विश्लेषण

Maharashtra Vs Bihar Election Result : महाराष्ट्र अन् बिहारच्या निकालात एवढे साम्य की...; ‘हे’ 6 फॅक्टर वाचा अन् तुम्हीच ठरवा...

Key Similarities Between Maharashtra and Bihar Election Results : महाराष्ट्रात भाजपने १४९ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी १३२ जागांवर विजय मिळाला. महाराष्ट्रात भाजपचा स्ट्राईक रेट होता ८८.५९ टक्के. बिहारमध्ये भाजपने १०१ जागा मिळविल्या अन् जवळपास ९० जागा जिंकल्या.

Rajanand More

Voter Behavior Trends in Maharashtra and Bihar : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्याची तुलना महाराष्ट्राच्या निकालाशी होऊ लागली आहे. महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्येही दिसून आल्याचे अनेक गोष्टींवरून स्पष्टपणे दिसते. महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील नेत्यांनी तसे अधोरेखितही केले. अनेक बाबतीत इतके साम्य आढळून आले की नेत्यांनाही तोंडात बोटे घालावी लागली आहेत. त्याचे कारणेही तशीच आहेत. अनेक फॅक्टर त्यासाठी कारणीभूत ठरले आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी बिहारच्या निकालानंतर सोशल मीडियात एक पोस्ट केली. बिहारच्या विधानसभा निवडणुका निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बीजेपी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते, ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते. एकदम महाराष्ट्र पॅटर्न! जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती त्याना ५० च्या आत संपवले, असे राऊतांनी म्हटले आहे. केवळ राऊतांचेच असे मत नाही. महाविकास आघाडीच्या बहुतेक नेत्यांच्या मनातही तेच आहे.

विरोधकांना ५० पेक्षा कमी जागा

बिहारच्या निकालामध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला ५० जागाही मिळताना दिसत नाहीत. महाराष्ट्रातही तेच घडले. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक जागा एकाही पक्षाला मिळाल्या नाही. दोन्ही राज्यांतील हे साम्य भल्याभल्या तज्ज्ञांना बुचकळ्यात टाकणारे असेच आहे.

स्ट्राईक रेट

आणखी एक साम्य म्हणजे स्ट्राईक रेट. महाराष्ट्रात भाजपने १४९ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी १३२ जागांवर विजय मिळाला. महाराष्ट्रात भाजपचा स्ट्राईक रेट होता ८८.५९ टक्के. बिहारमध्ये भाजपने १०१ जागा मिळविल्या अन् जवळपास ९० जागा जिंकल्या. इथेही भाजपचा स्ट्राईक रेट ८९ टक्क्यांच्या जवळपास आहे. एवढेच नाही तर संयुक्त जनता दलासह एनडीएतील इतर मित्रपक्षांचा स्ट्राईक रेटही महाराष्ट्रातील महायुतीतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेससारखा किंबहुना त्याहून चांगला राहिल्याचे दिसते. दुसरीकडे महाआघाडी आणि महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट जवळपास सारखाच दिसतो.

एक्झिट पोल फेल

महाराष्ट्रातील निवडणुकीनंतर एक्झिट पोलमध्ये महायुतीची सत्ता येईल, असे अंदाज वर्तविण्यात आले होते. पण महाविकास आघाडीला १०० च्या जवळपास जागा मिळतील, असा अंदाज होता. पण हे अंदाज निकालानंतर फोल ठरले होते. महायुतीने २८८ पैकी तब्बल २३० जागा जिंकत इतिहास घडविला. तेच चित्र बिहारमध्येही पाहायला मिळाले. इथेही एक्झिट पोलमध्ये एनडीएला १५०-१६० तर महाआघाडीला ७० ते ८० जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. हे अंदाज बिहारमधील मतदारांनीही खोटे ठरविले.

लाडकी बहीण-जीविका दीदी

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी तत्कालीन महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यास सुरूवात झाली. त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसले. मतदानामध्ये महिलांचा टक्का वाढला अन् महायुतीला भरघोस मतदान झाले. नेत्यांनीही निकालानंतर ते मान्य केले. बिहारमध्येही तेच साम्य दिसून आहे. नितीश कुमार यांनी सुमारे दीड कोटी महिलांसाठी जीविका दीदी ही योजना आणत या महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये टाकले. परिणामी बिहारमध्ये झालेल्या मतदानामध्ये महिलांचा मतदानाचा टक्का पुरूषांपेक्षा अधिक राहिला. पुरूषांच्या तुलनेत महिलांचा मतदानाचा आकडा तब्बल ५ लाखांच्या जवळपास होता. ही मतेही एनडीएच्या पारड्यात पडल्याचे निकालातून दिसते. 

नॅरेटिव्ह

महाराष्ट्राच्या निवडणुकीत महायुतीतील नेत्यांनी महाविकास आघाडीविषयी एक नॅरेटिव्ह तयार केला होता. आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात झालेला कथित भ्रष्टाचार, विकास प्रकल्पांना देण्यात आलेली कथित स्थगिती, घराणेशाही, वोट जिहाद, एक है तो सेफ है आदी घोषणा, आघाडी सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजना बंद होईल, विकासकामांना स्थगिती मिळाले आदी मुद्दे महायुतीकडून प्रचारादरम्यान मांडण्यात आले. बिहारमध्येही एनडीएने जंगलराज, भ्रष्टाचार, योजना बंद करण्याची भीती, जातीय-धार्मिक विभाजन आदी मुद्दे प्रकर्षाने मांडले आणि मतदारांना ते पटल्याचेही निकालातून दिसते.

मित्रपक्षांना दिलेली ताकद

महाराष्ट्रात भाजपने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ताकद दिल्याचे दिसून आले. उमेदवार निवडीपासून भाजपने त्यात लक्ष घातले होते. त्यासाठी आपल्या पक्षातील नेतेही त्यांना देऊ केले. जागा वाटपापासूनच त्याची सुरूवात झाली होती. त्यानंतर प्रचाराचे नियोजन, नेत्यांच्या सभा, मतदान केंद्रांवर करण्यात आलेले मायक्रो प्लॅनिंग असे मुद्देही महत्वाचे ठरले होते. बिहारमध्येही भाजप नितीश कुमारांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. चिराग पासवान, उपेंद्र कुशावह जीतनराम मांझी यांनाही ताकद दिली. दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत जागावाटपाचा घोळ दिसून आला. उमेदवारांची निवडही अनेक मतदारसंघात चुकल्याचे दिसले. हाच घोळ बिहारमध्येही दिसला. काही मतदारसंघात तर मैत्रिपूर्ण लढतीही झाल्या. त्याचा फटका आघाडीला बसला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT