Mahayuti-Mahavikas Aghadi  Sarkarnama
विश्लेषण

Maharastra Politics : आरोप-प्रत्यारोप, पक्षांतरांसह नरेटिव्ह सेट करण्याचा धडाका

BJP convention in Pune : पुण्यात भाजपचे अधिवेशन झाले आणि त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनातून भाजप नेत्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. तर पवार-ठाकरेंकडून भाजपला जशास तसे उत्तर मिळाले आहे.

अय्यूब कादरी

Mahavikas Aghadi Vs Mahayuti : राज्यात विधानसभा निवडणुकीची चाहूल एव्हाना लागली आहे. पुण्यात 21 जुलै रोजी झालेले भाजपचे (BJP) अधिवेशन आणि त्यात विरोधकांवर झालेल्या टीकेने विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यासाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली आहे.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. पक्षांतरेही सुरू झाली आहेत. महाराष्ट्रातील दोन महत्वाचे प्रादेशिक पक्ष फोडल्यानंतरची ही विधानसभेची पहिलीच निवडणूक असून, ती ऐतिहासिक, राजकारणाला दिशा देणारी ठरणार आहे.

खरंतर लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीचा निकाल लागला त्याच दिवशी विधानसभेची तयारी सुरू झाली होती. पराभव विसरून महायुतीतील पक्ष कामाला लागले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वबळाचे संकेत देण्यात आले, मात्र तसे होण्याची शक्यता दिसत नाही.

दोन्ही पक्ष स्वबळवार लढले तर तो निर्णय धाडसी ठरू शकतो. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटानेही स्वबळाची भाषा केली होती. स्वबळाची भाषा करणाऱ्या सर्वांनाच आवरते घेऊन महाविकास आघाडी, महायुतीत राहण्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला त्याच्या अगदी काही दिवसांनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी बाहेर पडून शेतकऱ्यांसह नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता. अर्थसंकल्पात महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि तिन्ही पक्ष त्या योजनेचा महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी सक्रिय झाले.

कमी-अधिक प्रमाणात सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. पुण्यातील भाजपच्या मेळाव्यातून शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला. त्या दिवशी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची एका अर्थाने सुरुवात झाली, असे म्हणता येईल.

शरद पवार हे देशातील सर्वात मोठे भ्रष्टाचारी नेते आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या मेळाव्यातून केली. या टीकेला पवारांनीही सडेतोड उत्तर देत शहा यांना गुजरातेतून तडीपार करण्यात आले होते, याची आठवण करून दिली. उद्धव ठाकरे हे 'औरंगजेब फॅन क्लब'चे अध्यक्ष आहेत, अशी टीकाही मेळाव्यातून करण्यात आली.

त्याला ठाकरे गटाकडू प्रत्युत्तर देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवरही राजकारणाला वेग आला. एखाद्या नेत्याचा वाढदिवस असला की पक्षभेद, मतभेद विसरून त्याला शुभेच्छा दिल्या जातात, मात्र उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला यावेळी वेगळेच चित्र दिसले. याप्रसंगीही त्यांच्यावर तिरकस टीका करण्यात आली.

नेत्यांची पक्षांतरे सुरूच आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमुळे अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले जाणार आहे. त्यामुळे काही नेते पक्ष बदलत आहेत. एकाच पक्षातून अनेक इच्छुक समोर येत आहेत. पक्षांतर करणे म्हणजे गद्दारी, लोक गद्दारांना थारा देत नाहीत, असे दोन अख्खे पक्ष फोडणाऱ्या भाजपच्या एका आमदाराला वाटू लागले आहे.

शिंदखेडा मतदारसंघातील भाजपचे नेते कामराज निकम यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी शिंदखेड्याचे भाजपचे आमदार जयकुमार रावल हे परदेशात होते. देशात आल्यानंतर त्यांनी निकम यांना गद्दार संबोधत टीका केली आहे. गेल्या पाच वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपकडून फोडण्यात आले. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीला बसला. पक्ष फोडण्याची ही कृती लोकांना आवडली नव्हती हे सिद्ध झाले आहे. हे नरेटिव्ह कायम ठेवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरू ठेवण्यात आला आहे.

लोकसभा निवणुकीच्या प्रचारात भाजप राज्यघटना बदलणार, अशी चर्चा खोलवर रुजली होती. भाजप आणि महायुतीकडून यासाठी महाविकास आघाडीला दोष देण्यात येत आहे. महाविकास आघाडीने हे खोटे नरेटिव्ह तयार केले होते, असा आरोप महायुतीकडू केला जात आहे. प्रत्यक्षात, राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला 400 पेक्षा अधिक जागा हव्यात, असे विधान भाजपचे नेते अनंत हेगडे यांनी केले होते. महाविकास आघाडी आणि महायुती आपापल्या नरेटिव्हवर कायम आहेत. त्यांचे नरेटिव्ह त्यांना विधानसभेच्या मतदानापर्यंत असेच रेटायचे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT