Maharashtra Vidhansabha Election 2024 Sarkarnama
विश्लेषण

Maharashtra Assembly Politics : सावध ऐका... प्रचाराच्या हाका...

Maharashtra Vidhansabha Election 2024What will be the strategy of Mahayuti : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होणार, या एकाच प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही आणि तो प्रश्न लोकसभा निवडणुकीपूर्वीही पडलेला होता. काय असणार विधानसभा निवडणुकीसाठीचे मुद्दे...

सरकारनामा ब्यूरो

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग कोणत्याही दिवशी निवडणुकीची घोषणा करेल, या शक्यतेने सारे राजकीय पक्ष, अपक्ष प्रचाराची आपापली आयुधे परजून सज्ज होत आहेत. सत्ताधारी पक्ष सरकारची कामे घेऊन आणि सरकारच्या त्रुटी शोधून विरोधी पक्ष सीमारेषेकडे सरसावत आहेत. युती, आघाडी, तिसरी आघाडी, चौथी शक्यता, प्रादेशिक गट, अपक्ष अशा साऱ्यांची जोडी-तडजोडी पडद्यामागे सुरू आहेत. आयोगाकडून घोषणेचा अवकाश की राजकीय रणसंग्रामाला महाराष्ट्रात सुरुवात होईल. ‘ही निवडणूक फार महत्त्वाची आहे, कारण...’ अशी प्रत्येक निवडणुकीत उगाळली जाणारी गुळगुळीत वाक्ये घेऊन तथाकथित राजकीयतज्ज्ञ समाजमाध्यमांवर धुडगूस घालायलाही सुरुवात होण्याचा काळ जवळ आला आहे. या क्षणी एकाच प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही आणि तो प्रश्न लोकसभा निवडणुकीपूर्वीही पडलेला होता, याचा विसर लगेचच पडला आहे! महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होणार, हा तो प्रश्न!

‘चारसो पार’ पाठोपाठ...

या वर्षीच्या सुरुवातीच्या काळाकडे पाहिले, तर असे दिसते की लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याभोवती होईल, असे सांगितले जात होते. आज कितीही नाकारले, तरी विरोधी पक्षांचीही हीच धारणा होती. त्यानंतर अयोध्येत श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा झाला. आता, निवडणुकीत मुद्दाच राहिला नाही, असे सांगितले गेले. विरोधकांची कोंडी होत राहिली. अगदी मार्चचा दुसरा आठवडा उजाडला, तरी लोकसभा निवडणूक कोणत्या मुद्द्याभोवती होईल, याचा कुणालाही काहीही अंदाज आला नाही. भाजपची ‘चारसो पार’ची घोषणा आली. प्रचाराच्या ऐन रणधुमाळीत भाजपच्याच सुमार नेत्यांनी या घोषणेचा अर्थ स्वतःच्या कुवतीनुसार लावला आणि सारी निवडणूक फिरली.

विरोधकांची बांधणी आणि ‘संविधान’

निवडणूक फिरली एका शब्दाभोवती. तो शब्द होता संविधान. राज्यघटना. लोकसभेत चारशे जागा हव्या आहेत, कारण राज्य घटना बदलायची आहे, असा अर्थ भाजपच्याच कर्नाटकातील नेत्याने लावला. हा नेमका शब्द काँग्रेसने (Congress), विरोधी पक्षांनी उचलला आणि संविधान बदलाच्या साऱ्या शक्यता जोमाने मांडल्या. निवडणुकीपूर्वी काँग्रेसने उत्तर आणि दक्षिण भारतात केलेली बांधणी विरोधकांच्या हाताशी होतीच. पाहता पाहता निवडणुकीच्या प्रचाराचा नूर पालटला. आक्रमक भाजप जेरीस आलेला देशाने पाहिला. भाजपचा बचाव मतदारांपर्यंत पोहोचायच्या आधीच पक्षाचे व्हायचे ते नुकसान होऊन गेले. काँग्रेसचे देशाच्या राजकारणात दणदणीत पुनरागमन झाले. निवडणुकीआधीची बांधणी आणि कुठे चर्चेत नसलेला मुद्दा प्रचारात केंद्रस्थानी बनून निकालावर परिणाम करून गेला, याचा अनुभव कोट्यवधी भारतीय मतदारांनी घेतला.

महाराष्ट्रात काय शक्यता...?

आता, या अनुभवाच्या कसोटीवर महाराष्ट्रातील आजच्या परिस्थितीकडे पाहिले, तर प्रचार कोणत्या मुद्द्यांवर होईल, हे सांगणे कठीण जाते. महायुती सरकार समृद्धी महामार्गापासून ते अटलसेतूपर्यंत सगळीकडे फिरवून आणून लाडक्या बहिणीपाशी मतदारांना आणून सोडेल, यात शंका नाही. महाविकास आघाडीकडे कोविड काळ, पक्षफुटीपासून ते बदलापूर प्रकरणापर्यंतचे मुद्दे आजघडीला आहेत. लाडकी बहीण योजना परिणाम करेल, असे दिसताच सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांनी महिला मतदारांवर आश्वासनांचा वर्षाव करायलाही सुरुवात केली आहे. संविधान हा मुद्दा विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) चालणार नसल्याचे ओळखून त्याबद्दल आघाडीने आधीच सावध भूमिका घेतली आहे. तथापि, ही प्रचाराची सारी आयुधे गुंडाळून ठेवणारा मुख्य मुद्दा कुणालाच सापडलेला नाही, हे वास्तव आहे. त्यामुळेच, आता शोध आहे तो नेमक्या मुद्द्याचा. हा मुद्दा कोण देणार, यावर निवडणुकीचा सारा रागरंग अवलंबून राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा समाजमाध्यमांतून गुणोत्तराच्या प्रमाणात विस्तारत गेला. विधानसभा निवडणुकीतही हाच प्रकार घडेल, याची सर्वाधिक शक्यता आहे.

मतदारांची जबाबदारी...

अशा काळात मतदार म्हणून जबाबदारी अधिक वाढणार आहे. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने जनतेसाठी सतत उपलब्ध असावे आणि जनतेच्या प्रश्नांवर मार्ग काढावा, ही मतदारांची रास्त अपेक्षा. निवडून आलेला लोकप्रतिनिधी थेट पाचव्या वर्षी दर्शन देत असेल, तर आजचा मतदार त्याला स्वीकारत नाही. त्यामुळेच, सर्वच पक्ष लोकप्रतिनिधींच्या कामकाजाचा आढावा घेतल्याशिवाय उमेदवारीवर शिक्कामोर्तब करत नाहीत. केवळ पक्षाचे चिन्ह मिळाले म्हणजे विजयाची खात्री, असा समजही या शतकातील साऱ्या निवडणुकांनी दूर केला. पाच वर्षे काम करावेच लागेल आणि ती तयारी असेल तरच लोकप्रतिनिधी व्हा, हा मतदारांचा संदेश साऱ्या पक्षांनी स्वीकारलाही आहे. त्यामुळे, निवडणूक फिरवणारा मुद्दा कोणता असावा, हे मतदारांना ठरवावे लागेल. तो मुद्दा महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा असावा, हा मतदारांचा आग्रह असला पाहिजे. तो मुद्दा जादूची छडी असणार नाही, याची पक्की खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. लोककल्याण ही निरंतर विकासाची प्रक्रिया असते. ती प्रक्रिया चुटकीसरशी कोणी करू पाहत असेल, तर त्यापासून सावध राहावे लागणार आहे.

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क - ९८८१५९८८१५

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT