Eknath Shinde-Devendra Fadnavis Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या 2 घटना; दोन्ही ठिकाणी महायुतीचीच पोलखोल...

Nilesh Rane sting operation : निलेश राणेंचे स्टींग ऑपरेशन आणि तानाजी मुटकुळेंच्या विधानामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांची टीकेच्या बोथट झालेल्या तलवारीला धार येणार आहे.

Rajanand More

Maharashtra political controversy : राज्यात सध्या नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरू आहे. अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. काही ठिकाणी तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे. तर काही ठिकाणी दोन्ही शिवसेना एकदिलाने प्रचार करत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत भाजपची युतीही दिसते. या सर्व गदारोळात राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या दोन घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी महायुतीतील पक्षांचीच पोलखोल झाली आहे.

निवडणुकीच्या प्रचारामध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप केले जात आहे. एकमेकांची उणीधुणी काढली जात आहे. काहीजण जुने मुद्दे काढत वार करत आहेत. त्यामुळे प्रामुख्याने महायुतीमध्ये जोरदार हंगामा सुरू असल्याचे चित्र सध्या राज्याच्या राजकारणात दिसत आहे. त्यात दोन घटनांनी तेल ओतत आग भडकवली आहे. शिवसेनेचे कोकणातील आमदार निलेश राणे आणि भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे त्यास कारणीभूत ठरले आहेत.

निलेश राणे यांनी मालवणमधील भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरी जाऊन स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्याचा व्हिडीओही त्यांच्या कार्यकर्त्यांनी काढला आहे. या स्टिंग ऑपरेशनदरम्यान पैशांनी भरलेली एक बॅग आढळून आली अन् निलेश राणेंना आयती संधी मिळाली. त्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप केल्याने महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. तसेच भाजपची प्रतिमा डॅमेज करण्याचे कामही राणेंनी केले.

निलेश राणे यांनी अनेक गंभीर आरोप केल्यानंतर भाजप नेत्यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. प्रत्येक निवडणुकीत पैशांचा पूर येतो, हे नेतेही मान्य करतात. निलेश राणेंनी दाखविलेल्या बॅगेतील पैसे मतदारांना वाटण्यासाठीचे होते की ते केनवडेकर यांचे, याबाबत निवडणूक आयोगाने चौकशी केली तर समोर येईल. पण त्याआधी केनवडेकर यांनी निलेश राणेंची सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कष्टाने व्यवसायातून कमावलेले हे पैसे असल्याचे केनवडेकर म्हणाले आहेत.

राणेंच्या या स्टिंगमुळे पुन्हा एकदा निवडणुकीत राजकीय पक्षांकडून पैशांच्या वाटपाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आहे. निवडणूक आयोगाकडून खरंतर याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. नेते प्रचारसभांमध्ये उघडपणे याचे पैसे घ्या, त्याचे मटन खा पण बटन आमचचे दाबा, असे आवाहन मतदारांना करत आहेत. मतं द्या, निधी देऊ, अशी अमिषे दाखविली जात आहे. हा उघडपणे आचारसंहितेचा भंग आहे. पण त्यावरून आयोगाने एखाद्या नेत्याला नोटीस पाठवून खुलासा मागविल्याचा ऐकिवात नाही. त्यामुळे राणेंचे स्टिंग ऑपरेशन पेल्यातले वादळ ठरणार, असे म्हणावे लागेल.

दुसरीकडे आणखी एका घटनेत भाजप आणि एकनाथ शिंदेचे आमनेसामने आली. मात्र इथे थेट एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला डॅमेज करण्याचे काम करण्यात आले. भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी ‘50 खोके’ एकदम सत्यघटना असल्याचे म्हटले आहे.

मुटकुळे यांनी शिंदेंच्या सेनेचे आमदार संतोष बांगर यांचे नाव घेत हा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यावर महायुतीतील नेत्यानेच डागलेली ही तोफ शिंदेची प्रतिमा डॅमेज करणारी ठरू शकते. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या हाती आयते कोलीत देणारी ही घटना आहे.

मुटकुळे म्हणाले आहेत की, बाकीच्यांचे मला माहिती नाही, पण शिंदेंकडून संतोष बांगर यांनी 50 कोटी घेतली. आदल्या दिवशी ठाकरेंच्या बाजुने बोलणारे बांगर दुसऱ्या दिवशी शिंदेसोबत गेले. शिंदेंसाहेबांच्याच माणसांनी त्यांना 50 कोटी दिले. ते शिंदेसाहेबांकडूनच पैसे आले असणार, असे मुटकुळे म्हणाले आहेत. त्यांचे विधान शिवसेनेच्या आमदारांना चांगलेच जिव्हारी लागलेले असणार. त्याचे पडसाद महायुतीत नक्कीच उमटतील.

एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार यांनी उठाव करत गुवाहाटी गाठले होते. शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेत त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वालाच चॅलेंज दिले होते. त्यामागे त्यांनी काँग्रेससोबतची आघाडी, हिंदुत्व आधी मुद्दे मांडत नाराजी व्यक्त केली होती. ही अनैसर्गिक आघाडी असल्याचेही ते म्हणाले होते. त्यानंतर ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांसह महाविकास आघाडीने ’50 खोके एकदम ओके’ ही घोषणा दिली. त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना ५० कोटी दिल्याचा आरोप आघाडीतील नेत्यांनी केला. मुटकुळे यांनी बांगर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत थेट शिंदेंना टार्गेट केले आहे.

मुटकुळे यांनी इतरांचे माहिती नाही, असे म्हटले असले तरी त्यांच्यामुळे आघाडीच्या नेत्यांना मात्र बळ मिळणार आहे. राणेंचे स्टींग ऑपरेशन आणि मुटकुळेंच्या विधानामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांची टीकेच्या बोथट झालेल्या तलवारीला धार येणार आहे. प्रामुख्याने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटू शकतात. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT