Supreme Court Hearing
Supreme Court Hearing  Sarkarnama
विश्लेषण

Supreme Court Hearing : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी चालली तब्बल १२ दिवस ४८ तास : या तारखेपर्यंत निकाल शक्य

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्ता संघर्षाची सुनावणी आज (ता. १६ मार्च) अखेर संपली. या सुनावणीवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला असून त्याची प्रचंड उत्सुकता महाराष्ट्राला आहे. पण, ही सत्तासंघर्षाची सुनावणी तब्बल १२ दिवस ४८ तास चालली. (Maharashtra power struggle hearing lasted for 12 days 48 days : Result possible by this date)

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड करत गुवाहाटी गाठले आणि तेथून महाराष्ट्रात परत येत सरकार स्थापन केले. दरम्यानच्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या. बंडानंतर शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर शिंदेंनीही याचिका दाखल केली होती.

सुरुवातीला सरन्यायाधीश व्ही. एन रमण्णा यांच्या अध्यक्षतेखाली न्या. कृष्ण मुरारी आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे ११ जुलै २०२२ पासून सुनावणी झाली. याच खंडपीठाने हे प्रकरण पाच सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय घेतला. विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली हिमा कोहली, न्या. एम आर शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. पी नरसिंहा या पाच सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्यात आले होते.

या घटनापीठाच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने सुनावणीला सुरुवात झाली होती. ता. १४ फेब्रुवारीपासून दोन्ही बाजूकडून युक्तीवाद करण्यास सुरूवात झाली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद १२ दिवस, ४८ तास झाला. यातील पहिले ३ दिवस प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यायचे की नाही यावर युक्तिवाद करण्यात आला. मात्र, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी शिवसेनेची ही मागणी फेटाळून लावत पाच सदस्यीय खंडपीठापुढेच सुनावणी सुरू राहील, असे स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी अखेर आज संपली. दोन्ही बाजूंकडून कायद्याचा किस पाडण्यात आला. खंडपीठातील न्यायमूर्तींनी अनेकदा टोकदा प्रश्न विचारत वकिलांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निकालाची उत्सुकता वाढली आहे. विशेषतः शेवटच्या दोन दिवसांत राज्यापालाच्या वतीने बाजू मांडणारे सॉलिसिटर ॲड तुषार मेहता यांच्यावर सरन्यायाधीशांनी प्रश्नांची सरबत्ती केली, त्यामुळे कोणाला धक्का बसणार आणि कोण जिंकणार याकडे महाराष्टाचे लक्ष आहे.

निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष

याच घटनापीठातील न्या. एम आर शहा हे १५ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीपूर्वी या सत्तासंघर्षाचा निकाल लागेल, अशी अटकळ बांधली जात आहे. कदाचित त्यापूर्वीही सर्वोच्च न्यायालय आपला फैसला जाहीर करू शकते. त्यामुळे महाराष्ट्राचा निकाल काय असेल, याकडे महाराष्ट्रासह साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT