमंत्री कोकाटे थांबले नाहीत. मी उशीरा उठतो, हे दादांनाही माहित आहे, गरज असेल तेव्हा मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा असतो, असेही ते म्हणाले. गरज असेल तेव्हा म्हणजे कोकाटे यांचा संदर्भ पहाटेच्या शपथविधीचा होता. एखाद्या कल्याणकारी कामासाठी किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी ते लवकर उठले नाहीत. पहाटेच्या शपविधीचा उल्लेख होताच अजितदादा म्हणाले, ''अरे तो पहाटेचा शपथविधी नव्हता, सकाळी आठचा होता.''

एकूणच वातावरण किती छान होते, सर्व मंत्री अगदी व्यवस्थितपणे 'एन्जॉय' करत होते. असे हे मंगलमय वातावारण. वातावरण छान असावे, मंत्र्यांनीही आनंदी राहावे, याला हरकत असण्याचे काहीही कारण नाही. मात्र मंत्र्यांनी, विशेषतः कृषिमंत्र्यांनी हे लक्षात घ्यावे, की कडाक्याच्या थंडीतही आपल्या शेतकरी बांधवांना मध्यरात्री, पहाटे उठून पिकांना पाणी द्यावे लागते. यासाठी त्यांना अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागतात. मध्यरात्री, पहाटे पिकांना पाणी देणे अनेक शेतकऱ्यांच्या जिवावर बेतले आहे. सर्पदंश झाल्यामुळे, विजेचा धक्का बसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा जीव गेला आहे, याची जाणीव कृषिमंत्र्यांनी ठेवायला हवी.

आयुष्यात मी इतक्या सकाळी पहिल्यांदाच उठलो, हे कौतुकाने सांगण्यासारखे किंवा त्याबाबत आत्मप्रौढी मिरवण्यासारखे काय आहे? व्यासपीठावर असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दररोज सकाळी लवकर उठून कामाला लागतात, याचे तरी भान दौन्ही मंत्री महोदयांनी ठेवायला हवे होते. कृषिमंत्र्यांनी सकाळी लवकर उठावे, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात, त्यांचे जगणे सुकर करावे, अशी अपेक्षा त्यांच्याकडून असते. दोन, तीन चहा घेण्यात सकाळ घालवण्याऐवजी पंकजा मुंडे यांनी सकाळी लवकर उठून चांगले काम केले असते तर बीडमधील सध्याची परिस्थिती टाळण्यासाठी मदत झाली असती.

शरद पवार, विलासराव देशमुख किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आपण लवकर उठून कामाला लागतो, याचा कधीही गाजावाजा केलेला नाही. अशा ज्येष्ठ, वरिष्ठ नेत्यांकडून कृषिमंत्री कोकाटे आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना खूप काही शिकता येईल. राज्यातील शेतकरीही संकटात आहेत, राज्याचे पर्यावरणही संकटात आहे. त्यामुळे कृषिमंत्री आणि पर्यावरणमंत्र्यांना सकाळी नव्हे, तर पहाटे लवकर उठून कामाला लागावे लागणार आहे. अशा बाष्कळ गप्पा करून काहीही साध्य होणार नाही, त्यामुळे समाजात नकारात्मक संदेश जाईल, याची जाणीव मुख्यमंत्री, उमपमुख्यमंत्र्यांनी त्यांना करून दिली पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT